मुंबई; जमीर काझी : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी जलदगतीने करत आहे. त्यामुळे वाल्मीक कराडने शरणागती पत्करली आहे. या प्रकरणी काहीजण राजकरण करत आहे. त्यांना ते लखलाभो, पण आम्ही एकाही दोषीला सोडणार नाही, कठोर शिक्षा होईपर्यत स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. (CM Fadnavis)
या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार व मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराड हा २१ दिवस फरारी होता. आज (दि.३१) पुण्यात त्याने सीआयडी पोलिसांसमोर शरणागती पत्करली. त्याबाबत राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया व्यक्त होत असताना फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधत सरकारची भूमिका स्पष्ट केली.
ते म्हणाले, मला या प्रकरणाच्या राजकारणात जायचे नाही. आमच्यासाठी संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा होणे महत्त्वाचे आहे. काही जणांना राजकारण महत्त्वाचं आहे, ते राजकारण लखलाभ. मला कोणत्याही राजकीय वक्तव्यात जायचे नाही. त्यांनी राजकारण करत राहवे, आमची भूमिका संतोष देशमुख यांना न्याय देण्याची आहे, तो आम्ही मिळवून देऊ, असे सांगून ते म्हणाले, ‘मी पहिल्या दिवसापासून सांगतोय, बीडच्या प्रकरणात कुणालाही आम्ही सोडणार नाही. ज्याचा ज्याचा संबंध आढळेल, ज्या-ज्या प्रकरणात आढळेल त्या प्रत्येकावर कारावाई करण्यात येईल. अतिशय कडक कारवाई करण्यात येईल. गुंडाचे राज्य आम्ही चालवू देणार नाही. कुणालाही या प्रकारे हिंसा करता येणार नाही. खंडणी मागता येणार नाही. यादृष्टीनं तपास अतिशय गतीशील केलेला आहे. हत्येमधील फरार आरोपींना पकडण्यासाठी वेगवेगळ्या टीम कामाला लागल्या आहेत. कोणत्याही आरोपीला आम्ही सोडणार नाही.
माझी स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या बंधूंशी फोनवर चर्चा झाली आहे. त्यांना काळजी न करण्याचे आश्वासन दिले आहे. काही वाट्टेल ते झाले तरी सर्व दोषी शोधून, ते फासावर लटकत नाहीत तोपर्यंतची सर्व कारवाई पोलीस करतील. हा विश्वास त्यांना दिला आहे. वाल्मीक कराडवर कोणता गुन्हा दाखल होईल, हे पोलीस सांगतील, ते पोलिसांचं काम आहे. ही केस जाणीवपूर्वक सीआयडीला देण्यात आली आहे. त्यांना पूर्ण स्वायत्ता दिली आहे. त्यांच्यावर कुणाचाही दबाव चालवून घेतला जाणार नाही. (CM Fadnavis )
धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार का?, अशी विचारणा केली असता ते म्हणाले ‘ मला या प्रकरणाच्या राजकारणात जायचे नाही. माझ्यासाठी संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा होणे महत्त्वाचं आहे. काही जणांना राजकारण महत्त्वाचं आहे. मला कोणत्याही राजकीय वक्तव्यात जायचं नाही. त्यांनी राजकारण करत राहवे, आमची भूमिका संतोष देशमुख यांना न्याय देण्याची आहे, जोजो यामध्ये दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. तुमच्याकडे पुरावा असल्यास त्यांनी तो द्यावा पोलिस त्याचा शोध घेत आहे. असे त्यांनी स्पष्ट केले. (CM Fadnavis)
हेही वाचा :
- वाल्मिक कराडची शरणागती
- राज्यघटनेच्या मूळ प्रत, दुर्मिळ ग्रंथ वाचायचे आहेत…?
- जिमी कार्टर आणि कार्टरपुरी