सिडनी : भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराहने सिडनी कसोटीच्या दुसऱ्या दिवशी उपाहारानंतर मैदान सोडल्याने त्याच्या दुखापतीविषयी चर्चा सुरू झाली. बुमराहला पाठदुखी जाणवत असल्याने त्याने शनिवारी केवळ ८ षटके गोलंदाजी केली, तर उपाहारानंतर केवळ एक षटक टाकले. दिवसाच्या खेळानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये भारताचा गोलंदाज प्रसिध कृष्णाने बुमराह फलंदाजी करणार असल्याचे सांगितले. तथापि, तो दुसऱ्या डावात गोलंदाजी करण्यासाठी पुरेसा फिट आहे का, याबाबत अद्याप प्रश्नचिन्ह आहे. (Jasprit Injury)
या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेमध्ये बुमराह हा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज असून त्याच्या नावावर आतापर्यंत ३२ विकेट जमा आहेत. सिडनी कसोटीच्या पहिल्या डावातही त्याने दोन विकेट घेतल्या. ही कसोटी जिंकण्याच्या भारताच्या आशा या मोठ्या प्रमाणात बुमराहच्या गोलंदाजीवर अवलंबून आहेत. या पार्श्वभूमीवर तो शनिवारी मैदानाबाहेर गेल्यामुळे त्याच्या दुखापतीविषयी चिंता व्यक्त होऊ लागली. त्यामुळे पत्रकार परिषदेमध्ये प्रसिधलाही याबाबत प्रश्न विचारण्यात आले. (Jasprit Injury)
बुमराहच्या पाठीचे स्कॅन्स करण्यात आले असून अद्याप त्यामध्ये काहीही गंभीर आढळलेले नाही. भारतीय संघाचे वैद्यकीय पथक बुमराहच्या फिटनेसवर लक्ष ठेवून आहे, असे प्रसिधने सांगितले. तो भारतातर्फे दुसऱ्या डावात फलंदाजी करेल. मात्र, त्याला रविवारी तंदुरुस्त असल्याचे जाणवते का, यावर त्याच्या गोलंदाजीचा निर्णय अवलंबून असेल, असे समजते. (Jasprit Injury)
हेही वाचा :
कसोटीतून माघार घेतलीय; निवृत्ती नाही
बुमराहचा विक्रम; पंतचे दुसरे वेगवान अर्धशतक