मेलबर्न : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेतील चौथ्या कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाची अवस्था दुसऱ्या डावामध्ये ६ बाद ९१ अशी केली होती. परंतु, यजमानांच्या तळाच्या फलंदाजांनी चिवट खेळ करत चौथ्या दिवशी भारताला फलंदाजीस येण्यापासून रोखले. दिवसअखेरपर्यंत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात ९ बाद २२८ धावा केल्या असून त्यांची आघाडी ३३३ धावांपर्यंत पोहोचली आहे. (India-Australia)
भारताच्या तिसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावामध्ये ९ बाद ३५८ धावा झाल्या होत्या. रविवारी पहिल्या ४ षटकांमध्ये नितीश कुमार रेड्डी आणि महंमद सिराज यांनी धावसंख्येत ११ धावांची भर घातली. नितीशला बाद करून नॅथन लायनने भारताचा डाव संपवला. शनिवारी १०५ धावांवर नाबाद राहिलेला नितीश ११४ धावा करून बाद झाला. ऑस्ट्रेलियातर्फे लायनसह स्कॉट बोलंड व पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी ३ विकेट घेतल्या. (India-Australia)
ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावामध्ये भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा केला. विशेषत: जसप्रीत बुमराह आणि महंमद सिराज यांनी ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या फलंदाजांना खेळपट्टीवर स्थिरावू दिले नाही. बुमराहने सलामीवीर सॅम कॉन्स्टसचा त्रिफळा उडवला, तर सिराजने उस्मान ख्वाजा व पहिल्या डावातील शतकवीर स्टीव्ह स्मिथ यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. उपाहारानंतरच्या सत्रामध्ये बुमराहने एकाच षटकात ट्रॅव्हिस हेड व मिचेल मार्शला बाद केले. त्याच्या पुढच्याच षटकात ॲलेक्स कॅरीही बुमराहच्या फलंदाजीवर बाद झाला. त्यावेळी ऑस्ट्रेलियाची अवस्था ६ बाद ९१ अशी होती. (India-Australia)
या मोक्याच्या क्षणी मार्नस लॅबुशेन आणि कर्णधार पॅट कमिन्स यांनी सातव्या विकेटसाठी ५७ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. सिराजने लॅबुशेनला बाद करून ही जोडी फोडली. लॅबुशेनने १३९ चेंडूंमध्ये ३ चौकारांसह ७० धावा केल्या. कमिन्स ९० चेंडूंमध्ये ४ चौकारांसह ४१ धावा करून रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर, लायन व बोलंड यांनी दिवसअखेरपर्यंत किल्ला लढवून भारतीय गोलंदाजांच्या संयमाची परीक्षा पाहिली. या दोघांनी तब्बल १८ षटके फलंदाजी करत अखेरच्या विकेटसाठी नाबाद ५५ धावा जोडल्या. खेळ थांबला, तेव्हा लायन ५४ चेंडूंमध्ये ५ चौकारांसह ४१, तर बोलंड १० धावांवर खेळत होता. भारतातर्फे बुमराहने ४, तर सिराजने ३ विकेट घेतल्या. रविवारी दिवसभरात यशस्वी जैस्वालने ३ व सिराजने एक झेल सोडला. त्याचाही फटका भारताला बसला. (India-Australia)
हेही वाचा :
मेलबर्नमध्ये नितीशची विक्रमी खेळी
नितीश-वॉशिंग्टनने तारले