Home » Blog » FIR on Lenders : ५ लाख दिले; २७ लाख वसूल केले

FIR on Lenders : ५ लाख दिले; २७ लाख वसूल केले

पाच खासगी सावकारांविरोधात गुन्हा

by प्रतिनिधी
0 comments
FIR on Lenders

कोल्हापूर : प्रतिनिधी : खासगी सावकारांकडून पाच लाख रुपयांचे कर्ज घेतले. सावकारांनी वीस टक्के व्याज दराने रोख आणि ऑनलाईनद्वारे करुन २९ लाख रुपये वसूल केले. तरीही सावकारांनी पैशासाठी तगादा लावला. फिर्यादीने पोलिस अधीक्षकांकडे अर्ज केला. पोलिसांनी तक्रार अर्जाची खातरजमा केली. संशयित सावकारांनी गुन्हा टाळण्यासाठी फिर्यादीच्या खात्यावर ऑनलाईनद्वारे २७ लाख रुपये पाठवले. ऑनलाईनद्वारे पाठवलेली रक्कम पोलिसांना दाखवली. त्यानंतर सावकारांनी फिर्यादी आणि त्याच्या मुलाला ताब्यात घेऊन ऑनलाईनद्वारे पाठवलेले २७ लाख रुपये परत वसूल केले. फिर्यादीने यासंदर्भात पोलिस ठाण्यात अर्ज दिल्यानंतर पाच सावकारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (FIR on Lenders)

अशोक राजाराम पाटील, अवधूत अशोक पाटील, (दोघे रा. कळे ता. पन्हाळा), प्रल्हाद संपतराव भोसले, प्रदीप मधुकर भोसले, मानसिंग भोसले, (तिघे रा. आसगाव ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) अशी खासगी सावकारांची नावे आहेत.

कळे पोलिसांनी या गुन्ह्याची माहिती दिली. फिर्यादी विठ्ठल आनंदा पाटील (रा. आकुर्डे, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) हे शेती आणि इलेक्ट्रीक ठेकेदारीचा व्यवसाय करतात. फेब्रुवारी २०२२ मध्ये विठ्ठल पाटील यांनी खासगी सावकार अशोक पाटील यांच्याकडून पाच लाख रुपये घेतले. वीस टक्के व्याजाने सावकार अशोक पाटील आणि त्याचा मुलगा अवधूत पाटील यांना रोखीने आणि ऑनलाईन स्वरुपात गेल्या दोन वर्षात २९ लाख रुपये परत केले. तरीही सावकार अशोक पाटील आणि प्रल्हाद भोसले यांनी पैशासाठी तगादा लावला. त्यानंतर अशोक पाटील यांनी पोलिस अधीक्षकांकडे सावकारांच्या विरोधात अर्ज दिला. (FIR on Lenders)

पोलिस अधीक्षकांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले.  सावकार अशोक पाटील आणि त्यांचा मुलगा अवधूत यांनी वीस टक्के व्याज दराने फिर्यादी विठ्ठल पाटील यांच्याकडून घेतले असल्याची कबूली पोलिसांना दिली. सावकारकीचा गुन्हा टाळण्यासाठी अशोक पाटील, प्रदीप भोसले आणि प्रल्हाद भोसले यांनी फिर्यादी विठृठल पाटील यांच्या खात्यावर २७ लाख रुपये ऑनलाइनने पाठवले. त्यानंतर ही रक्कम परत वसुल करण्यासाठी विठ्ठल पाटील आणि त्यांचा मुलगा पियुष यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून २७ लाख रुपये वसुल केले. त्यानंतर विठ्ठल पाटील यांनी कळे पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर या अर्जाची शाहूवाडी पोलिस उप अधीक्षकांनी चौकशी करुन सावकारांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. कळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलिस निरीक्षक रणजीत पाटील तपास करत आहेत.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00