लाहोर : न्यूझीलंडने चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात बुधवारी दक्षिण आफ्रिकेचा ५० धावांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. केन विल्यमसन व रचिन रवींद्रच्या शतकांच्या जोरावर न्यूझीलंडने ६ बाद ३६२ धावा केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेला ९ बाद ३१२ धावांवर रोखले. त्यामुळे ९ मार्च रोजी रंगणाऱ्या अंतिम सामन्यात भारतासमोर न्यूझीलंडचे आव्हान असणार आहे. (Newzealand Win)
लाहोरच्या गदाफी स्टेडियमवर हा सामना रंगला. लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची पहिली विकेट रायन रिकलटनच्या रूपाने पाचव्या षटकातच पडली. त्यानंतर, कर्णधार तेंबा बावुमा आणि रॉसी व्हॅनडेर डुसन यांनी वैयक्तिक अर्धशतके झळकावतानाच दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारीही रचली. अर्धशतकानंतर हे दोघेही मिचेल सँटनरचे बळी ठरले. सँटनरने प्रथम ७१ चेंडूंमध्ये ४ चौकार व एका षटकारासह ५६ धावा करणाऱ्या बावुमाला बाद केले. त्यानंतर, त्यानेच ६६ चेंडूंमध्ये ४ चौकार व २ षटकारांसह ६९ धावा करणाऱ्या डुसनचा त्रिफळा उडवला. डेव्हिड मिलरचा अपवाद वगळता आफ्रिकेची मधली फळी मोठी खेळी करण्यात अपयशी ठरली. मिलरने अखेरपर्यंत लढा देत ६७ चेंडूंमध्ये १० चौकार व ४ षटकारांसह नाबाद १०० धावा केल्या. मात्र, न्यूझीलंडच्या आव्हानासमोर त्याचे प्रयत्न अपुरे ठरले. न्यूझीलंडकडून सँटनरने ३, तर फिलिप्स व मॅट हेन्रीने प्रत्येकी २ विकेट घेतल्या. (Newzealand Win)
तत्पूर्वी, न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. विल यंग आणि रचिन रवींद्र यांनी न्यूझीलंडला ४८ धावांची सलामी दिली. यंग बाद झाल्यानंतर रवींद्र आणि केन विल्यमसन यांनी न्यूझीलंडच्या डावास आकार दिला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १६४ धावांची भागीदारी रचत संघाचे द्विशतक पूर्ण केले. चौतिसाव्या षटकात रबाडाने रचिनला बाद करून ही जोडी फोडली. रचिनने कारकिर्दीतील पाचवे वन-डे शतक झळकावताना १०१ चेंडूंमध्ये १३ चौकार व एका षटकारासह १०८ धावांची खेळी केली. त्यानंतर, विल्यमसनने डॅरेल मिचेलच्या साथीने धावगती वाढवण्यावर भर दिला. चाळीसाव्या षटकात विल्यमसनने ९१ चेंडूंमध्ये पंधरावे वन-डे शतक साजरे केले. शतकानंतर लगेचच तो मुल्डरचा बळी ठरला. त्याने ९४ चेंडूंमध्ये १० चौकार व २ षटकारांसह १०२ धावा केल्या. (Newzealand Win)
अखेरच्या दहा षटकांमध्ये अगोदर मिचेल आणि नंतर ग्लेन फिलिप्सने फटकेबाजी करून न्यूझीलंडला साडेतीनशेपार पोहोचवले. मिचेल ४९ धावांवर बाद झाला, तर फिलिप्सने नाबाद ४९ धावा फटकावल्या. आफ्रिकेकडून लुंगी एन्गिडीने ३, तर कॅगिसो रबाडाने २ विकेट घेतल्या. (Newzealand Win)
संक्षिप्त धावफलक : न्यूझीलंड – ५० षटकांत ६ बाद ३६२ (रचिन रवींद्र १०८, केन विल्यमसन १०२, डॅरेल मिचेल ४९, ग्लेन फिलिप्स नाबाद ४९, लुंगी एन्गिडी ३-७२, कॅगिसो रबाडा २-७०) विजयी विरुद्ध दक्षिण आफ्रिका – ५० षटकांत ९ बाद ३१२ (डेव्हिड मिलर नाबाद १००, रॉसी व्हॅनडेर डुसन ६९, तेंबा बावुमा ५६, मिचेल सँटनर ३-४३, ग्लेन फिलिप्स २-२७)
हेही वाचा :
टेबल टेनिसपटू शरथची निवृत्तीची घोषणा
स्टीव्ह स्मिथ वन-डेतून निवृत्त