लाहोर : चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेतील ‘ग्रुप बी’मध्ये ऑस्ट्रेलिया-अफगाणिस्तान सामना शुक्रवारी पावसामुळे अनिर्णित राहिला. सामना अनिर्णित राहिल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला आहे. परिणामी, ऑस्ट्रेलियाच्या खात्यात चार गुण झाले असून त्यांचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित झाले आहे. (Champions Trophy Cricket)
अफगाणिस्तानने ठेवलेल्या २७३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने ट्रॅव्हिस हेडच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर १२.५ षटकांत १ बाद १०९ धावा केल्या. त्याचवेळी पावसाला सुरुवात झाल्याने सामना थांबवण्यात आला. दोन तासांनंतरही पावसाचा जोर कायम राहिल्याने पंचांनी अखेर सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. सामन्याचा निकाल लागण्यासाठी दोन्ही संघांचा प्रत्येकी २० षटकांचा खेळ होणे आवश्यक असल्याने सामना अनिर्णित राहिला. ‘ग्रुप बी’मध्ये आता दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांचे प्रत्येकी ३ गुण असले, तरी आफ्रिकेची सरासरी अफगाणिस्तानपेक्षा सरस आहे. शनिवारी, या गटातील अखेरच्या सामन्यात इंग्लंडने जर २०७पेक्षा अधिक धावांच्या फरकाने आफ्रिकेवर मात केली, तरच अफगाणिस्तानसाठी उपांत्य फेरीची दारे खुली होऊ शकतात. अन्यथा, ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका हे दोन संघ उपांत्य फेरी गाठतील.
तत्पूर्वी, अफगाणिस्तानने बलाढ्य ऑस्ट्रेलियासमोर २७३ धावांचे आव्हान ठेवले. अफगाणिस्तानतर्फे सेलिकुल्लाह आणि अझमतुल्लाहने अर्धशतके झळकावली. सेदिकुल्लाह अटलने ९५ चेंडूत ८५, तर अझमतुल्लाह ओमरझाईने ६३ चेंडूत ६७ धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियासमोर चांगल्या धावसंख्येचे आव्हान ठेवले. (Champions Trophy Cricket)
अफगाणिस्तानला माफक धावसंख्येवर रोखण्याचे ऑस्ट्रेलियाचा मनसुबा अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी उधळून लावला. ऑस्ट्रेलियाने पहिल्याच षटकात स्पेन्सर जॉन्ससने रहमानल्लाह गुरबाझला बाद केले. ऑस्ट्रेलियाच्या फिरकी गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. अडम झाम्पाने दोन गडी बाद केले तर ग्लेन मॅक्सवेलने एक बळी मिळवला. ऑस्ट्रेलियाकडून सर्वांत यशस्वी गोलंदाज ठरला बेन द्वारशइस. त्याने तीन गडी बाद केले. (Champions Trophy Cricket)
पहिल्याच षटकात गुरबाझला स्पेन्सर जॉन्सने बाद केल्यानंतर इब्राहिम झद्रान आणि सेदिकुल्लाह अटलने डाव सावरला. झद्रानला ॲडम झाम्पाने २२ धावावर बाद केले. त्यानंतर रहमत शहाला (१२) ग्लेन मॅक्सवेलने तर कर्णधार हशमतुल्लाह शाहिदीला (२०) झाम्पाने तंबूत परतवले. त्यानंतर सेदुकुल्लाह आणि अझमतुल्लाहची जोडी जमली. दोघांनी चांगली भागिदारी करत अफगाणिस्तानला चांगल्या धावसंख्येवर पोचवले. दोघेही अफगाणिस्तानची मोठी धावसंख्या उभारणार असे वाटत असताना अझमुल्लाह (८५) आणि सेदुकल्लाह (६७) बाद झाले. त्यानंतर मोहम्मद नबीने १, गुलदिन नायबने ४, नूर अहमदने ६ धावा केल्या. रशिद खानने शेवटच्या षटकात फटकेबाजी करत १७ चेंडूत १९ धावा केल्या. अफगाणिस्तानने ५० षटकात सर्वबाद २७३ धावा केल्या. (Champions Trophy Cricket)
संक्षिप्त धावफलक – अफगाणिस्तान – ५० षटकांत सर्वबाद २७३ (सेदिकुल्लाह अटल ८५, अझमतुल्लाह ओमरझाई ६७, बेन द्वारशइस ३-४७, ॲडम झाम्पा २-४८) अनिर्णित विरुद्ध ऑस्ट्रेलिया – १२.५ षटकांत १ बाद १०९ (ट्रॅव्हिस हेड नाबाद ५९).
हेही वाचा :