Home » Blog » Delhi Campaigning : भाजपकडून पोलिसांचा गैरवापर होण्याची शक्यता

Delhi Campaigning : भाजपकडून पोलिसांचा गैरवापर होण्याची शक्यता

दिल्ली निवडणूक मतदानाबाबत केजरीवालांचा आरोप

by प्रतिनिधी
0 comments
Delhi Campaigning

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा सोमवारी, (दि. ३ फेब्रुवारी) खाली बसला. यानिमित्त सत्ताधारी आम आदमी पक्ष, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसने दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत भव्य स्वतंत्र रॅली काढल्या. (Delhi Campaigning)

आपचे आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या रॅलीदरम्यान, भाजपला स्वत:चा पराभव दिसू लागला आहे. त्यामुळे मतदानादरम्यान ते पोलिसांचा गैरवापर करून घेण्याची शक्यता आहे, असा आरोप केला.

ते म्हणाले, ‘आता दिल्लीच्या वातावरणावरून हे स्पष्ट झाले आहे की आम आदमी पार्टी ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल करत आहे. भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव होणार आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष काहीही करेल हे उघड आहे. सर्व कायदे आणि संविधान बाजूला ठेवून ते दिल्ली पोलिसांचा गैरवापर करणार आहेत, अशा बातम्या आहेत. लोकांना घाबरवायचे आणि धमकावायचे, असे प्रकार त्यांच्याकडून होतील. त्यांना जे करायचे ते सगळे करतील.’

सर्वांत धोकादायक गोष्ट अशी आहे की, ते तुमच्याकडे येतील. खासकरून आमच्या गरीब वर्ग राहत असलेल्या भागात येऊन आम्ही निवडणूक आयोगाकडून आल्याचे सांगतील. तुम्हाला पैसे देतील आणि तुम्ही तुमचे मत द्या, असे सांगतील. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की निवडणूक आयोग तुमच्या घरी जाऊन मतदान करा असे सांगत नाही. ते तुमच्या बोटावर काळी खूण करतील. तसे अजिबात करू देऊ नका. ही सर्व गुंडगिरी थांबवण्याची व्यवस्था आम आदमी पार्टीने केली आहे, असा इशारा देऊन केजरीवाल यांनी, गेल्या दहा वर्षांत मोदी सरकारने सर्वसामान्यांसाठी काहीही केले नाही असा आरोप केला.

यमुनेवर रिव्हर फ्रंट बांधू : अमित शहा

जंगपुरा येथे भाजपच्या उमेदवारांसाठी गृहमंत्री अमित शहा यांची निवडणूक रॅली झाली. यावेळी ते म्हणाले, ‘केजरीवाल यांनी यमुना नदीत डुंबू असे सांगितले होते, पण त्यांनी तसे केले नाही. केजरीवाल जी, तुम्ही यमुना नदी स्वच्छ केली नाही, पण आज मला सांगायचे आहे की आम्ही सत्तेत आल्यानंतर तीन वर्षांत नदीवर यमुना रिव्हर फ्रंट बांधू.’

दरम्यान, ‘येथील लोक नरकमय जीवन जगत आहेत,’ अशी टीका भाजपचे रमेश बिधुरी यांनी ‘आप’च्या मुख्यमंत्री आतिशी यांच्यावर केली.

आतिशी यांच्यावर हल्लाबोल करत त्यांनी मतदारसंघात कोणतेही काम केले नाही आणि रहिवासी गरीब परिस्थितीशी झुंजत आहेत, असा आरोप बिधुरी यांनी केला.

बिधुरी यांनी काँग्रेस नेत्या अलका लांबा यांचाही समाचार घेतला. ‘अलका लांबा या आधीच आपमधून काँग्रेसमध्ये सामील झाल्या आहेत. त्यांच्यावर लोक विश्वास ठेवत नाहीत. भाजप हा एकमेव विश्वसनीय पर्याय आहे. आम्ही विश्वासू पक्षाचे कार्यकर्ते आहोत. पंतप्रधान मोदी हे आमचे नेते आहेत, ज्यांच्यावर लोकांचा विश्वास आहे,’ असे ते म्हणाले.

दिल्ली विधानसभेसाठी ५ फेब्रुवारीला मतदान होत आहे.

 

हेही वाचा :

 महाराष्ट्रात अख्ख्या हिमाचलएवढे मतदार वाढले कसे?
‘मोदी-योगी राजीनामा द्या’

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00