नवी दिल्ली : ब्रह्मपुत्रा ही आसामची जीवनरेखा आहे. त्यावर जगातील सर्वांत मोठे धरण बांधण्याचा चीनने नुकताच घेतलेला निर्णय देशाच्या जलसुरक्षेबाबत गंभीर चिंता निर्माण करतो, असे काँग्रेस नेते गौरव गोगोई यांनी मंगळवारी संसदेत सांगितले. (Gaurav Gogoi)
लोकसभेत शून्य तासात बोलताना गोगोई म्हणाले की, त्यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर या दोघांनाही पत्र लिहिले आहे. भारताची प्रमुख सामरिक संपत्ती असलेल्या ब्रह्मपुत्रेतील पाण्याच्या प्रवाहावर चीनकडून नियंत्रण आणले जात आहे, याकडे या पत्रात त्यांनी लक्ष वेधले आहे.
ब्रह्मपुत्रा ही आसामची जीवनरेखा आणि भारताची प्रमुख सामरिक संपत्ती आहे. यारलुंग झांगबो-ब्रह्मपुत्रादरम्यान चीन जगातील सर्वात मोठे धरण बांधत आहे. चीनचा हा निर्णय भारताच्या जल सुरक्षेबाबत गंभीर चिंता निर्माण करतो, याकडे गोगोई यांनी लक्ष वेधले.(Gaurav Gogoi)
गोगोई काँग्रेसचे लोकसभेतील उपनेते आहेत. पाणी वाटप आणि व्यवस्थापन हा चीनसोबतच्या भारताच्या राजनैतिक प्रतिबद्धतेचा मुख्य घटक आहे. विशेषत: पंतप्रधान, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि परराष्ट्र मंत्रालय यांच्या पातळीवर हा महत्त्वाचा मुद्दा आहे, असे ते म्हणाले.
‘चीनने नेहमी पूर अंदाज आणि व्यवस्थापनास समर्थन देणारा हायड्रोलॉजिकल डेटा शेअर केला पाहिजे. माझा प्रश्न आहे की, या सरकारला माहित आहे का की चीन असे धरण बांधत आहे. तसे असेल तर या सरकारने हा मुद्दा आंतरराष्ट्रीय मंचावर मांडण्यासाठी काय केले?,’ असा सवाल त्यांनी केला.
परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंग यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात सांगितले की, सीमापार नद्यांशी संबंधित विविध मुद्द्यांवर २००६ मध्ये स्थापन झालेल्या ‘संस्थागत तज्ञ स्तरावरील यंत्रणे’ अंतर्गत तसेच राजनैतिक माध्यमांद्वारे चीनशी चर्चा केली जाते.(Gaurav Gogoi)
तिबेट स्वायत्त प्रदेशातील यारलुंग त्सांगपो (ब्रह्मपुत्राचा वरचा भाग) नदीच्या खालच्या भागात मंजूर झालेल्या मेगा-डॅम प्रकल्पाच्या चीनच्या घोषणेची भारत सरकारने दखल घेतली आहे, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा :