कोल्हापूर : प्रतिनिधी : सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत खंडोबा तालीम मंडळाने वेताळमाळ तालीम मंडळावर टायब्रेकरमध्ये ४-२ असा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. पूर्णवेळेत सामना शून्य गोलबरोबरीत होता. पाटाकडील तालीम मंडळ आयोजित ही स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर खेळवली जात आहे.
बलाढ्य खंडोबा तालीम मंडळ आणि वेताळमाळ तालीम मंडळ यांच्यातील सामना चुरशीचा होणार असल्याने दोन्ही संघांच्या समर्थक आणि फुटबॉल शौकिनांनी मोठी गर्दी केली होती. पूर्वार्धात दोन्ही संघांनी आघाडी मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. पण अचूक समन्वयाअभावी गोलची नोंद झाली नाही. मध्यंत्तरास सामना शून्य गोलबरोबरीत होता.
उत्तरार्धात गोल नोंदवण्यासाठी दोन्ही संघांनी खोलवर चढाया केल्या. खंडोबाकडून रोहन आडनाईक, नवीन रेघू, संकेत मेढे यांनी तर वेताळमाळकडून थुलंगा ब्रह्मा, प्रणव कणसे यांनी चांगल्या चढाया केल्या. पण दोन्ही संघ गोल न करु शकल्याने मुख्य पंचांनी टायब्रेकरचा अवलंब केला. त्यामध्ये खंडोबा संघाने बाजी मारली. त्यांच्या रोहन आडनाईक, प्रथमेश गावडे, नवीन रेघू, संकेत मेढे यांनी गोल केले. अदित्य लायकरचा फटका वेताळमाळ संघांच्या गोलरक्षकाने रोखला. वेताळमाळकडून प्रणव कणसे, श्रीकांत माने हे दोघेच गोल करु शकले. पार्थ मोहितेचा फटका बाहेर गेला तर फुलुंगा ब्रह्माचा फटका खंडोबा संघांच्या गोलरक्षकाने रोखला. खंडोबा संघाने हा सामना ४-२ अशा फरकाने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. खंडोबाचा देबजीत घोषाल याची सामनावीर म्हणून निवड झाली.
बुधवारचा सामना : पाटाकडील तालीम मंडळ वि. दिलबहार तालीम मंडळ, दुपारी ४.०० वा.
हेही वाचा :
ब्रेसवेलकडे न्यूझीलंडचे नेतृत्व
मयंक आयपीएलच्या पूर्वार्धास मुकणार