बेळगाव : प्रतिनिधी : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत सरकारी परिपत्रके मराठीत द्या, अशी मागणी करत गुरुवारी (२४ जुलै) तीन मराठी नगरसेवकानी सभात्याग केला. बैठक सुरु होताच मराठी भाषिक नगरसेवक रवी साळुंखे यांनी सरकारने केलेल्या कन्नड सक्ती विरोधात जोरदार घोषणा दिल्या. (Corporators walk out)
उच्च न्यायालयच्या आदेशानुसार मराठी भाषिकांना सरकारी परिपत्रके, बैठकीच्या सूचना आदी मराठीत द्यायला पाहिजेत, अशी मागणी साळुंखे यांनी केली. यावेळी सभागृहात अन्य नगरसेवकांनी त्याला विरोध केला, पण साळुंखे यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत दाखवत आपले म्हणणे ठामपणे मांडले. सभागृहात सत्ताधारी नगरसेवकांनी गदारोळ करत रवी साळुंखे यांना त्यांचे म्हणणे मांडण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला पण साळुंखे यांनी त्याला दाद न देता आपले म्हणणे जोरदारपणे मांडले. (Corporators walk out)
महापौरांच्या कारवरील मराठी फलक काढल्याच्या प्रकाराचाही साळुंखे आणि अन्य नगरसेवकांनी निषेध केला. त्यानंतर मराठी भाषिक नगरसेवक रवी साळुंखे, शिवाजी मंडोळकर आणि वैशाली भातकांडे यांनी सभात्याग केला.
यावेळी महापौरानी काही काळाकरता सभागृहाचे कामकाज तहकूब केले. आमचा कन्नड भाषेला विरोध नाही पण उच्च न्यायालयच्या आदेशानुसार आम्हाला मराठीत परिपत्रके मिळाली पाहिजेत अशी आमची मागणी आहे, असे या मराठी भाषिक नगरसेवकांनी माध्यमाशी बोलताना सांगितले.