Home » Blog » Djokovic : जोकोविच, झ्वेरेव, सबालेंकाची आगेकूच

Djokovic : जोकोविच, झ्वेरेव, सबालेंकाची आगेकूच

पुरुष एकेरीत पाचव्या मानांकित मेदवेदेवला पराभवाचा धक्का

by प्रतिनिधी
0 comments
Djokovic

मेलबर्न : नोव्हाक जोकोविच, अलेक्झांडर झ्वेरेव, आर्यना सबालेंका या खेळाडूंनी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेमध्ये आपापल्या गटातून चौथी फेरी गाठली. मिश्र दुहेरीच्या गटात भारताचा रोहन बोपण्णा आणि चीनची शुआई झँग या जोडीने विजयी सलामी दिली.(Djokovic)

विक्रमी दहावेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या सर्बियाच्या जोकोविचने तिसऱ्या फेरीत चेक प्रजासत्ताकच्या टोमास मॅकाकवर ६-१, ६-४, ६-४ अशी सरळ सेटमध्ये मात केली. चौथ्या फेरीत पुरुष एकेरीमध्ये त्याचा सामना चेकच्याच जिरी लेहेका याच्याशी होईल. द्वितीय मानांकित जर्मनीच्या झ्वेरेवने तिसऱ्या फेरीमध्ये ब्रिटनच्या जेकब फर्नलीचा ६-३, ६-४, ६-४ असा पराभव केला. चौथ्या फेरीत झ्वेरेवचा सामना फ्रान्सच्या चौदाव्या मानाकित युगो हम्बर्टशी होईल. तृतीय मानांकित स्पेनच्या कार्लोस अल्कारेझनेही विजयी घोडदौड कायम ठेवत तिसऱ्या फेरीत पोर्तुगालच्या ननो बोर्जेसला ६-२, ६-४, ६-७(३-७), ६-२ असे हरवले.(Djokovic)

पाचव्या मानांकित रशियाच्या डॅनिल मेदवेदेवला मात्र दुसऱ्या फेरीमध्ये धक्कादायक पराभव सहन करावा लागला. अमेरिकेच्या लर्नर तिएनने पाच सेटपर्यंत रंगलेल्या लढतीमध्ये मेदवेदेवचा ६-३, ७-६(७-४), ६-७(१०-८), १-६, ७-६(१०-७) असा पराभव केला. हा सामना तब्बल ४ तास ४८ मिनिटे रंगला. सुरुवातीचे दोन सेट गमावल्यानंतर मेदवेदेवने लागोपाठ दोन सेट जिंकून सामन्यात बरोबरी साधली होती. तथापि, निर्णायक सेटमध्ये तिएनने टायब्रेकरवर १०-७ अशी सरशी साधून विजय निश्चित केला.

महिला एकेरीत अग्रमानांकन असणाऱ्या बेलारुसच्या सबालेंकाने तिसऱ्या फेरीमध्ये डेन्मार्कच्या क्लारा टॉसनला ७-६(७-५), ६-४ असे पराभूत केले. चौथ्या फेरीत सबालेंका रशियाच्या मिरा अँड्रिव्हाविरुद्ध खेळेल. अमेरिकेच्या तृतीय मानांकित कोको गॉफने लेलाह फर्नांडेझला ६-४, ६-२ असे नमवून चौथी फेरी गाठली. चौथ्या फेरीमध्ये तिचा सामना स्वित्झर्लंडच्या बेलिंडा बेंकिकशी होईल. बेंकिंकने तिसऱ्या फेरीमध्ये जपानच्या नाओमी ओसाकाविरुद्ध पहिला सेट ७-६(७-३) असा जिंकून आघाडी घेतली असताना ओसाकाने सामन्यातून माघार घेतली. त्यामुळे, बेंकिकचा चौथ्या फेरीतील प्रवेश सुकर झाला.(Djokovic)

मिश्र दुहेरीमध्ये बोपण्णा-झँग जोडीचा विजय

रोहन बोपण्णा-शुआई झँग या जोडीने मिश्र दुहेरीच्या सलामीच्या सामन्यात क्रिस्टिना म्लाडेनोविच-इव्हान डॉडिग या जोडीचा ६-४, ६-४ असा पराभव केला. बोपण्णाला या स्पर्धेच्या पुरुष दुहेरीमध्ये पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे, त्याच्या स्पर्धेतील आशा केवळ मिश्र दुहेरीवर आहेत.

हेही वाचा :
सितांशू कोटक भारताचे नवे फलंदाजी प्रशिक्षक

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00