दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफी वन-डे क्रिकेट स्पर्धेमध्ये भारत रविवारी आपला पाचवा अंतिम सामना खेळणार आहे. आजवरच्या चार सामन्यांमध्ये भारताला संमिश्र यश मिळाले असून एक विजय, एक अनिर्णित आणि दोन पराभव अशी भारताची कामगिरी आहे. भारताच्या आजवरच्या चार अंतिम सामन्यांचा घेतलेला हा आढावा...(India’s Finals)
वर्ष – २०००, स्थळ – नैरोबी, विजेता – न्यूझीलंड.

त्यावेळी आयसीसी नॉकआउट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यात भारताचा सामना न्यूझीलंडशीच झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सौरव गांगुलीचे शतक व सचिन तेंडुलकरच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने ६ बाद २६४ धावा केल्या. गांगुलीने ९ चौकार व ४ षटकारांसह १३० चेंडूंमध्ये ११७ धावांची, तर सचिनने ६९ धावांची खेळी केली. भारताच्या गोलंदाजांना मात्र या धावसंख्येचा बचाव करण्यात अपयश आले. ख्रिस क्रेन्सच्या नाबाद शतकामुळे न्यूझीलंडने भारताचे आव्हान ४९.४ षटकांत ६ विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले. (India’s Finals)
२००२, स्थळ – कोलंबो, विजेता – भारत, श्रीलंका.

आयसीसीच्या आजवरच्या सर्व स्पर्धांमधील संयुक्त विजेते असणारा हा एकमेव अंतिम सामना आहे. या अंतिम सामन्यात यजमान श्रीलंकेने ५ बाद २४४ धावा केल्या. श्रीलंकेकडून कर्णधार सनथ जयसूर्याने ७४, तर कुमार संगकाराने ५४ धावा केल्या. श्रीलंकेच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने २ षटकांत बिनबाद १४ धावा केल्या असतानाच पावसाला सुरुवात झाली. पावसाचा जोर कायम राहिल्याने हा सामना अनिर्णित जाहीर करून दुसऱ्या दिवशी पुन्हा खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. दुसऱ्या दिवशी भारताने श्रीलंकेला ७ बाद २२२ धावांवर रोखले. प्रत्युत्तरादाखल भारताने ८.४ षटकांत १ बाद ३८ धावा केल्या असताना पुन्हा पावसाचा व्यत्यय आला. अखेर भारत आणि श्रीलंका यांना स्पर्धेचे संयुक्त विजेते घोषित करण्यात आले.(India’s Finals)
२०१३, स्थळ – बर्मिंगहॅम, विजेता – भारत.

अगोदरच्या दोन चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विशेष कामगिरी न जमलेल्या भारताने २०१३ मध्ये थेट अपराजित राहत अंतिम फेरी गाठली. यजमान इंग्लंडविरुद्धचा हा अंतिम सामनाही पावसाच्या व्यत्ययामुळे अवघ्या २० षटकांचा खेळवण्यात आला. भारताने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १२९ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडला ८ बाद १२४ धावांपर्यंतच मजल मारता आली. सामनावीर रवींद्र जडेजाने या सामन्यात २५ चेंडूंमध्ये नाबाद ३३ धावा फटकावण्याबरोबरच २ विकेटही घेतल्या. त्याचबरोबर, या मालिकेत ३६३ धावा करणारा भारताचा शिखर धवन स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला. (India’s Finals)
२०१७, स्थळ – दि ओव्हल, विजेता – पाकिस्तान

या स्पर्धेत गतविजेता म्हणून उतरलेल्या भारताची अंतिम फेरीत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी लढत झाली. या अंतिम सामन्यात भारताचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या सल्ल्याविरुद्ध जात कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय घेतला. विराटचा हा निर्णय भारताला महागात पडला आणि संघाच्या पराभवाचे प्रमुख कारणही ठरला. फखर झमनच्या शतकामुळे पाकने ४ बाद ३३८ धावांचे लक्ष्य उभारले. या लक्ष्यासमोर भारताचा डाव ३०.३ षटकांत अवघ्या १५८ धावांत संपला आणि संघाला १८० धावांनी पराभव पत्करावा लागला. भारतातर्फे हार्दिक पंड्याने एकाकी लढत देत ७६ धावा केल्या. (India’s Finals)
हेही वाचा :
मुश्फिकूर रहीम वन-डेतून निवृत्त