अंकोला (कर्नाटक) : रूढार्थाने कसलेही औपचारिक नाही. पण स्वकर्तृर्त्वाने तिने पर्यावरणाच्या क्षेत्रांत आपले नाव अजरामर केले. ती पाने, फुले, झाडे आणि वनाशी एकरूप झाली. वृक्षमाता म्हणून ओळखू लागली आणि वनाचा विश्वकोश अशी ओळखही तिला आपसूकपणे चिकटली. ही वृक्षमाता म्हणजेच प्रसिद्ध पर्यावरणवादी कार्यकर्त्या, पद्मश्री तुलसी गौडा. सोमवारी (दि.१६) काळाच्या पडद्याआड गेल्या. (Tulsi Gowda)
पर्यावरण आणि वृक्षसंवर्धनाच्या क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य अचाट आणि अफाट आहे. कालातीत आणि शब्दातीत आहे. त्यांचा जन्म कर्नाटकातील अंकोला तालुक्यातील होनाली गावात झाला. कसलेही औपचारिक शिक्षण नसतानाही, वनस्पती, झाडे आणि जंगलांबद्दलचे त्यांचे ज्ञान चकीत करणारे होते. त्यामुळेच त्यांना ‘वनाचा विश्वकोश’ म्हटले जात असे.
त्या दोन वर्षांच्या असतानाच त्यांच्यावरील वडीलांचे छत्र हरपले. त्यामुळे त्यांना त्यांच्या आईसोबत स्थानिक नर्सरीमध्ये मजूर म्हणून काम करावे लागले. बिया निवडणे, चांगल्या बिया बाजूला काढून त्या रोपासाठी ठेवणे, रोपासाठी पिशव्या तयार करणे, अशी कामे त्या सुरुवातीला करत असत. रोपे लावण्याबरोबरच त्यांनी शिकारी आणि जंगलातील आगीमुळे वन्यजीव वाचवण्याची जोखमीची जबाबदारीही पार पाडली. (Tulsi Gowda)
३० वर्षांहून अधिक काळ त्या वनविभागात अस्थायी स्वयंसेवक म्हणून त्यांनी काम केले. त्यांची कामाबद्दलची निष्ठा, समर्पण, वृक्षवल्लींचे त्यांचे ज्ञान आणि कठोर परिश्रम या गुणांमुळे त्यांना वनविभागाने कायमस्वरूपी नोकरीत घेतले. वयाच्या ७० व्या वर्षी त्या निवृत्त झाल्या. त्यांच्या या कार्यकाळात ३० हजारावर रोपे लावली आणि ती जगवली. ६० वर्षांहून अधिक काळ त्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी योगदान दिले.
पर्यावरणरक्षण आणि संवर्धनातील त्यांच्या असामान्य प्रयत्नांची दखल भारत सरकारने घेतली. भारत सरकारने तुलसी गौडा यांना २०२१ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. सेवेतून निवृत्त झाल्यानंतरही त्यांचे वनसंवर्धनाचे काम सुरूच होते. पर्यावरण आणि निसर्गप्रेमींसाठी त्यांनी केलेले काम भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. (Tulsi Gowda)
त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले. तुलसी गौडा यांचे काम पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणादायी आणि मार्गदर्शक राहील. निसर्गाचे संगोपन, हजारो रोपांची लावण आणि संवर्धन संवर्धन करण्यासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले. पर्यावरण संवर्धनासाठी त्या एक दिशादर्शक राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
ಕರ್ನಾಟಕದ ಪರಿಸರವಾದಿ ಮತ್ತು ಪದ್ಮ ಪ್ರಶಸ್ತಿ ಪುರಸ್ಕೃತರಾದ ಶ್ರೀಮತಿ ತುಳಸಿ ಗೌಡ ಅವರ ನಿಧನ ತೀವ್ರ ದುಃಖ ತಂದಿದೆ. ಅವರು ತಮ್ಮ ಇಡೀ ಬದುಕನ್ನು ಪ್ರಕೃತಿ ಪೋಷಣೆಗಾಗಿ ಮುಡಿಪಾಗಿಟ್ಟು, ಸಾವಿರಾರು ಗಿಡಗಳನ್ನು ನೆಟ್ಟು ಬೆಳೆಸಿ ನಮ್ಮ ಪರಿಸರವನ್ನು ಸಂರಕ್ಷಿಸಿದವರು. ಪರಿಸರ ರಕ್ಷಣೆಗೆ ಸದಾ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ನೀಡುವ ಬೆಳಕಾಗಿ ಅವರು ಉಳಿಯುತ್ತಾರೆ.… pic.twitter.com/b5cECGYw4f
— Narendra Modi (@narendramodi) December 17, 2024
हेही वाचा :
- किसान सन्मान योजनेचा निधी दुप्पट होणार
- सातारा जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा ‘ताप’
- न्यू यॉर्क ते लंडन एका तासात?