कोल्हापूर : प्रतिनिधी : एका युवकाने सात महिन्यांपूर्वी आतंरजातीय विवाह केला. गावातच तो मित्रासमवेत तो बोलत असताना एका कारमधून सहा ते सातजण उतरले. त्यांनी तरुणाला मारहाण केली. त्याला कारमध्ये घातले आणि अपहरण केले. मित्र आणि नातेवाईकांनी पोलिसांकडे धाव घेतली. अपहरणकर्ते कोण हे माहीत नव्हते. (kidnapping)
पोलिसांनी वेगवेगळ्या शक्यता लक्षात घेत तपास सुरू केला असता सासऱ्यानेच जावयाचे अपहरण केले. तसेच त्याला मिरजेतील एका फ्लॅटमध्ये डांबून ठेवल्याचे तपासात उघड झाले. पोलिसांनी जावयाची सुटका केली. सासऱ्याने जावयाला बेदम मारहाण करुन हात बांधून खोलीत डांबून ठेवले होते. पोलिसांनी सासरा आणि त्यांच्या दोन्ही साथीदारांना अटक केली.(kidnapping)
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी या तपासाची माहिती दिली. निगवे दुमाला येथील विशाल मोहन अडसूळ (वय २०) याची इन्स्टाग्रामवर एका युवतीशी ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांनी आंतरजातीय प्रेमविवाह केला. युवतीच्या वडिलांना प्रेमविवाह पसंत नव्हता. त्यांनी विवाहाला विरोधही दर्शवला होता. विवाहानंतर मुलगी आणि तिच्या वडिलांचे बोलणे नव्हते. मुलीच्या नवऱ्याने म्हणजे जावयाने सासऱ्याला पाहिले नव्हते. सासऱ्यानेही जावयाला पाहिले नव्हते.
दरम्यान जावयाला अद्दल घडवण्याचा विचार सासरे श्रीकृष्ण कोकरे याने केला. रविवारी (ता.९) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास विशाल भुयेवाडी गावाजवळील कमानीजवळ मित्रासमवेत बोलत बसला होता. त्यावेळी सासरा कोकरे कारमधून आपल्या सहकाऱ्यांसमवेत आला. त्याने जावयाला कारमध्ये कोंबले आणि तिथून पसार झाला. अपहरणानंतर विशालचे वडील मोहन अडसूळ यांनी तातडीने करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.(kidnapping)
भर चौकातून रात्रीच्यावेळी तरुणाचे अपहरण झाल्याने पोलिसांनी गंभीर दखल घेतली. करवीर पोलिस ठाण्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तपास सुरु केला. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचाचे पोलीस कॉन्स्टेबल रामचंद्र कोळी यांनी अपहरणाचा प्रकार आंतरजातीय विवाह प्रकरणातून घडल्याची माहिती मिळाली. त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांची पथके सांगली, कुपवाड, मिरजेला रवाना झाली. अंकली येथील एका संस्थेतून श्रीकृष्ण कोकरे याला ताब्यात घेतले. पोलिसांनी कसून चौकशी केली असता कोकरेने गुन्ह्याची कबुली दिली. मुलीने प्रेमविवाह केल्याने विशाल अडसुळेचे अपहरण करुन त्याला मिरज येथे एका खोलीत कोंडून ठेवल्याचे सांगितले.
पोलिसांनी मिरजेतील खोलीवर छापा टाकला. दरवाजा तोडून विशाल अडसूळ याची सुटका केली. कोकरे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी विशालला बेदम मारहाण करुन दोरखंडाने त्याचे हात बांधले होते. तो खूप भेदरलेला होता. पोलिसांनी त्याला तातडीने उपचारास दाखल केले. पोलिसांनी संशयित श्रीकृष्ण महादेव कोकरे (वय ४५, रा. कुपवाड, ता. मिरज, जि. सांगली), धीरज उर्फ हणमंत पाटील (५६, रा. कवठेपिरान, ता. मिरज), राजेंद्र परमेश्वर कट्टीमनी ( ३३ रा. सावळी, ता. मिरज, जि. सांगली) यांना अटक केली आहे. (kidnapping)
हेही वाचा :