सोलापूर : प्रतिनिधी : शेअर बाजारामुळे कर्जबाजारी झालेल्या युवकाने दागिन्याच्या हव्यासापोटी वृद्धेचा खून केल्याची घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे घडली. पोलिसांनी या गुन्ह्यात चांगदेव पाटील या संशयिताला अटक केली आहे. गंगुबाई कालिदास गडदे असे खून झालेल्या वृद्धेचे नाव आहे. बार्शी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
बार्शी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक उमाकांत कुंजीर यांनी या गुन्ह्याची माहिती दिली. बार्शीतील शशिकांत किसन वायकुळे यांनी त्यांची ७३ वर्षीय बहिण गंगुबाई कालिदास गडदे २५ मार्चपासून बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. गंगुबाई या एकट्याच रहात होत्या. घरभाड्यातून त्यांचा उदरनिर्वाह होता. २५ मार्च रोजी कुणालाही न सांगता घराला कुलुप लावून त्या बेपत्ता झाल्या होत्या. दोन दिवस शोध न लागल्याने त्यांच्या चुलत भावाने पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. (Elderly Woman Murdered for Jewelry by Youth in Barshi)
सीसीटीव्ही संशयित आढळला
तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला. घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही तपासत असताना गंगुबाई गडदे या चांगदेव पाटील याच्यासोबत एका इमारतीत जाताना दिसून आल्या. पण तिथून बाहेर पडताना दिसल्या नाहीत. धक्कादायक बाब म्हणजे या परिसरातील सीसीटीव्ही जाणीवपूर्वक डिलिट करण्यात आल्याचे तपासात लक्षात आले. पोलिसांनी चांगदेव पाटील याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. (Elderly Woman Murdered for Jewelry by Youth in Barshi)
असा केला गुन्हा
चांगदेव पाटील हा गंगुबाई गडदे यांच्या घरी बरेच दिवस भाडेकरु होता. त्याने गंगुबाई यांचा विश्वास संपादन केला होता. चांगदेव पाटील याने २५ मार्च रोजी कट रचला. त्याने गंगुबाई गडदे यांना आपल्या घरी बोलावले. त्यांना लिंबू सरबतातून झोपेच्या गोळ्या दिल्या. त्या बेशुद्ध् झाल्यानंतर टॉवेलने नाक व तोंड दाबून खलास केले. त्यानंतर काळपट रंगाच्या पिशवीत मृतदेह भरला. आणि स्वत: च्या कारमधून मृतदेह बाहेर नेऊन मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याने चांगदेव पाटील कर्जबाजारी झाला होता. गंगुबाईकडील सोन्याचे दागिने चोरण्यासाठी त्याने हत्या केल्याची कबुली दिली. (Elderly Woman Murdered for Jewelry by Youth in Barshi)