नवी दिल्ली : देशाच्या तिन्ही सैन्यदलाच्या प्रमुख राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांनी गुरुवारी हरियाणातील अंबाला येथील भारतीय हवाई दलाच्या तळावरुन राफेल लढाऊ विमानातून उड्डाण केले. यावेळी हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग उपस्थित होते. उड्डाणापूर्वी राष्ट्रपती मुर्मु यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. (Rafale flight of President Murmu)
फ्रेंच एरोस्पेस कंपनी डसॉल्ट एव्हिएशनने बनवलेले राफेलचा भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात सप्टेंबर २०२० समावेश झाला. पाकिस्तानविरुद्ध ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूरमध्ये राफेलने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अतिरेक्यांचे आणि पाक हवाई दलाचे नुकसान करण्यात राफेल आघाडीवर होते. चार दिवस संघर्ष सुरू होता. भारतीय हवाई दलाने पाकचे कंबरडे मोडल्यानंतर १० मे रोजी पाकिस्ताने लष्करी कारवाई थांबवण्याचा निर्णय घेतल्यानंतर युद्धबंदी करण्यात आली. (Rafale flight of President Murmu)
२०२३ मध्ये आसाममधील तेजपूर हवाई दल तळावर सुखोई-३० एमकेआयमध्ये केलेल्या उड्डाणानंतर राष्ट्रपती मुर्मू यांचा लढाऊ विमानातून हा दुसरे उड्डाण आहे. “भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू उद्या हरियाणातील अंबाला येथे भेट देतील जिथे त्या राफेलमध्ये उड्डाण करतील,” असे राष्ट्रपती भवनाने मंगळवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. (Rafale flight of President Murmu)
माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम आणि प्रतिभा पाटील यांनी यापूर्वी २००६ आणि २००९ मध्ये लोहगाव हवाई दल तळावर सुखोई-३० एमकेआय विमानातून उड्डाण केले होते.