क्वालालंपूर : मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेमध्ये भारताच्या सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने गुरुवारी उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. या दोघांचा अपवाद वगळता गुरुवारचा दिवस भारतासाठी निराशाजनक ठरला. पुरुष एकेरी, महिला एकेरी, महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरीच्या गटात भारतीय बॅडमिंटनपटूंना पराभवाचा सामना करावा लागला. (Malaysia open)
पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी या जोडीला स्पर्धेत सातवे मानांकन आहे. उपउपांत्यपूर्व फेरीमध्ये त्यांनी मलेशियाच्या नूर महंमद अझ्रियन अयुब अझ्रियन-वी किआँग तान या जोडीचा ४३ मिनिटांमध्ये २१-१५, २१-१५ असा पराभव केला. सात्विक-चिरागच्या वेगवान आणि आक्रमक खेळापुढे प्रतिस्पर्ध्यांचा निभाव लागला नाही. उपांत्यपूर्व फेरीत त्यांच्यासमोर मलेशियाच्याच यू सिन आँग-ई यी तेओ या जोडीचे आव्हान आहे. अन्य सर्व गटांमध्ये भारतीय बॅडमिंटनपटूंना पराभव पत्करावा लागल्याने भारताच्या आशा फक्त याच जोडीवर टिकून आहेत. (Malaysia open)
पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीमध्ये चीनच्या सातव्या मानांकित शी फेंग ली याने भारताच्या एच. एस. प्रणॉयला २१-८, १५-२१, २३-२१ असे नमवले. हा सामना १ तास २२ मिनिटे रंगला. या सामन्यात पहिला गेम गमावल्यानंतर प्रणॉयने दुसरा गेम जिंकून जोरदार पुनरागमन केले. तिसऱ्या व निर्णायक गेममध्ये दोन्ही बॅडमिंटनपटूंमध्ये तुल्यबळ लढत झाली. अखेर लीने हा गेम २३-२१ असा जिंकून विजयावर शिक्कामोर्तब केले. प्रणॉयच्या पराभवामुळे पुरुष एकेरीतील भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. भारताच्या लक्ष्य सेन, प्रियांशू राजावत या खेळाडूंना एकेरीच्या यापूर्वीच्या फेऱ्यांमध्येच पराभव पत्करावा लागला होता. (Malaysia open)
महिला दुहेरीमध्ये भारताची ट्रिसा जॉली-गायत्री गोपिचंद ही सहावी मानांकित जोडीही उपउपांत्यपूर्व फेरीमध्ये पराभूत झाली. चीनच्या यी फान जिआ-शू शियान झँग या जोडीने तीन गेमपर्यंत रंगलेल्या लढतीत ट्रिसा-गायत्री यांच्यावर १५-२१, २१-१८, २१-१९ अशी मात केली. मिश्र दुहेरीमध्ये भारताच्या दोन्ही जोड्यांना उपउपांत्यपूर्व फेरीमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. चीनच्या सातव्या मानांकित शिंग चेंग-ची झँग या जोडीने भारताच्या ध्रुव कपिला-तनिशा क्रॅस्टो या जोडीला २१-१३, २२-२० असे पराभूत केले. दुसऱ्या लढतीत यजमान मलेशियाच्या सून हुआत गोह-शेव्हॉन जेमी लाई या चतुर्थ मानांकित जोडीने भारताच्या सतीशकुमार करुणाकरन-आद्या वरियाथ या जोडीचा २१-१०, २१-१७ असा पराभव केला. महिला एकेरीमध्ये उपउपांत्यपूर्व फेरीत भारताची मालविका बनसोड चीनच्या तृतीय मानांकित यूए हानकडून पराभूत झाली. हानने हा सामना अवघ्या ३७ मिनिटांमध्ये २१-१८, २१-१८ असा जिंकला. (Malaysia open)
हेही वाचा :
‘खंडोबा’ला ‘जुना बुधवार’ने रोखले