Home » Blog » Cyclone Montha : मोंथा चक्रीवादळ आज रात्री धडकणार

Cyclone Montha : मोंथा चक्रीवादळ आज रात्री धडकणार

by प्रतिनिधी
0 comments
Cyclone Montha

नवी दिल्ली : मोंथा चक्रीवादळ आंध्र किनारपट्टीवर वेगाने सरकत असून आज रात्री काकीनाड्याजवळ धडकणार आहे. हंगामातील हे पहिले मोठ वादळ आहे. आंध्र प्रदेश, ओरिसा आणि तामिळनाडू या तीन राज्यांना फटका बसणार आहे. या तीन राज्यात प्रतितास ११० किलो मीटर वेगाने वारे वाहणार असून मुसळधार पाऊस पडणार आहे. तीन राज्यात रेड अलर्ट जाहीर केला असून बचाव पथके तैनात केली आहेत. या वादळाचा फटका वीज आणि दळणवळण क्षेत्राला बसण्याची भिती व्यक्त केली जात आहे. (Cyclone Montha)

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) रेड अलर्ट जारी केला आहे. वादळामुळे प्रतितास ११० किमी वेगाने वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे वादळाने वीजपुरवठा खंडित होण्याची, झाडे उन्मळून पडण्याची आणि दळणवळणाला फटका बसण्याची शक्यता आहे.

आंध्र किनारपट्टीला फटका बसणार

आज मंगळवारी रात्री मछलीपट्टनम आणि कलिंगपट्टनम दरम्यान काकीनाडाजवळ मोंथा चक्रीवादळ धडकणार आहे, ज्यामुळे आंध्र प्रदेश , ओडिशा आणि उत्तर तामिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. प्रतितास ११० किमी  वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याचे रुपांतर तीव्र चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. वादळाचा श्रीकाकुलम, विझियानगरम, विशाखापट्टणम, पूर्व गोदावरी, एलुरु आणि पश्चिम गोदावरी यांसारख्या जिल्ह्यांसह किनारपट्टीवरील आंध्र प्रदेशात याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

आंध्रात ७८७ गर्भवतील महिलांना रुग्णालयात हलवले

मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी अधिकाऱ्यांना “शून्य जीवितहानी” आणि नुकसान कमीत कमी होण्यासाठी आधिकाऱ्यांना बचाव कार्य राबवण्याचे आदेश दिले आहे. किनारपट्टीवरील रहिवाशांना पुनर्वसन केंद्रांमध्ये हलवले जात आहे. त्यांच्या जेवण, पिण्याचे पाणी आणि वैद्यकीय मदतीची व्यवस्था केली आहे. प्रत्येक केंद्राच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खबरदारी म्हणून प्रसूतीच्या जवळ असलेल्या सुमारे ७८७ गर्भवती महिलांना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. (Cyclone Montha)

एनडीआरएफ, एसडीआरएफची पथके सज्ज

आंध्र प्रदेशात ११ एनडीआरएफ आणि १२ एसडीआरएफ पथके आता सज्ज आहेत. प्रत्येक पथकाला बोटी, लाईफ जॅकेट, ओबीएम, जलतरणपटू आणि वैद्यकीय किट देण्यात आल्या आहेत. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एपीएसडीएमए) चोवीस तास कार्यरत राहण्यासाठी नियंत्रण कक्ष सक्रिय केले आहेत आणि आपत्कालीन रुग्णवाहिका नेटवर्क, १०८ आणि १०४ पूर्णपणे कार्यरत आहेत.

अधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे की जोरदार वादळामुळे झाडे आणि विजेचे खांब उन्मळून पडू शकतात, ज्यामुळे वीजपुरवठा आणि दूरसंचार नेटवर्क विस्कळीत होऊ शकतात. भूस्खलनानंतर २४ तासांच्या आत वीज आणि रस्ता मोकळा करण्यासाठी वीज आणि रस्ते विभागातील पुनर्संचयित पथके उच्च-जोखीम असलेल्या भागात तैनात आहेत. (Cyclone Montha)

ओरिसातील आठ जिल्ह्यांना फटका

जरी हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशात धडकणार असले तरी, ओरिसा आठ दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये, मलकानगिरी, कोरापूट, नबरंगपूर, रायगड, गजपती, गंजम, कालाहांडी आणि कंधमालमध्ये मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे. १,४९६ गर्भवती महिलांसह सुमारे ३,००० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. १४४५ चक्रीवादळ निवारा केंद्रे उघडण्यात आली आहेत आणि १४० बचाव पथके (एनडीआरएफ, ओडीआरएएफ, अग्निशमन सेवा) तैनात करण्यात आली आहेत. नऊ जिल्ह्यांमधील सर्व शाळा आणि अंगणवाड्या ३० ऑक्टोबरपर्यंत बंद राहतील.

तामिळनाडूत बचाव पथके सज्ज

सोमवारी चेन्नई, तिरुवल्लूर, रानीपेट आणि कांचीपुरमसह उत्तर तामिळनाडूमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडला. प्रादेशिक हवामान केंद्राने (आरएमसी) सांगितले की, चक्रीवादळ आंध्र प्रदेश ओलांडल्यानंतरही या प्रदेशात पाऊस सुरूच राहील. तिरुवल्लूर आणि चेन्नई जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे, तर उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन म्हणाले की, राज्य पूर नियंत्रण उपाय आणि वैद्यकीय तयारीसह “पूर्णपणे सज्ज” आहे.

रेल्वे, विमानसेवा रद्द

दृश्यमानता कमी होत चालल्याने आणि मुसळधार पावसामुळे विशाखापट्टणमहून जाणाऱ्या ४३ गाड्या आणि इंडिगो आणि एअर इंडिया एक्सप्रेसच्या अनेक विमान सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. सोमवारी दिल्ली-विजाग इंडिगोचे विमान भुवनेश्वरकडे वळवण्यात आले. विजयवाडा विमानतळाने मंगळवारी होणाऱ्या अनेक सेवा स्थगित केल्या आहेत. पूर्व किनारपट्टी रेल्वेने वॉल्टेअर क्षेत्रात धावणाऱ्या काही गाड्या वळवल्या आहेत आणि काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट केल्या आहेत.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00