मुंबई : प्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामरा यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात तीव्र वादळ उठले आहे. कामरा यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर थेट टीका केली. नामोल्लेख न करता त्यांना ‘गद्दार’ (देशद्रोही) असे संबोधले. (Kunal Kamra row)
त्यानंतर संतप्त झालेल्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये तोडफोड केली. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी सोमवारी शिवसेनेचे सोशल मीडिया प्रभारी राहुल कनाल, वांद्रे विभाग प्रमुख कुणाल सरमलकर आणि इतर १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
खार पोलिस ठाण्याच्यावतीने कनाल आणि इतरांना चौकशीसाठी बोलावले आहे. (Kunal Kamra row)
दरम्यान, शिवसेनेचे उपनेते संजय निरुपम यांनी कामरा यांना मारहाण करण्याची धमकी दिली आहे. पोलिसांनी युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये सुरक्षा वाढवली आहे.(Kunal Kamra row)
रविवारी रात्री शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खुर्च्या आणि संपूर्ण सेटची तोडफोड केल्याचा आरोप आहे. शिवसेना आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील वागळे इस्टेट पोलिस ठाण्याबाहेर शिवसैनिकांनी कामरा यांच्या प्रतिमेचे दहन केले.
कामरा यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी करत शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते पोलिस ठाण्याबाहेर जमले.
“मेरी नजर से तुम देखो तो गद्दार नजर वो आये। है,” असे विधान कुणाल कामरा यांनी त्याच्या शो दरम्यान केले होते.
त्याने “दिल तो पागल है” मधील एका हिंदी गाण्याच्या आधारावर एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवली. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये हशा पिकला. कामरांनी ही व्हिडिओ क्लिप सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केली. कुणाल कामरा यांनी एकनाथ शिंदे यांच्या २०२२ च्या बंडाचा उल्लेख कार्यक्रमात केला. (Kunal Kamra row)
शिवसेना आमदार मुरजी पटेल यांनी कुणाल कामरा यांच्याविरुद्ध अंधेरी येथील एमआयडीसी पोलिस ठाण्यात कलम ३५३(१) (ब), ३५३(२) आणि ३५६(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
त्याचप्रमाणे, कनाल यांनी खार पोलिस ठाण्यात कुणाल कामरा, आदित्य ठाकरे, राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत तक्रार दाखल केली. पूर्वनियोजित गुन्हेगारी कट रचण्यात आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा, प्रतिमा खराब करण्यासाठी पद्धतशीरपणे पैसे देऊन केलेल्या मोहिमेत सहभागी असल्याचा आरोप करत ही फौजदारी तक्रार दाखल केली आहे.
‘द हॅबिटॅट स्टुडिओ’वर हल्ला
शिवसेना (शिंदे गट) च्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील खार येथील लोकप्रिय ‘द हॅबिटॅट स्टुडिओ’वर हल्ला केला. येथे कामरा यांचा ‘इंडियाज गॉट लेटेंट’ हा शो रेकॉर्ड करण्यात आला होता. निषेध म्हणून त्यांनी मालमत्तेची तोडफोड केल्याचा आरोप आहे. शेवटी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. या तोडफोडीत सहभागी असलेल्या ३५ हून अधिक कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Kunal Kamra row) दरम्यान, गृहमंत्री योगेश कदम यांनी सांगितले की, मुंबई पोलिसांनी कामरा यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. त्यांचा शोध सुरू आहे.

कामरांनी माफी मागावी : फडणवीस
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुणाल कामरा प्रकरणावर भाष्य करताना स्पष्ट केले की स्टँड-अप कॉमेडी स्वागतार्ह आहे, मात्र अभिव्यक्ती स्वातंत्र्यालाही मर्यादा आहेत. कामरा यांनी या प्रकरणी माफी मागावी, असे त्यांनी म्हटले आहे. तुम्ही आमच्या सर्वांविरुद्ध विनोद आणि व्यंग सादर करू शकता, आम्ही त्यांचे कौतुक करू पण जो ‘सुपारी’ घेऊन लोकांचा अपमान करत आहे त्याला कारवाईला सामोरे जावे लागेल. त्याला सोडणार नाही. आम्ही हे सहन करणार नाही, आम्ही त्याला धडा शिकवू,” असे फडणवीस म्हणाले. “कुणाल कामरासारख्या डाव्या उदारमतवादी आणि शहरी नक्षलवाद्यांचा एकच उद्देश आहे. तो म्हणजे, सन्माननीय व्यक्ती, प्रतिष्ठित संस्थांची बदनामी करणे आणि लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास उडवणे. मी विधानसभेला आश्वासन देतो की त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल,” असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
गद्दारांचे उद्दात्तीकरण मान्य आहे का?: उद्धव ठाकरेंचा सवाल
फडणवीस यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. तसेच कुणाल कामरांची पाठराखण केली. ते म्हणाले, त्यांनी व्यंगात्मक गाणे केले नाही, ते सत्यात्मक गाणे आहे. त्याने जनभावना मांडल्या, आम्ही आजही बोलत आहोत. चोरी करतात ते गद्दार आहेत. काल कुणाल कामराच्या ठिकाणी केलेली तोडफोड शिवसैनिकांनी केलेली नाही, त्यांचा शिवसेनेशी संबंध नाही, असे ते म्हणाले. सीएम फडणवीसांच्या सुपारी घेऊन बोलतात या वक्तव्याचा सुद्धा त्यांनी समाचार घेतला. मग नागपूरची, थडग्याची सुपारी कोणी दिली? गद्दारांचे उद्दातीकरण मान्य आहे का? असा सवालही ठाकरे यांनी केला.
स्वातंत्र्य म्हणजे अनियंत्रित वर्तन नसावे. कामरा यांना माफी मागितली पाहिजे. नेत्यांविरुद्धचा अपमान सहन केला जाणार नाही.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
दुसरीकडे, आप नेत्या प्रीती शर्मा मेनन यांनी त्यांच्या ‘एक्स’ वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, “Shame@Dev-Fadnavis- . गृहमंत्री म्हणून तुमच्याकडे शून्य अधिकार आहेत हे तुम्ही दाखवून दिले आहे. तुम्ही नागपुरात लोकांना सुरक्षित ठेवू शकला नाही. आता तुम्ही मुंबईत तोडफोड सुरू केली आहे.”(Kunal Kamra row)
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी तोडफोडीचा तीव्र निषेध केला. “ही तोडफोड अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात आहे. विनोद केला म्हणून दुखावण्याची काय गरज आहे? सत्तेच्या जोरावर जर तुम्ही कोणाचाही मान धरत असाल तर ते चुकीचे आहे,” असे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा :
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा