बेळगाव : गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अत्यंत अपमानास्पद वक्तव्य केले. त्यांनी केलेली चूक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार स्वीकारायला तयार नाही. मात्र आम्ही राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेबांच्या सन्मानासाठी लढत राहू, असे प्रतिपादन काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केले. (Mahatma Gandhi)
काँग्रेसच्या बेळगाव अधिवेशनात महात्मा गांधींनी पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारल्याला शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल काँग्रेस कार्यकारिणीची बैठक येथे आयोजित केली आहे. ‘नव सत्याग्रह बैठक’ असे त्याचे नामकरण करण्यात आले आहे. त्याच्या उद्घाटनावेळी खरगे बोलत होते. खरगे यांनी घटनात्मक संस्थांवर नियंत्रण ठेवले जात असल्याचा आरोपही यावेळी केला. निवडणूक आयोग हे त्याचे ठळक उदाहरण आहे, असे ते म्हणाले. लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते.
खरगे म्हणाले, ‘लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास हळूहळू कमी होत चालला आहे. कारण आयोगाच्या निःपक्षपातीपणावर प्रश्न उपस्थित केले जात आहे. काही दिवसांपूर्वी मोदी सरकारने निवडणूक नियमांमध्ये बदल केले. कधी मतदारांची नावे यादीतून वगळली जातात, कधी त्यांना मतदान करण्यापासून रोखले जाते, कधी यादीतील मतदारांची संख्या अचानक वाढते, कधी मतदानाच्या शेवटच्या क्षणी मतांची टक्केवारी अनपेक्षितपणे वाढते. असे प्रश्न सातत्याने पुढे येत आहेत. त्याचे समाधानकारक उत्तर सापडत नाही.’ (Mahatma Gandhi)
प्रारंभी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि काँग्रेस नेते महात्मा गांधी यांची प्रतिमा हातात घेऊन बैठकीच्या ठिकाणी दाखल झाले. त्या नंतर पक्षाध्यक्ष खरगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. बैठकीला दोनशेवर प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत मल्लिकार्जुन खरगे यांनी उपस्थित काँग्रेस नेतेमंडळीना मार्गदर्शन केले. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, खासदार प्रणिती शिंदे, विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बैठकीला उपस्थित होते.
काँग्रेस अधिवेशनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वीर सौध येथे उभारण्यात आलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण आणि रामतीर्थ नगर येथे उभारण्यात आलेल्या कर्नाटक सिंह गंगाधर देशपांडे स्मारक आणि फोटो गॅलरीचे उदघाटन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते करण्यात आले. सरदार मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या खादी प्रदर्शनाचे उद्घाटनही यावेळी झाले. (Mahatma Gandhi)
काँग्रेस अधिवेशनाच्या निमित्ताने शहरात पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात आला आहे. शहरातील काँग्रेस रोड वरील वाहतूक बंद करून पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. संपूर्ण शहरातील प्रमुख मार्गावर विद्युत रोषणाई करण्यात आल्याने शहर उजळून निघाले आहे.
शुक्रवारी सकाळी सुवर्ण सौध येथे महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार असून दुपारी काँग्रेस पक्षाची जाहीर सभा होणार आहे.
हेही वाचा :
- परभणी, बीड हत्या प्रकरण दाबण्याचा मुख्यमंत्र्यांकडून प्रयत्न
- हरपवडे ग्रामस्थांना त्रासदायक ठरलेले वानर अखेर पिंजऱ्यात बंद
- या लोकांचे अपराध भरले; या ‘आका’ला अटक करावी