Home » Blog » CM Fadanavis: नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा : मुख्यमंत्री

CM Fadanavis: नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा : मुख्यमंत्री

by प्रतिनिधी
0 comments
CM Fadanavis

मुंबई : विशेष प्रतिनिधी : मुसळधार पावसाने निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सार्वजनिक व्यवस्था ठप्प झाली आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. या परिस्थितीत नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे संपूर्ण प्रशासनाने अलर्ट मोडवर रहावे. नुकसान झालेल्या ठिकाणांचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी दिले आहेत. (CM Fadanavis)

राज्याच्या मुख्य सचिव आणि राज्याच्या आपत्ती निवारण कक्षाशी ते सातत्याने संपर्कात असून त्याचा आढावा घेत आहेत.

राज्यात पुणे, सातारा, सोलापूर, रायगड, मुंबई आणि एमएमआर या भागात अतिवृष्टी झालेली आहे. दौंडमध्ये ११७ मि.मी., बारामतीत १०४.७५ मि.मी., इंदापुरात ६३.२५ मि.मी. इतका पाऊस झाला आहे. बारामतीत २५ घरांची अंशत: पडझड झाली आहे. पुरात अडकलेल्या सात जणांना वाचविण्यात आले आहे. ७० ते ८० कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. मोबाईल सेवा काही काळ विस्कळित झाल्या होत्या. त्या आता पूर्ववत होत आहेत. इंदापूर येथे दोघांना पूरस्थितीतून बाहेर काढण्यात आले आहे. फलटणमध्ये १६३.५ मि.मी. इतका पाऊस झाला. एनडीआरएफचे एक पथक फलटणमध्ये आहे. ३० ग्रामस्थ दुधेभावी गावाशेजारी अडकले होते. त्यांना निवास आणि भोजनाची सुविधा पुरविण्यात आली आहे. (CM Fadanavis)

सोलापूरमध्ये ६७.७५ मि.मी. पाऊस झाला. माळशिरस तालुक्यात ६ नागरिक पुरात अडकले होते, त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. पंढरपूर येथे भीमा नदी पात्रात तीन जण अडकले, त्यांचे बचावकार्य सुरु आहे. रायगडमध्ये एकाचा वीज पडून मृत्यू झाला, तर महाड ते रायगड किल्ला रस्ता अतिवृष्टीमुळे बंद करण्यात आला आहे.

मुंबईत २४ तासात १३५.४ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत एकूण ६ ठिकाणी पाणी साचण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. एकूण १८ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्याच्या तर ५ ठिकाणी इमारतीच्या भींती पडण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मुंबई महापालिका, अग्निशमन दल, मुंबई पोलिस आणि इतरही सर्व यंत्रणा सज्ज आहेत. कुठेही प्राणहानी झालेली नाही. मुंबईत ५ ठिकाणी एनडीआरएफ टीम कुठल्याही प्रकारच्या मदतीसाठी सज्ज आहेत. (CM Fadanavis)
दरम्यान, मुंबईत पुढील २४ तास विजांचा गडगडाट आणि वादळी वार्‍यासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याच्या मुख्य सचिव तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या विविध यंत्रणांना सतर्क आणि सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. एनडीआरएफ – एसडीआरएफ, अग्निशमन, महसूल प्रशासन तसेच गृह विभाग आदींना नियंत्रण कक्षांच्या माध्यमातून तातडीच्या उपाययोजना आणि मदत व बचावासाठीची सज्जता ठेवण्याच्या अनुषंगानेही त्यांनी विविध सूचना केल्या. जलसंपदा विभागाशी सातत्यपूर्ण समन्वय ठेवण्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत.

हेही वाचा :
मुंबई, बारामती, कोकणाला पावसाने झोडपले
अवकाळीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00