Home » Blog » Naveed Mushrif : म्हैस व गाय दूध खरेदी दरात वाढ

Naveed Mushrif : म्हैस व गाय दूध खरेदी दरात वाढ

by प्रतिनिधी
0 comments
Naveed Mushrif

कोल्हापूर  : प्रतिनिधी :  कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळने म्हैस आणि गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर एक रुपयाने वाढ केली आहे. गणेशोत्सवानिमित्त  दूध उत्पादकांना दरवाढीची भेट मिळाली आहे. एक सप्टेंबरपासून खरेदी दूध दरवाढ लागू होणार आहे. सद्यस्थितीत गोकुळ दुधाच्या विक्री दरामध्ये कोणतेही वाढ करण्यात आलेली नाही. गोकुळचे अध्यक्ष नाविद मुश्रीफ यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. (Naveed Mushrif)

 दूध उत्पादकांना आर्थिक दिलासा देण्याच्या हेतूने संघाशी संलग्न म्हैस व गाय दूध उत्पादकांना दूध संकलन वाढविणेस प्रोत्साहन मिळावे म्हणून संघाने सध्याचे म्हैस व गाय दूध खरेदी दरामध्ये प्रतिलिटर एक रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. एक सप्टेंबरपासून जिल्ह्यातील म्हैस दूध खरेदी दरामध्ये ६.० फॅट व ९.० एस.एन.एफ करीता प्रतिलिटर रुपये ५०.५० वरून रूपये ५१.५० करण्यात आला आहे. तसेच ६.५ फॅट व ९.० एस.एन.एफ करीता प्रतिलिटर रूपये ५४.८० वरून रूपये ५५.८० करण्यात आला आहे. गाय दुधामध्ये ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ करीता प्रतिलिटर गाय दूध खरेदी दर ३२.०० रूपये वरून ३३.०० रूपये करण्यात आला आहे. या दर वाढीमुळे गोकुळच्या म्हैस व गाय दूध उत्पादकांना महिन्याकाठी जवळ-जवळ साडे चार ते पाच कोटीचा जादाचा दर मिळणार आहे. (Naveed Mushrif)

गोकुळशी संलग्न दूध संस्था इमारत अनुदान वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.  दूध संस्थेच्या संकलनानुसार अनुदानात रक्कमेत ८ ते १० हजार रुपयाची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दूध संस्था कर्मचारी हे दूध उत्पादक व संस्था यांच्यामध्ये दुवा असल्याने त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्राथमिक दूध संस्थाच्या कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी प्रोत्साहनपर जादा दर प्रतिलिटर पाच पैशाची वाढ करण्यात येणार असून ती प्रतिलिटर ०.६५ पैसे ऐवजी ०.७० पैसे करण्यात आली आहे. याचा जवळ-जवळ तीन कोटी रुपये वार्षिक आर्थिक भार संघावरती पडणार आहे.

 गोकुळ दूध संघाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या मुक्त गोठा अनुदान योजनेत यापूर्वी किमान पाच जनावरांपर्यंत असणाऱ्या गोठ्यांनाच अनुदान दिले जात होते. ती अट शिथिल करून लहान दूध उत्पादकांनाही या योजनेचा लाभ मिळावा म्हणून किमान पाच ऐवजी चार जनावरे असलेल्या मुक्त गोठ्याला अनुदान दिले जाणार आहे. (Naveed Mushrif)

          गोकुळ दूध संघाला जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील ७ हजार ५०० प्राथमिक दूध संस्थांच्या माध्यमातून जवळ-जवळ १६ लाख लिटर प्रतिदिन संकलन केले जाते. “गोकुळचे दूध उत्पादक हेच केंद्रबिंदू असून त्यांच्या श्रमाला न्याय मिळावा यासाठी गोकुळ नेहमीच कार्यरत राहिला आहे. दूध उत्पादक, संस्था, सचिव, कर्मचारी प्रत्येक घटक हा गोकुळ परिवाराचा अविभाज्य भाग आहे. दूध उत्पादकांच्या प्रगतीसाठी आणि दुग्ध व्यवसाय वाढीसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. असे गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी सांगितले.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00