कडेगांव : प्रशांत होनमाने
सांगली जिल्ह्यातील पलूस-कडेगांव मतदारसंघ म्हणजे पूर्वीच्या भिलवडी-वांगी मतदारसंघातील राजकीय इतिहास डावीकडून उजवीकडे सरकत गेला असल्याचे दिसून येते. १९७८ ते २०१४ पर्यंत या मतदारसंघात काँग्रेस विरूद्ध काँग्रेस बंडखोर किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अशा प्रमुख लढती झाल्या. काही काळ डावे पक्ष विरूद्ध काँग्रेस अशाही प्रमुख लढती झाल्या आहेत.
मतदारसंघात सुरुवातीला जनता पक्षाचा एक गट कार्यरत होता. दखल घ्यावी अशी त्या गटाची ताकद होती. लालसाहेब यादव, रामराव घार्गे ही नेतेमंडळी या गटाचे नेतृत्व करत. नंतर हा गट काँग्रेसपूरक काम करू लागला आणि शेवटी त्या गटात विलीन झाला.
शेतकरी कामगार पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष हे दोन्हीही डावे पक्ष या मतदारसंघात कार्यरत होते. त्यातील एक गट राष्ट्रवादी आणि एक गट काँग्रेसमध्ये गेला. सध्या डाव्यांचे अस्तित्व एक-दोन गावापुरते आहे.
दिवंगत संपतराव चव्हाण, जी. डी. बापू लाड, पतंगराव कदम, ॲड. संपतराव देशमुख यांच्यात प्रमुख लढती होत असत. हे सर्व नेते काँग्रेस आणि अपक्ष बंडखोर म्हणून डावे पक्ष आणि नेत्यांच्या मदतीने निवडणूक जिंकत आले असल्याचे दिसून येते. मात्र दिवंगत ॲड. संपतराव देशमुख यांच्या घराण्याच्या भाजप प्रवेशानंतर हा मतदारसंघ डावीकडून उजवीकडे सरकत गेल्याचे दिसून येते.
अशा झाल्या लढती…
१९७८ मध्ये भिलवडी-वांगी विधानसभा मतदारसंघात एकूण १,०७,५११ मतदार होते. एकूण वैध मतांची संख्या ८३,२०२ होती. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार संपतराव अण्णासाहेब चव्हाण विजयी झाले. त्यांना एकूण ४३,४१९ मते मिळाली. शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार जीडी उर्फ गणपती दादा लाड यांना २१,०९७ मते मिळाली. त्यांचा २२,३२२ मतांनी पराभव झाला.
१९८० मध्ये एकूण १,१६,७८६ मतदार होते. एकूण वैध मतांची संख्या ७८,५११ होती. त्यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे उमेदवार संपतराव अण्णासाहेब चव्हाण विजयी झाले. त्यांना एकूण ३३,४७६ मते मिळाली. अपक्ष उमेदवार पतंगराव श्रीपती कदम एकूण ३३,३९० मतांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यांचा ८६ मतांनी पराभव झाला.
१९८५ मध्ये भिलवडी वांगी विधानसभा मतदारसंघात एकूण १,२९,३७० मतदार होते. एकूण वैध मतांची संख्या १,००,८८६ होती. या जागेवरून अपक्ष उमेदवार पतंगराव श्रीपती कदम विजयी झाले. त्यांना एकूण ६३,८६५ मते मिळाली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार संपतराव अण्णासाहेब चव्हाण एकूण ३३७०० मतांसह दुसऱ्या स्थानावर राहिले. त्यांचा ३०,१६५ मतांनी पराभव झाला.
१९९० मध्ये भिलवडी वांगी विधानसभा मतदारसंघात एकूण १,५७,०६६ मतदार होते. एकूण वैध मतांची संख्या १,१७,२०१ होती. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार कदम पतंगराव श्रीपतराव या जागेवरून विजयी होऊन आमदार झाले. त्यांना एकूण ६४६६५ मते मिळाली. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे उमेदवार जी.डी. लाड एकूण ४९,७३८ मतांसह दुसऱ्या स्थानावर राहिले. त्यांचा १४,९२७ मतांनी पराभव झाला.
१९९५ मध्ये भिलवडी वांगी विधानसभा मतदारसंघात एकूण १,६५,८२० मतदार होते. एकूण वैध मतांची संख्या १४१३५४ होती. या जागेवरून अपक्ष उमेदवार संपतराव व्यंकटराव देशमुख विजयी झाले. त्यांना एकूण ७१,२९६ मते मिळाली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार डॉ. पतंगराव कदम एकूण ६४,०३१ मतांसह दुसऱ्या स्थानावर राहिले. त्यांचा ७,२६५ मतांनी पराभव झाला.
१९९९ मध्ये भिलवडी वांगी विधानसभा मतदारसंघात एकूण १,७२,२१३ मतदार होते. एकूण वैध मतांची संख्या १,४२,३६७ होती. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार डॉ. पतंगराव श्रीपतराव कदम या जागेवरून विजयी होऊन आमदार झाले. त्यांना एकूण ७९,४६६ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज सयाजीराव देशमुख एकूण ६१,६३७ मतांसह दुसऱ्या स्थानावर राहिले. त्यांचा १७,८२९ मतांनी पराभव झाला.
२००४ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार डॉ. पतंगराव श्रीपतराव कदम या जागेवरून विजयी झाले. त्यांना एकूण १,२१,९४१ मते मिळाली. अपक्ष उमेदवार संपतराव २०,०४१ मतांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यांचा १,०१,९०० मतांनी पराभव झाला.
२०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीचे निकाल
२०१४ च्या निवडणुकीत, पतंगराव कदम यांना भाजपाकडून पृथ्वीराज सयाजी देशमुख यांच्याशी सामना करावा लागला, ज्यात काँग्रेसला ११२,५२३ मते मिळाली आणि भाजपाला ८८,८४८ मते मिळाली. या निकालाने काँग्रेसची पकड या क्षेत्रात मजबूत केली. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतही विश्वजीत कदम यांनी मोठा विजय मिळवला. काँग्रेसला १,७१,४९७ मते मिळाली. या निवडणुकीत विरोधी पक्षाकडून कोणतीही मोठी आव्हाने दिसली नाहीत. शिवसेना उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिला. विशेष म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर ‘नोटा’ राहिला. २०,६३१ मते ‘नोटा’कडे वळली.
कदम कुटुंबाची राजकीय ताकद
पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात १९८५ ते २०१७ पर्यंत दिवंगत डॉ. पतंगराव कदम यांनी नेतृत्व केले. यामध्ये त्यांना १९९५ आणि १९९८ च्या पोटनिवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला होता. या मतदारसंघात कदम कुटुंब आणि काँग्रेस पक्षाचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. येथे काँग्रेस प्रभावी आहे. काँग्रेस विरूद्ध काँग्रेस आणि काँग्रेस विरूद्ध डावे अशाच प्रमुख लढती येथे राहिल्या. आता मात्र २०१४ पासून हा मतदारसंघ काँग्रेस आणि डावीकडून एकदम उजवीकडे भाजपकडे आकृष्ट झाल्याचे दिसून येते आहे. त्यामुळे २०१४ पासून या मतदारसंघात भाजपा आणि त्यांचे सहयोगी कधीकधी आव्हान देण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु आतापर्यंत काँग्रेसचे प्रभुत्व येथे कायम आहे.