कोल्हापूर : प्रतिनिधी : संवैधानिक मार्गाने काम करणाऱ्या विरोधी पक्ष संघटना, शिव- शाहू- फुले- आंबेडकरवादी संघटना, पुरोगामी, शेतकरी कामगार संघटना यांना जनसुरक्षा कायदा संपवून टाकणार आहे, सर्वसामान्यांचे हक्क हिरावून घेणार आहे, असा आरोप करत सोमवारी (२१ जुलै) जनसुरक्षा कायद्याची प्रतिकात्मक होळी करण्यात आली. कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेसच्यावतीने काँग्रेस कार्यालयाबाहेर या कायद्याची होळी करण्यात आली. (Jansuraksha bill)
जनसुरक्षा विधयेकामध्ये आम्ही काही सूचना सांगितल्या होत्या, त्याची अंमलबजावणी झालेली नाही. विधानपरिषदेमध्ये जेव्हा विधेय आले तेव्हा डिसेन्ट नोट देऊन जनसुरक्षा विधयक रद्द करण्याची भूमिका आम्ही मांडली. त्यामुळे राज्यपालांनाही आम्ही महाविकास आघाडी म्हणून भेटून हे विधयक परत पाठवण्याची विनंती केली आहे. या विधेयकावर १२ हजार सूचना, आक्षेप आले आहेत, याची दखल घ्या. लोकांच्या भावना समजून घ्या, अशी मागणी आ. सतेज पाटील यांनी यावेळी केली. (Jansuraksha bill)
शिंदेंची गरज संपली…
महायुतीच्या सरकारमध्ये सध्या अनागोंदी सुरु असल्याची टीका करून ते म्हणाले, प्रत्येकजण आपापल्या खात्यातील वाटा कसा काढता येईल हेच बघतो आहे. गेल्या काही दिवसांत एकामागून एक व्हिडिओ बाहेर येत होते, हे व्हिडिओ कसे बाहेर आले? आम्हाला माहिती नाही. पण यावरुन एकूण चित्र दिसतेय की, आता एकनाथ शिंदेंची गरज संपलेली आहे, असे पाटील म्हणाले. (Jansuraksha bill)
हनी ट्रॅपची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करावा. महाराष्ट्रातील जनतेच्या शंकेचं निरसन झालं पाहिजे, ही पोलिसांची जबाबदारी आहे. हनी ट्रॅप होता का नव्हता? असेल तर तो कोणी केला? त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. सरकारने याबाबत माहिती लपवून ठेवून राजकीय वापर करु नये. तो बाहेर काढावा अशी आमची अपेक्षा आहे, असेही ते म्हणाले.
काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, भारती पोवार, राजू लाटकर, सुर्यकांत पाटील- बुद्धीहाळकर, माजी नगरसेवक सुभाष बुचडे, तौफिक मुल्लाणी, मोहन सालपे, विनायक फाळके, अक्षय शेळके, राजू साबळे, वैशाली महाडिक, उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण, संजय पोवार- वाईकर, गणेश पाटील यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.