Home » Blog » राष्ट्रवादीच्या भवितव्यापुढे प्रश्नचिन्ह

राष्ट्रवादीच्या भवितव्यापुढे प्रश्नचिन्ह

राष्ट्रवादीच्या भवितव्यापुढे प्रश्नचिन्ह

by प्रतिनिधी
0 comments
NCP

-विक्रांत जाधव

राजकारणाचा खेळ बेभरवशी आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल आणि विधानसभा निवडणुकीचे निकाल यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला  तर काहीच हाती लागत नाही. साडेपाच महिन्यांत इतके काय बदलले की लोकसभेच्या दहापैकी आठ जागा जागा जिंकणा-या शरद पवार यांच्या पक्षाला विधानसभेला अवघ्या दहा जागा मिळाव्यात?

दोन जुलै, २०२२ च्या रविवारी महाराष्ट्र आणि मुंबई सुस्तावलेली असताना अचानक ब्रेकिग न्यूज आली. आधी अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर सगळे आमदार जमले होते. सुप्रिया सुळेसुद्धा तिथे होत्या. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदासंदर्भात चर्चा करण्यासाठी सगळे जमले असावेत असे सगळ्यांना वाटत होते. टीव्हीवरच्या बातम्याही तशाच होत्या. दरम्यान सुप्रिया सुळे बैठकीतून निघून गेल्या. आणि थोड्याच वेळात अजित पवार आणि त्यांचे सहकारी राजभवनावर दाखल झाले आणि त्यांच्या नऊ मंत्र्यांचा शपथविधीही उरकला. पहाटे (म्हणजे सकाळी आठ वाजता) शपथविधी करून धक्का देणा-या अजित पवार यांनी शरद पवार यांना दुस-यांदा धक्का देत दिवसा ढवळ्या राष्ट्रवादीत उभी फूट पाडली. त्यानंतर आम्हीच खरी राष्ट्रवादी असे दोन्ही गट सांगत होते. मात्र, लोकसभेत अवघी एक जागा जिंकल्यानंतर मनोबल खच्ची झालेल्या अजित पवार गटाने दमदार कामगिरी करत आपला पक्षच खरी राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचे सिद्ध केले.

जाहीर सभांमधून शरद पवार यांच्या वयाचा उल्लेख केला तर, `अजून मी म्हातारा झालोय का?` असा प्रतिसवाल करणा-या पवार यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. जंगी सभा घेऊन फुटीर नेत्यांना गद्दार असे संबोधत आक्रमक प्रचार केला. ७५ हून अधिक सभा घेत पवारांनी महाराष्ट्रात परिवर्तन घडवल्याशिवाय गप्प बसणार नाही असे ठासून सांगितले. लोकसभा निवडणुकीमुळे आत्मविश्वास दुणावलेल्या महाविकास आघाडीने जोरदार प्रचार केला. शेतीप्रश्न, पायाभूत सुविधा, ढासळलेली कायदा सुव्यवस्था, आर्थिक शिस्त बिघडवून जाहीर केलेल्या योजना आदी विषयांवरून जोरदार प्रचारमोहीम राबविली.

अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभावानंतर धडे घेत प्रतिमासंवर्धनाचा प्रयत्न केला. त्यासाठी खास एजन्सीही नेमली मात्र, ही एजन्सी प्रतिमासंवर्धनापेक्षा आपण कसे चर्चेत राहू यासाठीच धडपडत राहिली. गुलाबी रंगाचे फ्लेक्स, जाकिट, गाड्या आणि सर्व काही गुलाबी करणा-या अजित पवारांचा चेहरा मोहरा या एजन्सीने बदलला. कडक स्वभावाचे अजित पवार मृदू झाले. एकीकडे लोकसभेच्या निकालानंतर पवार यांनी आपणच हुकमी एक्का असल्याचे सिद्ध केले होते. लोकसभेचे निकाल पाहून धास्तावलेल्या अजित पवार यांच्या आमदारांनी पवार यांच्या पायरीवर डोके ठेवण्यासाठी गुप्तपणे रांग लावली होती. अजित पवार यांना बारामती लोकसभेत दारूण पराभवाला सामोरे जावे लागले होते. तेथे युगेंद्र पवार यांच्या रुपाने काका आणि पुतण्या अशी लढाई झाली. या लढतीत पवार स्वत: उतरतले होते. तरीही अजित पवार यांनी तब्बल एक लाखांहून अधिक मताधिक्य राखत बारामतीवर आपलीच पकड असल्याचे दाखवून दिले.

पवार यांना सोडून गेलेल्या दिग्गज नेत्यांमध्ये दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ यांनीही शरद पवार यांच्या आक्रमक प्रचाराला तोंड देत आपले गड राखले.

शरद पवार यांनी सर्व पातळ्यांवर लढाई लढत अजित पवार यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. ऐन विधानसभा निवडणुकीत सुप्रीम कोर्टात सुनावणी होऊन घड्याळ हे चिन्ह न्यायप्रविष्ठ आहे अशी ठसठशीत जाहिरात देण्याचे आदेश दिले. अजित पवार यांच्या मतदारसंघातच तगडे आव्हान निर्माण झाल्याने पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारालाही जाणे त्यांना शक्य झाले नाही. निवडणुकीदरम्यान पक्षात प्रवेश केलेल्या अभिनेते सयाजी शिंदे यांनी आपल्या खास स्टाइलने प्रचारात थोडीफार रंगत आणली. मात्र, निकालाच्या चित्रात अगदी खालच्या स्तरावर असलेल्या अजित पवार यांना या निकालामुळे बळ मिळाले. अगदी कमी जागा लढवूनही त्यांनी ४० हून अधिक जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेसवरील आपला दावा मजबूत केला. 

सुभेदारांनी गड राखले

शरद पवार यांचा पक्ष म्हणजे सुभेदारांचा पक्ष असे संबोधले जात होते. जिंकून येणारा आपला या न्यायाने जिल्ह्याजिल्ह्यात मातब्बर नेते पवारांनी सोबत घेतले होते. पक्षफुटीनंतर शरद पवारांचा गट उघडा पडला. मात्र, लोकसभेतील निकालाने चित्र बदलले. तगडे आव्हान उभे करून लढणा-या तरुणांना सोबत घेऊन पवारांनी रान उठवले. त्यामुळे अजित पवार गटात गेलेल्या सुभेदारांच्या पोटात गोळा आला होता. दोलायमान अवस्थेत असलेल्या या सुभेदारांना निकालाने तारले. किंबहुना निवडणुकीची सर्व तंत्रे आत्मसात असलेल्या नेत्यांनी जिंकून येण्यावर भर दिला. त्यामुळे शरद पवार यांच्या नवख्या शिलेदारांना पराभवाला सामोरे जावे लागले. रोहित पवार यांनी अखेरपर्यंत झुंजत गड राखला, रोहित आर. पाटील यांच्या रुपाने दुसरा रोहित सभागृहात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वाची ही दुसरी फळी महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावू शकते.

राजकारणाचा खेळ बेभरवशी आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल आणि विधानसभा निवडणुकीचे निकाल यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला  तर काहीच हाती लागत नाही. साडेपाच महिन्यांत इतके काय बदलले की लोकसभेच्या दहापैकी आठ जागा जागा जिंकणा-या शरद पवार यांच्या पक्षाला विधानसभेला अवघ्या दहा जागा मिळाव्यात? राजकारणात काहीही साध्य करायचे नाही, महाराष्ट्राच्या हितासाठी लढायचे आहे, अशी भूमिका घेऊन ८४ व्या वर्षी मैदानात उतरलेल्या पवार यांनाही महाराष्ट्राने का प्रतिसाद दिला नाही. महिला धोरण, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी राखीव जागा, महिलांन नोक-यांमध्ये राखीव जागा, सैन्य दलात महिलांना प्रवेश असे महिलाकेंद्री अनेक निर्णय घेणा-या शरद पवार यांच्यासमोर लाडकी बहीण योजनेचे दीड हजार रुपये वरचढ ठरल्याचे दिसून आले. 

या सगळ्यानंतर एक प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेससंदर्भात सर्वोच्च न्यायालयात असलेल्या प्रकरणाचे काय होणार? खरेतर सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेसंदर्भात प्रकरण प्रलंबित ठेवून न्यायाचा पोरखेळ करून टाकला. दोन वर्षे पदावर राहूनही सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी निर्णय प्रलंबित ठेवून पलायनवादी भूमिका स्वीकारली. आता विधानसभा निवडणुकीचा हवाला देऊन खरी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचीच आहे, असे शिक्कामोर्तब सर्वोच्च न्यायालयाने केले तरी आश्चर्य वाटायला नको. शिवसेनेबाबतही तसेच होऊ शकते. आणि सर्वोच्च न्यायालयाने तसा निर्णय़ दिला  आणि तो घटनाबाह्य असला तरी लोकांना त्यात गैर काही वाटणार नाही. कारण विधानसभा निवडणुकीचे निकाल अजित पवार यांच्या बाजूने आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्यासंदर्भात प्रश्न उपस्थित झाले आहेत. एका नव्हे, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्यापुढे प्रश्नचिन्ह आहे!

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00