Home » Blog » Lucknow Wins : लखनौ ‘टॉप फोर’मध्ये

Lucknow Wins : लखनौ ‘टॉप फोर’मध्ये

गुजरात टायटन्सला ६ विकेटनी हरवून गुणतक्त्यात तिसऱ्या स्थानी

by प्रतिनिधी
0 comments
Lucknow Wins

लखनौ : निकोलस पूरन व एडन मार्करमच्या अर्धशतकांच्या जोरावर लखनौ सुपरजायंट्सने आयपीएलमध्ये शनिवारी गुजरात टायटन्सचा ६ विकेटनी पराभव केला. गुजरातला ६ बाद १८० धावांवर रोखून लखनौने १९.३ षटकांत ४ बाद १८६ धावा केल्या. या विजयासह लखनौ गुणतक्त्यात तिसऱ्या स्थानी पोहोचला असून त्यांच्या खात्यात ८ गुण आहेत. (Lucknow Wins)

लखनौच्या अटलबिहारी वाजपेयी स्टेडियमवर हा सामना रंगला. लखनौने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररण स्वीकारले. गुजराततर्फे साई सुदर्शन आणि कर्णधार शुभमन गिल यांनी वेगवान सुरुवात करत १२ षटकांत संघाला १२० धावांची सलामी दिली. तेराव्या षटकात आवेश खानने शुभमनला बाद करून ही जोडी फोडली. शुभमनने ३८ चेंडूंमध्ये ६ चौकार व एका षटकारासह ६० धावांची खेळी केली. पुढच्याच षटकात रवी बिश्नोईने सुदर्शनला बाद केले. सुदर्शन ३७ चेंडूंमध्ये ७ चौकार व एका षटकारासह ५६ धावा करून बाद झाला. हे दोघे बाद झाल्यानंतर गुजरातच्या धावगतीला ब्रेक लागला आणि अखेर त्यांना २० षटकांमध्ये १८० धावांपर्यंतच मजल मारता आली. लखनौकडून शार्दुल ठाकूर आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. यादरम्यान, शार्दुलने टी-२० क्रिकेटमधील २०० बळींचा टप्पाही पार केला. (Lucknow Wins)

गुजरातच्या आव्हानाचा पाठलाग करताना मार्करमच्या साथीने कर्णधार रिषभ पंत सलामीला आला. या दोघांनी पॉवर-प्लेमध्ये बिनबाद ६१ धावा ठोकल्या. प्रसिध कृष्णाने पंतला २१ धावांवर माघारी पाठवून लखनौला पहिला धक्का दिला. त्यानंतर, मार्करम आणि निकोलस पूरन यांनीही दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली. अखेर प्रसिधनेच मार्करमलाही बाद केले. मार्करमने ३१ चेंडूंमध्ये ९ चौकार व एका षटकाराच्या मदतीने ५८ धावांची खेळी केली. पूरनने फटकेबाजी सुरू ठेवत यंदाच्या आयपीएलमधील सलग दुसरे व एकूण चौथे अर्धशतक झळकवून ऑरेंज कॅपच्या शर्यतीतील अग्रस्थान बळकट केले. त्याने ३४ चेंडूंमध्ये १ चौकार व ७ षटकारांच्या आतषबाजीसह ६१ धावा फटकावल्या. आयुष बदोनीने २८ धावांवर नाबाद राहत अखेरच्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर षटकार खेचून लखनौचा विजय साकारला. गुजरातचा हा यंदाच्या मोसमातील दुसरा पराभव ठरला. या पराभवामुळे गुजरातला गुणतक्त्यातील अग्रस्थान गमवावे लागले असून ते ८ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहेत. (Lucknow Wins)

संक्षिप्त धावफलक : गुजरात टायटन्स – २० षटकांत ६ बाद १८० (शुभमन गिल ६०, साई सुदर्शन ५६, शेर्फेन रुदरफोर्ड २२, शार्दुल ठाकूर २-३४, रवी बिश्नोई २-३६) पराभूत विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स – १९.३ षटकांत ४ बाद १८६ (निकोलस पूरन ६१, एडन मार्करम ५८, आयुष बदोनी नाबाद २८, प्रसिध कृष्णा २-२६, वॉशिंग्टन सुंदर १-२८).

हेही वाचा :
ग्लेन फिलिप्स आयपीएलमधून बाहेर
विनेश उभारणार क्रीडा अकादमी

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00