Home » Blog » medicine shortage: प्रयागराजपुढे आरोग्यसंकट!

medicine shortage: प्रयागराजपुढे आरोग्यसंकट!

औषध तुटवड्यामुळे रूग्ण आणि रुग्णालये अडचणीत

by प्रतिनिधी
0 comments
medicine shortage

प्रयागराज : महाकुंभमेळ्यासाठी देशभरातील भाविक मोठ्या संख्येने येत आहेत. भाविकांचा उत्साह मोठा आहे. त्यामुळे दिवसेंदिवस गर्दीचा उच्चांक होत आहे. या गर्दीबरोबर काही संकटेही उभी ठाकली आहेत. महाकुंभकाळात काही दुर्घटना आणि अपघात घडले. त्यात अनेकांचा जीव गेला. येथील पाणी प्रदूषणाने मोठे संकट निर्माण केल्याची बातमी नुकतीच येऊन गेली. आता प्रयागराजपुढे मोठे आरोग्य संकट उभे राहिले आहे. ते म्हणजे येथील घाऊक औषध बाजार बंदच ठेवावा लागला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील औषधे दुकाने आणि रुग्णालयांना औषधे आणि इतर वैद्यकीय साहित्याचा पुरवठा होऊ शकलेला नाही.(medicine shortage)

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, भाविकांच्या सततच्या गर्दीमुळे प्रयागराजमधील घाऊक औषध बाजारात ‘अनधिकृत’ बंदसारखी स्थिती आहे. त्यामुळे शहरासमोर जीवनावश्यक आणि जीवरक्षक औषधांच्या टंचाईच्या भीषण संकटाचा सामना करावा लागत आहे. व्यापारी आणि फार्मास्युटिकल पुरवठादारांकडून वारंवार विनंती करूनही, अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या परिसरातील रहिवासी आणि वैद्यकीय व्यावसायिकांमध्ये चिंता वाढत आहे, असे कपिल दीक्षित सांगतात. (medicine shortage)

लीडर रोड हे शहरातील सर्वांत मोठे घाऊक औषध बाजारपेठेचे केंद्र आहे. हा रोड संगम ते रेल्वे स्थानकादरम्यानचा सर्वांत वर्दळीचा आहे. त्यामुळे वैद्यकीय साहित्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. कुंभ सुरू झाल्यापासून म्हणजे जानेवारीच्या मध्यापासून हीच स्थिती आहे. त्यामुळे बाजारपेठ पूर्णक्षमतेने चालत नाही, सतत काही ना काही अडचणीचा सामना करावा लागत आहे. याला कारण म्हणजे या मार्गावरील भाविकांचा सततचा ओघ. याचा थेट परिणाम म्हणून औषधांचा साठा घाऊक आणि किरकोळ अशा दोन्ही स्तरांवर जवळपास संपला आहे. ज्यामुळे रुग्ण आणि रुग्णालये संकटात सापडली आहेत. विशेषत: रक्तदाब, हृदयरोग आणि मधुमेही रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले आहे. (medicine shortage)

अलाहाबाद केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे प्रमुख अनिल दुबे सांगतात, ‘‘२४ जानेवारीपासून घाऊक औषध व्यवसायात गुंतलेल्या व्यापाऱ्यांचा व्यवसाय अक्षरश: बसला आहे. ते नीट काम करू शकले नाहीत. यामुळे मागणी आणि पुरवठा यांच्यात मोठी तफावत निर्माण झाली आहे. आता तर ती वाढतच चालली आहे.’’

औषध वाहतूक वाहनांना प्रवेश बंदी

औषधांची वाहतूक करणाऱ्या ट्रकना शहराच्या हद्दीत प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे पुरवठा साखळी मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाल्याच्या तक्रारी व्यापाऱ्यांनी वारंवार जिल्हा प्रशासनाकडे केल्या आहेत. ‘‘असोसिएशनच्या सदस्यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना औषधांच्या कमतरतेची तीव्रता जाणवून देण्याचा प्रयत्न अनेकदा केला, परंतु त्यांना बहिरेपण आल्यासारखी स्थिती आहे. त्यांच्याकडून कसलाच प्रतिसाद मिळत नाही,’’असे दुबे म्हणाले. (medicine shortage)

पोलीस आणि जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या प्रवेशबंदीच्या कडक अंमलबजावणीमुळे कोणताही वाहतूकदार लीडर रोडवर औषधे पुरवठ्यासाठी यायला तयार नाही.

दुसरीकडे सरकारी अधिकाऱ्यांनी मात्र येथील बाजार बंद ठेवण्याचा कोणताही अधिकृत आदेश नसल्याचे सांगितले. तसेच औषधतुटवड्यामुळे निर्माण झालेल्या संकटाची बाब फेटाळून लावली आहे.

हेही वाचा :

सासूला मारण्यासाठी डॉक्टरकडे गोळ्यांची मागणी

अ.भा. साहित्य संमेलनाचा प्रारंभ

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00