अहमदाबाद : आयपीएलच्या अठराव्या पर्वाचा चषक रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने उंचावला असला, तरी स्पर्धेतील वैयक्तिक पुरस्कारांवर अन्य संघातील खेळाडूंनीही मोहर उमटवली. मुंबई इंडियन्सचा सूर्यकुमार यादव स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला असून गुजरात टायटन्सच्या साई सुदर्शनने ऑरेंज कॅपसह अन्य तीन पुरस्कारांवरही नाव कोरले. गुजरातचाच वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा पर्पल कॅपचा मानकरी ठरला. (IPL Awards)
सूर्यकुमारने यंदाच्या मोसमात १६ सामन्यांत ६५.१८च्या सरासरीने पाच अर्धशतकांसह ७१७ धावा फटकावल्या. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानी राहिला असला, तरी त्याने या मोसमातील प्रत्येक सामन्यात २५पेक्षा अधिक धावा केल्या. त्याचबरोबर, तो मुंबईतर्फे आयपीएलच्या एका मोसमात ७०० धावांचा टप्पा ओलांडणारा पहिला फलंदाज ठरला. मूळच्या तमिळनाडूच्या सुदर्शनने गुजरातकडून खेळताना १५ सामन्यांमध्ये १ शतक व ६ अर्धशतकांसह सर्वाधिक ७५९ धावा केल्या. सुदर्शनला ऑरेंज कॅपबरोबरच सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडू, फँटसी किंग आणि ऑन-द-गो फोर्स हे पुरस्कारही मिळाले.
प्रसिधने या मोसमात सर्वाधिक २५ विकेट घेत पर्पल कॅप आपल्या नावावर केली. मोसमात सर्वाधिक निर्धाव चेंडू टाकल्याबद्दलचा पुरस्कार गुजरातच्याच महंमद सिराजला मिळाला. सुपर स्ट्रायकरसाठी देण्यात येणारा पुरस्कार राजस्थान रॉयल्सच्या १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीला मिळाला. या मोसमात गुणतक्त्यात तळाशी राहिलेल्या चेन्नई सुपरकिंग्जने ‘फेअर-प्ले’ पुरस्कार पटकावला.
सर्व पुरस्कारविजेत्यांची यादी
मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ दि सिझन : सूर्यकुमार यादव
ऑरेंज कॅप : साई सुदर्शन (७५९ धावा)
पर्पल कॅप : प्रसिध कृष्णा (२५ विकेट)
फेअरप्ले अवॉर्ड : चेन्नई सुपरकिंग्ज
कॅच ऑफ दि सिझन : कमिंदू मेंडिस
एमर्जिंग प्लेअर ऑफ दि सिझन : साई सुदर्शन
सुपर स्ट्रायकर ऑफ दि सिझन : वैभव सूर्यवंशी
फँटसी किंग ऑफ दि सिझन : साई सुदर्शन
सुपर सिक्सेस ऑफ दि सिझन : निकोलस पूरन
ऑन-द-गो फोर्स ऑफ दि सिझन : साई सुदर्शन
मोस्ट डॉट बॉल्स ऑफ दि सिझन : महंमद सिराज.
हेही वाचा :
आरसीबी आयपीएल चॅम्पियन्स