Home » Blog » Delhi CM: दिल्लीचा मुख्यमंत्री कोण?

Delhi CM: दिल्लीचा मुख्यमंत्री कोण?

भाजपकडून सस्पेन्स कायम, विधिमंडळ पक्षाची बैठक मंगळवारी

by प्रतिनिधी
0 comments
Delhi CM

नवी दिल्ली : भाजपने नवी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाच्या निवडीचा सस्पेन्स सोमवारीही कायम ठेवला. भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक सोमवारी (१७ फेब्रुवारी) होणार होती. मात्र ती रद्द करण्यात आली. ती आता १९ फेब्रुवारीला होणार असल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली आहे. (Delhi CM)

नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी १८ फेब्रुवारीला होणार होता. मात्र नावावर शिक्कामोर्तब झाले नसल्याने तो आता २० फेब्रुवारीला रामलीला मैदानावर होणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

‘सोमवारी होणारी भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही बैठक १९ फेब्रुवारीला होणार आहे. मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा १८ फेब्रुवारीऐवजी २० फेब्रुवारीला होणार आहे,’ असे पक्षाच्या सूत्राने सांगितले.

रविवारी पक्षाच्या दिल्ली कार्यालयात भाजपच्या कोअर ग्रुपच्या बैठकीनंतर तसे स्पष्ट झाले. बैठकीत शपथविधी सोहळ्याची तयारी आणि व्यवस्थेवर चर्चा झाली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, एनडीए आघाडीचे नेते, केंद्रीय मंत्री, नेते आणि चित्रपट आणि क्रीडा क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती या भव्य शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

भाजपने अद्याप दिल्लीसाठी मुख्यमंत्रिपदाची निवड जाहीर केलेली नाही. या पदासाठी अनेकांच्या नावांबाबत अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यात अरविंद केजरीवाल यांचा पराभव करणारे जायंट किलर परवेश वर्मा, सतीश उपाध्याय, विजेंदर गुप्ता आणि जितेंद्र महाजन यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. परवेश वर्मा हे माजी मुख्यमंत्री साहिब सिंग वर्मा यांचे पुत्र आहेत.

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत ७० पैकी ४८ जागा जिंकून भाजपने २७ वर्षांनंतर दिल्लीच्या सत्तेत पुनरागमन केले आहे. एक दशकाहून अधिक काळ राष्ट्रीय राजधानीत सत्ता गाजवणाऱ्या आम आदमी पक्षाचे फक्त २२ उमेदवार निवडून आले. २०२० मध्ये त्यांना ६२ जागा मिळाल्या होत्या. दुसरीकडे मतसंख्येमध्ये किरकोळ वाढ होऊनही काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही.

हेही वाचा :

हरवलेल्यांच्या शोधांत धास्तावलेले चेहरे…
नवी दिल्लीला भूकंपाचे धक्के
अमेरिकेतून आणखी ११६ स्थलांतरीत भारतीयांना पाठवले

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00