Home » Blog » Martyr’s name changed: शाळेला दिलेले परमवीर चक्र नायकाचे नाव बदलले

Martyr’s name changed: शाळेला दिलेले परमवीर चक्र नायकाचे नाव बदलले

उत्तर प्रदेशच्या गाझीपूर शिक्षण प्रशासनाच्या निर्णयावर जोरदार टीका

by प्रतिनिधी
0 comments
Martyr's name changed

लखनौ : भारत-पाकिस्तानदरम्यान १९६५ मध्ये झालेल्या युद्धादरम्यान अपूर्व शौर्य दाखवत शत्रू राष्ट्राचे अनेक रणगाडे उद्ध्वस्त करत आपल्या प्राणाची आहुती देणारे अब्दुल हमीद यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सरकारी शाळेला त्यांचे नाव देण्यात आले होते. मात्र ते बदलून उत्तर प्रदेशच्या गाझीपूर शिक्षण प्रशासनाने पीएम श्री कंपोझिट विद्यालय धामुपूर असे केले आहे. शिक्षण प्रशासनाने उचललेल्या या वादग्रस्त पावलावर टिकेची झोड उठली आहे. (Martyr’s name changed)

शहीद वीर अब्दुल हमीद यांचे कुटुंबीय आणि आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनी या निर्णयावर तीव्र टीका केली होती.

धामूपूर येथील शाळेला वीर अब्दुल हमीद यांचे नाव देण्यात आले होते. मात्र ते बदलण्याच्या निर्णयावर हमीद यांचे नातू जमील आलम यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. तसेच त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करून तत्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

आपल्या आजोबांनी देशासाठी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाच्या सन्मानार्थ शाळेला नाव दिले होते. मात्र ते हटवून त्यांचा अपमान केला असल्याचे आलम यांनी म्हटले आहे.

‘अमर उजाला’च्या वृत्तानुसार, जमील आलम यांनी दूरध्वनीद्वारे मूलभूत शिक्षण अधिकाऱ्यां (BSA) कडे त्यांची अधिकृत तक्रार दाखल केली. त्यावर बीएसए हेमंत राव यांनी, शाळेच्या कागदपत्रांमध्ये शहीद वीर अब्दुल हमीद शाळा असा उल्लेख नसल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. मी या प्रकरणात लक्ष घालेन. शहिदांचा सन्मान सर्वांपेक्षा महत्त्वाचा आहे. तो राखला पाहिजे, असे म्हटले आहे.

तीव्र संतापाची लाट

या प्रकारावर खासदार चंद्रशेखर आझाद रावण यांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली. स्वातंत्र्यासाठी आणि युद्धकाळात लढलेल्या मुस्लिम सैनिकांचे नाव हेतुपुरस्सर वगळले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपच्या विचारधारेशी मिळतीजुळतीच ही भूमिका असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगढ़ी यांनीही या कृत्यावर टीका केली आहे. त्यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे की, गाझीपूरच्या शिक्षण विभागाने परमवीर चक्र विजेते वीर अब्दुल हमीद शाळेचे नाव बदलण्याचे केलेले कृत्य अत्यंत निंदनीय आहे. यापूर्वीही शाळेच्या मुख्याध्यापकांनी असा प्रयत्न केला आहे. सरकारला विनंती आहे की, अब्दुल हमीद ज्या शाळेत ५ वी पर्यंत शिकले, ती शाळा त्यांचे स्मारक म्हणून जतन करा. शाळेचे नाव पूर्ववत वीर अब्दुल हमीद असे ठेवावे. नाव बदलण्याचा वारंवार प्रयत्न करणाऱ्यांवर शिक्षण विभागाने कारवाई करावी.

भीम आर्मीचे प्रमुख आणि खासदार चंद्रशेखर आझाद रावण यांनी शाळेचे पूर्वीचे नाव पूर्ववत करण्याची मागणी केली. ‘परमवीर चक्र विजेते वीर अब्दुल यांच्या नावाने स्थापन केलेल्या शाळेचे नाव बदलणे हे केवळ निंदनीयच नाही; तर एका महान योद्ध्याच्या सर्वोच्च बलिदानाचाही अपमान आहे,’ असे ते म्हणाले.

कोण होते अब्दुल हमीद?

क्वार्टर मास्टर पीव्हीसी हवालदार अब्दुल हमीद यांचा जन्म १ जुलै १९३३ रोजी उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यातील धामुपूर गावात झाला. १९५४ मध्ये वयाच्या २० व्या वर्षी अब्दुल हमीद वाराणसी येथे सैन्यात भरती झाले.

१९६५ च्या भारत-पाक युद्धात हवालदार अब्दुल हमीद यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. पाकिस्तानी सैन्याविरुद्ध त्यांनी जे शौर्य दाखवले ते अतुलनीय आहे. पाकिस्तानने अमेरिकेकडून प्रसिद्ध पॅटन रणगाडे घेतले होते. या रणगाड्यांच्या ताफ्यासह पाकिस्तानने ९-१० सप्टेंबर १९६५ दरम्यान खेम करन सेक्टरमधील चीमा गावाजवळील मोक्याच्या ठिकाणावर हल्ला केला.

या युद्धादरम्यान, वीर अब्दुल हमीद यांनी सर्वोच्च बलिदान दिले. या युद्धात त्यांनी शत्रूचे अनेक रणगाडे उद्ध्वस्त केले. त्यांच्या या शौर्याबद्दल त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र सन्मान बहाल करून त्यांचा भारत सरकारने गौरव केला आहे.

हेही वाचा :

नवी दिल्लीला भूकंपाचे धक्के
हरवलेल्यांच्या शोधांत धास्तावलेले चेहरे…

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00