इम्फाळ : वृत्तसंस्था : मणिपूरमधील तणाव कमी होण्याची चिन्हे नाहीत. हिंसाचारामुळे सरकारने शाळा आणि महाविद्यालये अनिश्चित काळासाठी बंद केली आहेत. दरम्यान, एका घटनेने सुरक्षा यंत्रणा पुन्हा एकदा चिंतेत आहेत. येथील लष्करी छावणीत काम करणारा तरुण बेपत्ता झाला असून, त्याच्या शोधासाठी शोधमोहीम सुरू आहे. येथे ड्रोन, ट्रॅकर आणि श्वानपथकाच्या मदतीने पथक तरुणाचा शोध घेत आहे.
संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले, की आसामच्या कचार जिल्ह्यातील मूळ रहिवासी लैश्राम कमलबाबू सिंग सोमवारी दुपारी कांगपोकपी येथील लीमाखाँग मिलिटरी स्टेशनवर कामासाठी जाण्यासाठी घरातून निघाले होते, तेव्हापासून तो बेपत्ता आहे. त्यांच्या कुटुंबीयांशी चर्चा केली, तेव्हा सिंग २५ नोव्हेंबरच्या संध्याकाळी घरी परतले नाहीत. कुटुंबीयांकडून माहिती मिळाल्यानंतर लष्कर तातडीने कारवाईत आले. या तरुणाबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले, की सीसीटीव्ही फीड स्कॅन केले जात आहे. ट्रॅकर आणि श्वानपथकाच्या मदतीने शोध घेतला जात आहे. शोध घेतल्यानंतरही या तरुणाचे वाहन किंवा त्याची कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.
लष्कराच्या अधिकाऱ्यांनी बेपत्ता व्यक्तीचा शोध घेण्यासाठी त्या भागातील ‘सीएसओ’शीही बोलणे केले आहे. सिंग यांच्या कुटुंबात लवकर आणि सुरक्षित परतण्यासाठी काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेने पुन्हा एकदा इम्फाळ खोऱ्यातील सीमावर्ती भागात तणाव निर्माण झाला आहे. मैतेई समुदायातील शेकडो लोकांनी सिंह याचा शोध घेण्यासाठी लष्करी ठाण्याकडे कूच करण्यास सुरुवात केली, तथापि परिस्थिती चिघळू नये, म्हणून त्यांना मध्यभागी थांबविण्यात आले. मोर्चा आटोपल्यानंतर जमावाने दगडफेक करून ‘रास्ता रोको’ केले. आंदोलकांनी दावा केला, की सिंह यांचे अतिरेक्यांनी अपहरण केले. राज्य सरकारला त्यांच्या सुटकेसाठी अतिरिक्त सैन्य पाठवण्यास सांगितले.
अतिरेक्यांनी पळवल्याचा संशय
आर्मी कॅम्प शहरापासून लांब आहे. हा भाग कुकी लोक राहत असलेल्या टेकड्यांनी वेढलेला आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात वांशिक हिंसाचार सुरू झाल्यानंतर लिमाखोंगजवळ राहणारे मैतेई समुदायाचे लोक तेथून पळून गेले. या हिंसाचारात आता २५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मैतेई समाजाच्या या तरुणाला कुकी अतिरेक्यांनी पळवल्याचा आरोप आहे.