Home » Blog » जुरेल, पडिक्कलला संधी?

जुरेल, पडिक्कलला संधी?

पर्थ कसोटीमध्ये राहुल सलामीला येण्याची शक्यता

by प्रतिनिधी
0 comments
IND vs AUS Test file photo

पर्थ, वृत्तसंस्था : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये रंगणाऱ्या बॉर्डर-गावसकर कसोटी क्रिकेट मालिकेस २२ नोव्हेंबरपासून पर्थ येथील पहिल्या कसोटीने सुरुवात होत आहे. या कसोटीत ध्रुव जुरेल आणि देवदत्त पडिक्कल यांना अंतिम अकराच्या संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे, यशस्वी जैस्वालसोबत लोकेश राहुलने सलामीला येणे जवळपास निश्चित समजले जात आहे.

या मालिकेस सुरुवात होण्यापूर्वीच भारताला प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीचा फटका बसला. कर्णधार रोहित शर्माने मुलाच्या जन्मानंतरही पर्थ कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियाला न जाता भारतातच थांबण्याचा निर्णय घेतला, तर सरावादरम्यान शुभमन गिलचा अंगठा फ्रॅक्चर झाल्यामुळे तो पहिल्या कसोटीत खेळू शकत नसल्याचे स्पष्ट झाले. अशा परिस्थितीत भारत अ संघातर्फे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आलेला फलंदाज देवदत्त पडिक्कलला भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (बीसीसीआय) ऑस्ट्रेलियामध्येच थांबण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. मंगळवारी डावखुरा पडिक्कल भारताच्या सरावामध्ये सहभागी झाला. त्याने वेगवान आणि फिरकी गोलंदाजांसमोर फलंदाजीचा सराव केला. त्यामुळे, अंतिम संघातील त्याच्या समावेशाची शक्यता बळावली आहे. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याने दुसऱ्या डावामध्ये ८८ धावांची खेळी केली होती.

सहाव्या क्रमांकावरील फलंदाजासाठी सर्फराझ खान आणि ध्रुव जुरेल यांच्यामध्ये स्पर्धा आहे. यांपैकी सर्फराझला नुकत्याच झालेल्या भारत-न्यूझीलंड कसोटी क्रिकेट मालिकेतील दुसऱ्या व तिसऱ्या सामन्यामध्ये मोठी खेळी करण्यात अपयश आले होते. दुसरीकडे, जुरेलने ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात दोन्ही डावांमध्ये अर्धशतक झळकावले होते. त्यामुळे, सर्फराझऐवजी त्याला संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे.

रोहितच्या अनुपस्थितीत राहुल आणि अभिमन्यू ईश्वरन यांच्यापैकी एकजण सलामीला फलंदाजी करेल, असे भारताचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी स्पष्ट केले होते. ईश्वरनने अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले नसून पर्थच्या उसळत्या खेळपट्टीवर त्याचा समावेश संघात करणे धोक्याचे आहे. त्यामुळे, अनुभवी राहुलवरच सलामीची जबाबदारी सोपवली जाणे जवळपास निश्चित आहे.

बुमराहचा जोडीदार कोण?

बदली कर्णधार जसप्रीत बुमराह हा भारताचा प्रमुख गोलंदाज असला, तरी महंमद सिराज वगळता भारताची वेगवान गोलंदाजीची आघाडी नवखी आणि अननुभवी आहे. सिराजला मागील काही सामन्यांमध्ये प्रभावी कामगिरी करता आली नसल्याने भारतासमोरील चिंता वाढल्या आहेत. पर्थ कसोटीत भारताने तीन वेगवान गोलंदाज खेळवायचे ठरवल्यास आकाशदीप, प्रसिध कृष्णा व हर्षित राणा यांच्यापैकी एकास संधी मिळू शकते. हर्षित राणाने मंगळवारी बराच वेळ नेट्समध्ये गोलंदाजी केल्यामुळे त्याच्या अंतिम संघातील समावेशाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00