सातारा : प्राथमिक शिक्षणात हिंदीची सक्ती नकोच. सरकारने हा हट्ट सोडला पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी (२६ जून) व्यक्त केले. (Hindi Mandatory)
हिंदीपेक्षा मी कृत्रिम बुद्धिमत्ता एआय या विषयाकडे मी गांभीर्याने पाहतोय. कारण एआयचे फायदे सर्व क्षेत्रासाठी आहेत. त्यामुळे सामान्य कुटुंबातील मुलालाही याचे प्रशिक्षण मिळाले पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे, अशी अपेक्षा पवार यांनी केली.
रयत शिक्षण संस्थेतील बैठकीसाठी पवार दौऱ्यावर आले होते. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी आघाडीची बैठक ३० जूनला होईल. त्यामध्ये एकत्रित निर्णय घेण्यात येईल, असेही पवार यांनी स्पष्ट केले. (Hindi Mandatory)
एआय सर्वव्यापी झालेले आहे. त्याचा वापर शेती, उद्योग, शिक्षणातही झाला पाहिजे. कारण त्याचे फायदे आहेत. केंद्र सरकारनेही एआयला मान्यता दिली आहे. राज्य शासनाने ५०० कोटींची तरतूद केली आहे. कृषी उत्पादन वाढवायचे असेल तर एआयचा वापर मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे. यामुळे शेतकऱ्यांवरील बोजाही कमी होईल. रयत शिक्षण संस्थेनेही एआय वापरासाठी पुढाकार घेतला आहे, असे पवार म्हणाले.
पवार यांनी प्राथमिक शिक्षणात हिंदी नको, असा सल्लाही राज्य सरकारला दिला. महायुतीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची तयारी केली आहे. महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी स्वतंत्र लढण्याची भाषा करत आहेत, असे विचारले असता पवार यांनी या निवडणुकीबाबत आघाडीत चर्चा होणार आहे. बैठकीत निर्णय घेणार आहोत, असे उत्तर दिले. (Hindi Mandatory)
‘शक्तिपीठ’ पहिल्यांदा समजून घेणार
मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी दिली आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात सांगली-कोल्हापुरातील शेतकरी मोठ्या संख्येने एकवटले आहेत, याकडे लक्ष वेधले असता पवार यांनी, हा प्रकल्प काय, त्याची आवश्यकता आहे का, हे पहिल्यांदा समजून घेईन. मगच बोलेन असे उत्तर दिले.
राज्य सरकारने या प्रस्तावित महामार्गाविषयीची माहिती दिली तर तीही घेईन. शेतकरी तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांचाही आग्रह समजून घ्यावा लागेल. केवळ विरोधासाठी विरोध नको. त्यामुळे प्रकल्पाबाबत सर्वंकष माहिती घेतल्यानंतरच बोलता येईल, असे पवार म्हणाले.