जमीर काझी : मुंबई : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूबाबत शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केलेल्या गंभीर आरोपावरून दोन्ही शिवसेनेमध्ये वाद आता शिगेला पोहोचला आहे. (Kadam, Parb’s allegations rebutted)
ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी रामदास कदमांचे विधान खोटी आणि अवमानकारक असून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर १९९३ मध्ये रामदास कदम यांची पत्नी जळाली होती की तिला जाळायचा प्रयत्न झाला होता?, याबाबत कदम यांची नार्को टेस्ट घ्यावी, अशी मागणी केली आहे.
परब यांच्या आरोपानंतर रामदास कदम यांनी शिवसेनाप्रमुख यांच्या मृत्यूबाबतची चौकशी सीबीआय मार्फत करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार असल्याचे सांगितले. तसेच परब यांनी केलेल्या आरोपाविरुद्ध अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे सांगितले.
बाळासाहेबांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीत का ठेवला?
शिंदे गटाच्या वतीने झालेल्या दसरा मेळाव्यात माजी मंत्री रामदास कदम यांनी बाळासाहेबांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीमध्ये का ठेवला? याचा तपास झाला पाहिजे, असा दावा केला होता. त्यानंतर शुक्रवारी याबाबत माझी व उद्धव ठाकरे यांची नार्को टेस्ट करावी, असे आव्हान त्यांनी दिले होते. त्याला आज अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले,’ कदम यांनी केलेले आरोप खोटे आहेत. त्यामुळं मी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करत आहे. कदम यांना सार्वजनिकरीत्या माफी मागावीच लागेल, अन्यथा त्यांना कोर्टात खेचलं जाईल.१९९३ मध्ये रामदास कदम यांच्या पत्नी ज्योती कदम यांनी स्वतःला पेटवून घेतलं की, त्यांना कुणी पेटवलं? याचाही तपास झाला पाहिजे. त्यासाठी नार्को टेस्ट करावी. ‘आपल्या घरचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून’ हा कदमांचा स्वभाव आहे. दारू पिऊन खेडमध्ये जे प्रकार केले जातात ते आम्ही अधिवेशनात मांडू. (Kadam, Parb’s allegations rebutted)
कदम झोपलेले बाकडे आम्ही शोधतोय
बाळासाहेबांच्या मृत्यूबाबत आरोप करणं म्हणजे मृत्यूनंतरही त्यांचा अपमान करण्यासारखे आहे. मी स्वतः बाळासाहेबांच्या मृत्युपत्राचा साक्षीदार आहे. डॉक्टरांनी मृत्यू जाहीर केल्यानंतर लगेच सर्व प्रक्रिया पूर्ण केली होती. मृत व्यक्तीवर अशा प्रकारे शंका उपस्थित करणे अक्षम्य गुन्हा आहे. मातोश्री कोणतीही बाकडे नाहीत. त्यामुळे कदम ज्या बाकड्यावर झोपले होते ती शोधत आहोत. त्यांनी माफी मागितली नाही तर आम्ही कायदेशीर कारवाई करू. हे प्रकरण न्यायालयातच नेणार आहोत,” असा इशारा परब यांनी दिला.
मुख्यमंत्र्यांकडे सीबीआय चौकशीची मागणी करणार : कदम
परब यांनी केलेल्या आरोपानंतर रामदास कदम यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत आपल्या विधानावर ठाम असल्याचे सांगून ते म्हणाले की,’ परब यांची लायकी नाही, त्याने जे विधान माझ्या पत्नीबाबत केले आहे. त्याविरुद्ध आम्ही दोघे त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे. स्टोव्हच्या भडका उडून ती भाजली होती,तिला वाचवताना मलाही भाजले होते. तिला पाहण्यासाठी बाळासाहेब ही दवाखान्यात आले होते. शिवसेनाप्रमुखांच्या मृत्यूबाबत मला जे डॉक्टरांनी सांगितले होते त्याबाबत मी बोललेलो आहे. या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडून व्हावी,यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य कदमांच्या तोंडावर थुंकत आहे – संजय राऊत
रामदास कदम यांनी प्रसिद्धी मिळवण्यासाठी शिवसेनाप्रमुखांच्या मृत्यूबाबत खोटी विधान करून त्यांचा अवमान केला आहे. त्याबद्दल पूर्ण महाराष्ट्र त्यांच्यावर थुकत आहे, अशी टीका खा. संजय राऊत यांनी केली. (Kadam, Parb’s allegations rebutted)