मुंबई प्रेस क्लबने घेतलेल्या छायाचित्र स्पर्धेत बॉलीवूड विभागातील प्रथम क्रमांकाचे हे छायाचित्र टिपले आहे पीटीआयचे छायाचित्रकार गौतम सेन यांनी.
साहित्य-संस्कृती
समकालीन माध्यमे विशेषतः कार्टून, अॅनिमेशन मालिका, बालकेंद्रित चित्रपट, वेबसीरिज आणि लोकप्रिय मनोरंजन आजच्या समाजाच्या लिंगविषयक कल्पना व सत्ताकेंद्रांचे प्रतिबिंबित मानली जातात. या माध्यमांमध्ये वारंवार दिसणारा “त्याच्या विश्वातील एकमेव ‘ती’” हा पॅटर्न सामाजिक संशोधनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. या पॅटर्नमध्ये अनेक पुरुष पात्रांच्या समूहात फक्त एकच स्त्री/मुलगी दाखवली जाते, आणि तिची भूमिका बहुतांश वेळा सजावटीची, सहाय्यक किंवा भावनिक आधारपुरती मर्यादित असते. ही उपस्थिती टोकनिझमचा भाग असल्यामुळे स्त्रीची एजन्सी, म्हणजेच तिची निर्णयक्षमता किंवा कथानकावरचा वास्तविक प्रभाव, कमी होतो.
स्नेहल घोरपडे-नकाते
अनेक लोकप्रिय कार्टूनमध्ये “त्याच्या विश्वातील एकमेव ‘ती’” हा पॅटर्न स्पष्टपणे दिसून येतो. छोटा भीम मध्ये छुटकी, पोकेमन मध्ये मिस्टी, डोरेमन मध्ये शिझुका , बेन टेन, तसेच शिंचन आणि स्कूबी- डुबी, चिकू बंटी, अभिमन्यू, मायटी राजू, टीटू यांसारख्या मालिकांमध्ये एकमेव मुलगी पात्र दिसते. मोटू पतलू सारखे भारतातील सर्वात प्रसिद्ध कार्टूनमध्ये एकही स्त्रीपात्र नाहीये. या सर्व कथानकांमध्ये मुलांची संख्या अधिक असून स्त्री पात्रांना सहाय्यक, भावनिक किंवा स्टीरिओटाइपिकल भूमिकांमध्ये मर्यादित ठेवले जाते. त्यामुळे माध्यमांमध्ये स्त्रीप्रतिमेचे टोकनिझम (प्रतीकात्मक) प्रतिनिधित्व अधिक खोलवर समोर येते. माध्यमांमध्ये दिसणाऱ्या या मर्यादित स्त्रीप्रतिमेमुळे सामाजिक पातळीवरही अनेक परिणाम घडतात.
बालक हे या सामग्रीचे प्राथमिक ग्राहक असल्याने, बालपणीचे दृश्य-अनुभव त्यांच्यातील लिंगसमज आणि व्यक्तिमत्वाची घडण यावर खोल प्रभाव टाकतात. मुलींना कथांमध्ये त्यांच्या प्रतिनिधित्वाची संख्या कमी असल्याची जाणीव होते; तसेच नेतृत्व, साहस किंवा समस्यांवर उपाय शोधण्याच्या भूमिका स्वतःसाठी कमी शक्य आहेत असा समज तयार होऊ शकतो. दुसरीकडे मुलांच्या मनात साहस, तंत्रकुशलता, निर्णयक्षमता इत्यादी गुण केवळ पुरुषांशी संबंधित आहेत असा चुकीचा विश्वास निर्माण होऊ शकतो. परिणामी लिंग-समता, परस्पर आदर आणि सहकार्य या मूल्यांची सामाजिक पातळीवर मर्यादित जाणीव होते. (Representation of women in the media and gender equality)
‘एकमेव मुलगी’ पात्राचे विश्लेषण करताना असे आढळते की तिच्या व्यक्तिमत्वाची बांधणी स्टीरिओटाइप्सवर (पूर्वग्रहित प्रतिमा) आधारित असते. ती कार्टूनमध्ये मुलीला बहुतेक वेळा ठराविक स्त्रीसुलभ प्रतिमेत दाखवले जाते. गुलाबी रंग, रिबीन, नाजूक चेहरा, गोड हावभाव यातून तिचे स्त्रीत्व दर्शवले जाते. तिच्या व्यक्तिरेखेत नम्रता, काळजी, भावनिकता हे गुण अधोरेखित केले जातात. ती गटातील “एकमेव मुलगी”म्हणूनच दिसते आणि कथानकात सहाय्यक भूमिका निभावते. त्यामुळे मुलीचे स्त्रीत्व सौंदर्य, नम्रता आणि दुय्यम भूमिकांपुरते मर्यादित केलेले दिसते. सुंदर, भावनिक, विनयशील आणि सहाय्यक म्हणून दाखवली जाते, परंतु क्वचितच स्वतंत्र निर्णय घेणारी किंवा कथानक पुढे नेणारी सक्रिय भूमिका निभावते. अशा मर्यादित चौकटी समाजातील पितृसत्ताक कल्पनांना बळ देतात आणि महिलांच्या संभाव्य क्षमतांचे संकुचित चित्र उभे करतात. ही प्रक्रिया माध्यमांमध्येच नाही तर व्यापक सामाजिक संरचनेतही लिंगभेदाला मान्यता देते. लिंगभाव -संवेदनशील माध्यमनिर्मितीसाठी काही आवश्यक दिशादर्शक उपाय सुचवता येतीत. (Representation of women in the media and gender equality)
सर्वप्रथम, अनेक महिला पात्रे असलेली, विविध स्वभाव, कौशल्ये आणि पार्श्वभूमी असलेली कथानके विकसित करणे आवश्यक आहे. केवळ उपस्थितीसाठी नव्हे, तर कथानकाच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका निभावणारी सक्रिय महिला एजन्सी असणे गरजेचे आहे. स्टीरिओटाइप्सपासून (पूर्वग्रहित प्रतिमा) दूर जात वास्तववादी, सक्षम आणि बहुआयामी स्त्रीप्रतिमा निर्माण करणे हे मुलांच्या सर्वांगिण मानसिक व सामाजिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. मुलांना लिंगसमतेची जाण, सहकार्याची वृत्ती आणि विविधतेचा आदर शिकवण्यासाठीमाध्यमांनी जबाबदारीने सामग्री सादर करण्याची गरज आहे. (Representation of women in the media and gender equality)
“त्याच्या विश्वातील एकमेव ‘ती’” हा पॅटर्न केवळ मनोरंजनातील साधा योगायोग नसून समाजातीलपितृसत्ताक विचारसरणीचे पुनरुत्पादन करणारा एक गंभीर सांस्कृतिक संकेत आहे. माध्यमे ही बालकांच्या कल्पनाविश्वाची मूलभूत रचना घडवतात, त्यामुळे स्त्री आणि पुरुष यांचे संतुलित, समतोल आणि सक्षमप्रतिनिधित्व अनिवार्य ठरते. टोकनिझमच्या (प्रतीकात्मक) पलीकडे जाऊन स्त्री पात्रांना प्रभावी स्थान देणे केवळ माध्यमांची गुणवत्ता वाढवणारे नाही, तर समतावादी समाजनिर्मितीसाठीही अत्यावश्यक आहे.
चंदन आणि शोएब हे दोघे मित्र आहेत. दोघंही पोलिस भरतीसाठी प्रयत्न करीत असतात.
शोएबचा जवळचा नातेवाईक पोलीस खात्यात अधिकारी असतो. त्याच्याकडून काही मदत होईल या आशेनं तो त्याच्याकडं जातो. तेव्हा तो अधिकारी नातलग त्याला सांगतो की, एका जागेसाठी सातशेहून अधिक जणांमध्ये स्पर्धा आहे. सगळी प्रक्रिया राज्य पातळीवरून होते. तिथं माझा कुणाचा परिचय नाही. त्यामुळं वडिलांचं ऐक आणि दुबईला जा.
त्यावर शोएब त्यांना विचारतो, `तुम्हाला वाटलं नाही का कधी दुबईला जावं?` (Homebound)
-`मलाही वाटलं. पण बाहेर जाऊन स्वतःला बदलण्यापेक्षा इथं राहून आतून काही बदलणं चांगलं म्हणून मी इथंच राहिलो. आपले पूर्वज इथंच जगले. इथल्याच मातीत दफन झाले. त्यांचे आशीर्वाद या हवेत आहेत.`
शोएब म्हणतो- `घराजवळची अजान ऐकताना वाटतं, कुणी वडिलधा-या माणसानं डोक्यावर हात धरलाय. अम्मी टॉमॅटोची चटणी बनवते, त्याचा जो घमघमाट असतो तो दुबईच काय जगात कुठं मिळणार नाही. आपली माती, हवा, रस्ते, यारदोस्त, आपली भाषा हे सगळं मिळून तर आपलं घर आहे. हे सगळं सोडून कसं जायचं…?` (Homebound)
हा संवाद नुसता तरल आणि काव्यात्मक म्हणून सोडून देता येणार नाही. आपल्या मातीबद्दल, अवतीभवतीच्या माणसांबद्दल किती ओतःप्रोत जिव्हाळा भरून राहिलाय हे त्यातून दिसतं. इथल्या हवेच्याही प्रेमात असलेल्या समाजाबद्दल इथले बहुसंख्य किती विखारी विचार करीत असतात, याची तीव्र जाणीव इथं झाल्यावाचून राहात नाही.
वेगळा सिनेमा (Homebound)
`होमबाऊंड` हा नीरज घायवानचा सिनेमा नेटफ्लिक्सवर आलाय. त्याबद्दल आपण बोलतोय.
नीरज घायवान हा भयंकर त्रासदायक दिग्दर्शक आहे. अनुराग कश्यपच्या तालमीत तयार झालेल्या या गृहस्थाची सामाजिक प्रश्नांबाबतची, माणसाच्या रोजच्या जगण्यावर होणा-या त्याच्या परिणामांची जी समज आहे, ती आजच्या काळात दुर्मिळातली दुर्मीळ म्हणावी अशी आहे. तो कुठला झेंडा मिरवत नाही. पण आपल्याला जे म्हणायचंय ते थेटपणे कुठलाही आडपडदा न ठेवता मांडतो. सामाजिक प्रश्नांना भिडणारे दिग्दर्शक म्हणून आपल्याकडं ज्यांचा गवगवा केला जातो, त्यातले अनेकजण नीरज घायवानसमोर उघडे पडतात.
बनारस आणि गंगा नदी ही निव्वळ पार्श्वभूमीपुरती, तिथल्या विहंगम दृश्यांपुरती, साधु-गोसाव्यांच्या फुटेजपुरती वापरली जात असल्याच्या काळात तो `मसान`मधून बनारसच्या जगण्यातले अनेक पदर उलगडून दाखवतो. आपल्या सांस्कृतिक परंपरेत गंगेचा एकटीचा विचार कधी होत नाही. गंगा-यमुनेचा एकत्रित उल्लेख होत असतो. तसंही कुणाचं जगणं एकट्यानं एकमार्गी नसतंच. त्याला समांतर काहीतरी वाहत असतं, ते पूरक आणि आवश्यकही असतं. `मसान`मध्ये असे दोन प्रवाह दिसले.
`होमबाऊंड` मध्येही असेच दोन प्रवाह समांतर वाहताना दिसतात. अलीकडच्या काळात इतका त्रास खचितच एखाद्या कलाकृतीनं दिला असेल. झोप उडवून टाकणारा, आतून हलवूनच नव्हे, तर उदसून टाकणारा असा हा सिनेमा आहे.
`मसान`मध्ये जसे दोन प्रवाह आहेत
तसेच होमबाऊंडमध्येही दोन प्रवाह आहेत. दोन मित्रांचे. त्यांच्या जगण्याच्या संघर्षाचे. (Homebound)
चंदन दलित आहे. शोएब मुस्लिम. या दोन्ही समाजघटकांना रोजच्या जगण्यात कोणत्या संघर्षातून जावं लागतं, ते होमबाऊंड दाखवतो. कुठंही भाषणबाजी न करता. कसलाही आव न आणता. एका छोट्या खेड्यापासून शहरापर्यंतचा आणि तिथून परत खेड्यापर्यंतचा हा प्रवास आहे. वर्तमानातल्या जगण्यातले पेच मांडायचे तर ते मुळात समजून घ्यावे लागतात. त्यासाठी तेवढी आकलनक्षमता लागते. नीरज घायवाननं `मसान`मध्ये स्वतःला सिद्ध करून दाखवलंय. `होमबाऊंड` हा त्यापुढचा टप्पा आहे. इथं खोटं काही दाखवलं जात नाही. अगदी प्रेमही. एका मित्राला नोकरी लागली म्हणून दुसरा पेढे वाटत नाही. आपली संधी गेली म्हणून तो दुखावला जातो. सिनेमात न पटण्याजोगं असं वास्तव नीरज घायवान दाखवतो.
खरंतर हा करोनाकाळातला सिनेमा आहे. त्या काळात कष्टकरी समूहांवर संकटांचा जो डोंगर कोसळला त्याचंही अस्वस्थ करणारं चित्रण सिनेमा करतो. पण दोन तासांच्या सिनेमात करोना अखेरच्या चाळीस मिनिटात येतो. त्याआधी आहे तो आपल्या समाजाचा आरसा.
दलितांना कसं पदोपदी हेटाळणीला सामोरं जावं लागतं. आरक्षणावरून टोमणे खावे लागतात. ते इतके जिव्हारी लागणारे असतात की अनेकदा जात लपवून जगावं लागतं. दुसरीकडं अल्पसंख्यांकांच्याकडं बघण्याची शिक्षित समाजाची दृष्टी किती दूषित बनली आहे, हेसुद्धा दिसतं. दोन्ही समाजघटकांबद्दल द्वेष बाळगणारा मोठा वर्ग आपल्याकडं आहे. त्यांच्याकडून अपमानाचे घोट पचवत हे समाजघटक इथं जगत असतात. इथल्या मातीवर, माणसांवर प्रेम करीत असतात. (Homebound)
चंदन आणि शोएबच्या जगण्याचे दोन प्रवाह. त्या माध्यमातून समाजातली कुरुपता टोकदारपणे सिनेमात मांडलीय. त्याचबरोबर माणसांचा चांगुलपणा आणि माणूसकीही आहे.
एकुणात झोप उडवणारा हा सिनेमा आहे.
नीरज घायवानला कडक सॅल्यूट!
मुंबई : प्रतिनिधी : लग्न आणि नाचगाणं हे समिकरण बनले आहे. नाच गाण्याशिवाय लग्नच पूर्ण होत नाही. लहान मोठ्या सर्वधर्मीयांच्या लग्नात नृत्याची धमाल असते. अबालवृद्ध बेभामपणे नाचतात. पण बडे उद्योगपती, गर्भ श्रीमंताच्या घरी असणाऱ्या लग्नाच्या पार्टीत बॉलिवूडपासून हॉलिवूड सेलिब्रिटिंना आमंत्रित केले जाते. बॉलिवूडमधील बादशहा शाहरुख खान, सलमान, रणवीर आणि अक्षयकुमार हेही लग्नाच्या कार्यक्रमात परफॉर्मस् करण्यासाठी जातात. त्यासाठी ते फिस आकारतात. काही मिनिटांसाठी लाखापासून कोटी रुपये ते मिळवतात. त्यांच्यासाठी पंचतारांकित सोयीही कराव्या लागतात. प्लेन, हॉटेलची सुविधा करावी लागते. (Bollywood star’s fee for dancing at wedding)
बॉलिवूड रिपोर्टराच्या मते बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी आणि डान्स परफॉर्मस् साठी पाच ते सहा कोटी रुपये घेतो. सलमान खानची फी तीन त चार कोटी रुपये आहे. रणवीरसिंग दोन कोटी तर अक्षय कुमार सव्वा कोटी ते दीड कोटी रुपये घेतो.
अभिनेत्याबरोबर अभिनेत्री विवाह समारंभात उपस्थिती आणि डान्स पार्टीमध्ये सहभागी होण्यासाठी मोठी फी घेतात. तमन्ना भाटिया आणि नोरा फतेही या अभिनेत्री फी अंदाजे सव्वा कोटी ते दीड कोटी रुपये इतकी आहे. जान्हवी कपूर, सारा अली खान आणि दिशा पटनी ६० ते ७० लाख रुपये घेतात. त्यांच्या डान्स सादरीकरणासाठी स्टेज, मेकअप, लाईट व्यवस्थेचाही खर्च वेगळा असतो. बॉलिवूड स्टार सगळा लवाजमा घेऊन येतात. त्यामध्ये हेअर आणि मेकअप टीम, बाऊन्सर, स्पॉट बॉय यांचाही समावेश असतो. (Bollywood star’s fee for dancing at wedding)
शाहिद कपूर आणि वरुण धवन हे अभिनेते सादरीकरणासाठी एक ते दोन कोटी घेतात. त्यामध्ये स्टेजवर पाच ते सहा मिनिटे उपस्थितांशी संवाद साधला जातो. तसेच फोटो सेशन होते. अभिनेत्री सादरीकरणासाठी सहा ते सात मिनिटे घेतात. आयुष्यातील काही प्रसंग, विनोदही सांगतात. तसेच वधू वरासमवेत फोटो सेशनही केले जाते. मनिष पॉल होस्टिंगसाठी १२ ते १५ लाख तर अपारशक्ती खुराणा दहा लाख रुपये घेतात.
बडे स्टारडमसाठी स्वतंत्र चार्टर विमानाची सोय करावी लागते. शाहरुख खान, सलमान खान, रणवीस सिंग, अक्षय कुमार हे स्टार आपल्या टीमसह पोहोचण्यासाठी खासगी चार्टर वापरतात. (Bollywood star’s fee for dancing at wedding)
Vandana Gupte : वंदना गुप्ते यांना ‘रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर
मुंबई : प्रतिनिधी : मराठी नाट्य कलाकार संघातर्फे दिला जाणारा ‘रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांना जाहीर झाला आहे. जागतिक रंगकर्मी दिवसाचे औचित्य साधून या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. (Vandana Gupte)
व्यावसायिक रंगभूमीवर काम करणाऱ्या रंगकर्मींचा हक्काचा एक दिवस असावा आणि त्या निमित्ताने रंगकर्मींच्या कार्याचा गौरव व्हावा, या उद्देशाने मराठी नाट्य कलाकार संघातर्फे दरवर्षी ‘जागतिक रंगकर्मी दिवस’ साजरा करण्यात येतो. मराठी रंगभूमीसाठी सर्वस्व वाहिलेल्या नटवर्य भालचंद्र पेंढारकर यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून २५ नोव्हेंबर हा दिवस, २०१४ या वर्षापासून कलाकार संघातर्फे ‘जागतिक रंगकर्मी दिवस’ म्हणून साजरा केला जातो आणि या दिवशी ‘रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार’ सन्माननीय रंगकर्मीला प्रदान केला जातो. यंदा हा पुरस्कार वंदना गुप्ते यांना जाहीर करण्यात आला आहे. (Vandana Gupte)
दरवर्षी २५ नोव्हेंबर रोजी हा पुरस्कार सोहळा कलावंत आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाने आयोजित केला जातो. मात्र यंदा महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांवर ओढवलेल्या पूर परिस्थितीच्या संकटामुळे, हा सोहळा न करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यामुळे हा पुरस्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांच्या दालनात लवकरच प्रदान करण्यात येणार आहे. सोहळ्याची रक्कम मुख्यमंत्री पूरग्रस्त सहाय्यता निधीसाठी देण्यात येणार असल्याचे अध्यक्ष सुशांत शेलार यांनी दिली आहे. (Vandana Gupte)
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ही मराठी नाट्य कलाकारांची मातृसंस्था असून, मराठी नाट्य कलाकार संघ ही नाट्य परिषदेची व्यावसायिक रंगभूमीवरील रंगकर्मींसाठी कार्य करणारी अधिकृत घटक संस्था आहे. आतापर्यंतच्या ‘जागतिक रंगकर्मी दिवस’ सोहळ्यांमध्ये भालचंद्र पेंढारकर, मधुकर तोरडमल, किशोर प्रधान, शोभा प्रधान, गंगाराम गवाणकर, विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर, अशोक सराफ, उषा नाडकर्णी, रोहिणी हट्टंगडी व मोहन जोशी या कलाकारांना या पुरस्काराने सन्मानित केले आहे. (Vandana Gupte)
- प्रियदर्शन
धर्मेंद्र यांच्या गाजलेल्या चित्रपटाच्या दृश्यांमध्ये ‘शोले’मधील एक दृश्य नक्कीच आठवते—ज्यात ते पाण्याच्या टाकीवर चढलेले असतात. दृश्याच्या शेवटी ते म्हणतात—“गाववालों, मरना कैंसिल!” (Dharmendra Passes Away)
आयुष्यातही धर्मेंद्र जणू आपले ‘मरण’ वारंवार ‘कॅन्सल’ करत आले. मृत्यू अनेकदा त्यांच्या दाराशी येऊन मागे फिरला. अनेकदा ते इस्पितळात गेले, पण पुन्हा बरे होऊन घरी आले. याच महिन्यात त्यांच्या निधनाच्या अफवा जोरात पसरल्या होत्या. पण त्यांचा श्वास थांबला नव्हता. पुन्हा एकदा त्यांनी मरण कॅन्सल केले. अखेर सोमवारी त्या श्वासांनी साथ सोडली.
मृत्यू हा नेहमीच दुःखाचा विषय असतो; पण धर्मेंद्र परिपूर्ण, भरभरून आयुष्य जगले. त्यांच्या जगण्याकडं बघितलं की वाटतं, ते आयुष्य अगदी समरसून आणि मनसोक्त जगले. (Dharmendra Passes Away)
आजोबांपासून नातवापर्यंत
धर्मेंद्र यांचा चित्रपट प्रवास लांब पल्ल्याचा होता. एकाच वेळी ते आजोबांच्या आणि नातवाच्या पिढीतही नायक म्हणून झळकले. या काळात त्यांनी अनेक हिट चित्रपटांची रांग लावली. अनेक पिढ्यांना वेड लावले. त्या बाबतीत त्यांची बरोबरी करणारा दुसरा कुणीही नाही. (Dharmendra Passes Away)
वेगवेगळ्या काळात वेगवेगळे सुपरस्टार आले. कधी राजेश खन्ना, तर कधी अमिताभ बच्चन. पण धर्मेंद्र या दोघांशीही स्पर्धा करताना दिसले.
धर्मेंद्र यांचा पहिला चित्रपट कोणता?
धर्मेंद्र यांचा प्रवास मात्र सोपा नव्हता. जेव्हा ते आले, त्यावेळी दिलीप कुमार–देव आनंद–राज कपूर ही त्रिमूर्ती आपल्या शिखरावर होती. १९६० मध्ये धर्मेंद्र यांचा पहिला चित्रपट आला— ‘दिल भी तेरा हम भी तेरे’.
याच वर्षी भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक यशस्वी चित्रपटांपैकी एक ‘मुगल-ए-आझम’ प्रदर्शित झाला. पुढच्या वर्षी ‘गंगा’ नावाच्या दोन चित्रपटांनी धुमाकूळ घातला—राज कपूर यांचा ‘जिस देश में गंगा बहती है’ आणि दिलीप कुमार यांचा ‘गंगा जमुना’. चार वर्षांनी देव आनंद यांचा ‘गाईड’ आला. त्यादरम्यान शम्मी कपूरचा ‘तुम सा नहीं देखा’, ‘जंगली’ आणि राजेंद्र कुमार यांचा ‘जुबिली’ काळ सुरू होता. (Dharmendra Passes Away)
या सर्व चित्रपटांची आठवण आठवण करून देण्यामागचे कारण म्हणजे—इतक्या मोठ्या, प्रभावी काळात धर्मेंद्र यांनी स्वतःला टिकवून ठेवले.
दिलीप–देव–राज कपूर युग ओसरले. शम्मी कपूर आणि राजेंद्र कुमार मावळले. नंतर राजेश खन्ना धूमकेतूसारखे चमकले. अमिताभ बच्चन शहंशाह म्हणून उभे राहिले. मग शाहरुख–आमिर–सलमान यांचे सुपरस्टार युग आले— पण धर्मेंद्र यांचा जलवा कायम होता.
त्यांच्या अनेक चित्रपटांची नावे तर जणू त्यांच्या व्यक्तिमत्त्वावरून किंवा त्यांच्या भूमिकांवरूनच ठेवली गेली होती. अगदी हृतिक रोशन–रणबीर कपूर येईपर्यंतही धर्मेंद्र ‘जॉनी गद्दार’सारख्या चित्रपटांमध्ये रंगतदार कामगिरी करत राहिले. आणि याच डिसेंबरमध्ये त्यांचा ‘इक्कीस’ नावाचा नवा चित्रपट येणार आहे. ज्याचे पोस्टर आजच प्रसिद्ध झाले.
अमिताभ बच्चन यांच्या दुसऱ्या इनिंगचा अपवाद. नाहीतर सात दशकांची अशी अखंड कारकीर्द दुसरी दिसत नाही. (Dharmendra Passes Away)
सुंदर, सोज्वळ आणि देखणा नायक
धर्मेंद्र यांचा सर्वोत्तम काळ १९७०-८० चा होता. ते देखणे, सडपातळ आणि आकर्षक युवक होते. देव आनंद आणि दिलीप कुमार यांसारखे अभिनेतेही त्यांचा हेवा करत असत, असे म्हटले जाते.
पण सामान्य प्रेक्षकांमध्ये धर्मेंद्र एवढे लोकप्रिय का झाले?
ते दिवस होते, भारतातल्या छोट्या शहरांचे, गावांचे. जिथे साहस, नैतिकता आणि शौर्य यांना वेगळी किंमत होती. धर्मेंद्र यांची प्रतिमा याच गुणांनी भरलेली होती.
त्यांना इंग्रजी माध्यमाने ‘ही-मॅन’ ही उपाधी दिली. हिंदी प्रेक्षकांना त्याचा नेमका अर्थ तेव्हाच नव्हे, तर आजही माहीत नसावा. पण धर्मेंद्र हे वेगळेच रसायन होते. ते रोमान्सही करायचे. मारामारीही करायचे. कॉमेडीही करायचे. रागही दाखवायचे, मैत्रीही करायचे आणि वैरही. कधी गुप्तहेर बनायचे तर कधी गुन्हेगार. (Dharmendra Passes Away)
शराफत आणि लोफर
त्यांना कधी भारतातील श्रेष्ठ अभिनेत्यांमध्ये गणले गेले नाही. पण त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका केल्या. त्यांचा चेहरा `शराफती`पासून `शरारती`पर्यंत सहज बदलत असे. योगायोग नव्हे की त्यांचा एक चित्रपट ‘शराफत’ होता तर दुसरा ‘लोफर’. ते शहजादा बनू शकत होते आणि गुलामही. ‘धर्मवीर’मधील त्यांचा राजेशाही थाट एकीकडे होता तर ‘रजिया सुल्तान’मधील गुलामाची भूमिका दुसरीकडे.
असे म्हणतात की या चित्रपटात त्यांच्या चेहऱ्यावर लावलेला गडद काळा रंग हा कमाल अमरोही यांनी घेतलेला बदला होता. मीना कुमारी आणि धर्मेंद्र यांच्या जवळीकीबद्दलच्या चर्चांमुळे घेतलेला बदला. आणि त्या काळ्या रंगानेच त्या चित्रपटाचे सौंदर्य बिघडले. हा एकमेव चित्रपट असेल, ज्यात धर्मेंद्र त्यांचा सहज–स्वाभाविक लुक सोडून दिसतात.
अन्यथा ते अत्यंत सहज अभिनय करणारे कलाकार होते. डोळ्यांत, चेहऱ्यावर भावना सहज उमटणारे. संवादफेक उत्तम. प्राध्यापक म्हणून वेगळी हिंदी, गुंड म्हणून वेगळी.
अमिताभ बच्चन त्यांच्या उत्तम हिंदीसाठी प्रसिद्ध होते. पण त्या पिढीतील अनेक कलाकारांची हिंदी उत्कृष्ट असे. पंजाबच्या एका गावातून आलेल्या धर्मेंद्र यांनी यासाठी फार मेहनत घेतली असणार.
कुटुंबाने निधनाची घोषणा का केली नाही?
धर्मेंद्र यांचा शेवटचा काळ मात्र एका हृदयद्रावक चित्रपटासारखा राहिला. ज्या समृद्ध आयुष्याचा त्यांनी दीर्घकाळ आनंद घेतला, त्यात अखेरच्या दिवसांत त्यांच्या वाट्याला एकटेपणाच आला. आपल्या फार्महाऊसमध्ये ते बरीच वर्षे एकटेच राहिल्याचे सांगितले जाते. अलीकडे जेव्हा त्यांच्या मृत्यूची अफवा पसरली, तेव्हा कुटुंबाने ती फेटाळली. पण आज, जेव्हा त्यांनी निधनाची अधिकृत घोषणा करायला हवी होती, तेव्हा माध्यमांना तर्क लावण्यासाठीच सोडण्यात आले. (Dharmendra Passes Away)
सकाळी त्यांच्या घराबाहेर कुटुंबीय येऊ लागल्याच्या बातम्या आल्या. मग माध्यमे सजग झाली. स्मशानात कुटुंबीय पोहोचले. चित्रपट कलाकार पोहोचले. पण कुटुंबीयांनी मृत्यूची घोषणा करण्याची तसदी घेतली नाही. माध्यमांना आणि चाहत्यांना धर्मेंद्र आपल्यात नाहीत, हे अंदाजानेच समजून घ्यावे लागले.
धर्मेंद्रसारख्या महान कलाकाराची अंतिम यात्रा अशा प्रकारे योग्य होती का? ज्यांनी त्यांना आयुष्यभर प्रेम दिले, ज्या चाहत्यांनी त्यांना धर्मेंद्र ‘बनवले’—त्यांना त्यांच्या अंतिम दर्शनाची संधी मिळायला नको होती का? (Dharmendra Passes Away)
सात दशकं चमकलेला हा तारा जणू शांतपणे आकाशातून गायब झाला.
एक युग संपले… पण त्यांची युगप्रभा कायम आहे.
खरेतर धर्मेंद्र यांच्या युगाचा अंत आधीच झालेला होता.
पण त्यांच्या निधनामुळे पुन्हा जाणीव होते, की एक संपूर्ण युग त्यांचेही होते.
आणि जेव्हा जेव्हा हिंदी चित्रपटांचा इतिहास लिहिला जाईल—
धर्मेंद्र हे नाव पहिल्या रांगेत सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल.
(लेखक एनडीटीव्ही इंडियाचे वरिष्ठ कार्यकारी संपादक आहेत.)
Hiraben’s role is played by Raveena : मोदींच्या आई हिराबेनची भूमिका रविना टंडन साकारणार
मुंबई : प्रतिनिधी : बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांची भूमिका साकारणार आहे. दाक्षिणात्य अभिनेता उन्नी मुकुंदन नरेंद्र मोदींची भूमिका साकरणार आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या ‘माँ वंदे’ या बायोपिकचे दिग्दर्शन क्रांतीकुमार चौधरी करणार आहेत. आई आणि मुलामधील भावनिक नात्यांवर हा चित्रपट आधारलेला आहे. या चित्रपटात रविना टंडन करणार आहे. बॉलिवूड हंगामाच्या मते हिराबेनची भूमिका पाहून रविना खूपच प्रभावित झाली आहे. शक्ती, धैर्य अशी महिला अशा शब्दात रविनाने हिराबेन यांचे कौतुक केले आहे. (Hiraben’s role is played by Raveena)
मोदींच्या वाढदिनी १७ सप्टेंबर रोजी या चित्रपटाची घोषणा केली आहे. चित्रपटातील मुख्य कलाकार उन्नी मुकुंदन मोदींची भूमिका साकारणार आहे. “एका माणसाची कहाणी, जी युद्धाच्या पलिकडे जाते. युगानुयुगांसाठी क्रांती बनते, माँ वंदे” अशी पोस्ट उन्नी मुकुंदनने केली आहे. उन्नी ने मोदीबद्दल असे म्हटले आहे की लहानपणी मी अहमदाबादमध्ये राहत असल्याने मुख्यमंत्री मोदी यांच्या कार्याची ओळख होती. अनेक वर्षांनी २०२३ मध्ये त्यांची भेट मिळण्याचे सौभाग्य मिळाले. त्यावेळी ते गुजरातीमध्ये मला म्हणाले होते ‘झुकवानु नाही’ याचा अर्थ कधीही झुकु नका. तेव्हापासून ते शब्द माझ्यासाठी शक्ती आणि दृढनिश्चयाचा स्त्रोत आहे. ‘मार्को’ या अक्शन चित्रपटासाठी लोकप्रिय असलेला उन्नी मोदींची भूमिका करणार असल्याने खूप अपेक्षा वाढल्या आहेत. (Hiraben’s role is played by Raveena)
Bhosle Theatre : कोल्हापूरच्या कलाकारांकडून नाट्याविष्कार सादर करुन प्रशासनाचा निषेध
कोल्हापूर : प्रतिनिधी : मराठी रंगभुभीदिनाचे औचित्य साधुन कोल्हापुरच्या नाट्य-नृत्य कलाकारांनी काम रखडलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या स्थळावर नाट्य-नृत्याविष्कार सादर करुन अनोख्या पद्धतीने प्रशासनाचा निषेध केला. (Bhosle Theatre)
मनपा प्रशासनाच्या कारभारामुळे केशवराव नाट्यगृहाचे काम कित्येक महिने रखडले आहे. मुदत संपुनही छताचे काम अद्याप पुर्ण नसल्याने निषेध म्हणून स्थानिक कलाकारांनी अर्धवट कामाच्या ठिकाणीच नृत्य-नाट्य-गीतांचे सादरीकरण करुन रंगदेवतेकडे ‘प्रशासनाला बुद्धी दे’ अशी प्रार्थना केली. यावेळी ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ हा नाट्यप्रयोग सादर झाला, तसेच रसिकरंजनतर्फे गीतगायन कार्यक्रम झाला. केडीसी डान्स अकादमी, सार्थक स्पर्श या संस्थांच्या कलाकारांनी कला सादर केली. यावेळी नाट्यगृहाच्या रुफचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत होऊन नाट्यगृह ३१ मार्च २०२६ पर्यंत पुर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. (Bhosle Theatre)
महापालिका व रंगकर्मी यांच्या संयुक्त विद्यमाने संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात मराठी रंगभूमी दिन साजरा करण्यात आला. उपशहर अभियंता सुरेश पाटील यांच्याहस्ते सकाळी नटराज मुर्तीचे पुजन करण्यात आले. त्यानंतर नाट्यगृह पुर्ण बांधणीबाबत रंगकर्मी यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
उपशहर अभिंयता सुरेश पाटील यांनी संगीतसुर्य केशवराव भोसले नाट्यगृह हे कलाप्रेमींसाठी व कोल्हापूरच्या कला रसिकांसाठी लवकरात लवकर उपलब्ध करुन देण्यासाठी महापालिका प्रयत्नशिल असल्याचे सांगितले. या कामाकडे विशेष लक्ष देण्यासाठी स्वतंत्र अभियंता नेमण्यात आला आहे. नव्या इमातीसाठी आवश्यक असणारी जागा महापालिकेने रितसर ताब्यात घेतली असून त्याचा आराखडा शासनाकडे सादर केला असून लवकरात लवकर सर्व कामे पुर्ण करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. त्यानंतर रंगकर्मी यांनी एक तास आपली कलानिकष सादर केली. (Bhosle Theatre)
यावेळी कनिष्ठ अभियंता अनुराधा वांडरे, व्यवस्थापक समीर म्हांबरी,, मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टेकर, रंगकर्मीचे किरणसिंह चव्हाण, प्रसाद जमदग्नी, सुनिल घोरपडे, आनंद काळे, रोहन घोरपडे, श्रद्धा शुक्ल, मंजिरी देवण्णावर, मकरंद लिंगनुरकर, दिपक बिडकर, विनय सुतार यांच्यासह कलाकार उपस्थीत होते.
मुंबई : प्रतिनिधी : ज्येष्ठ नाटककार आणि लेखक गंगाराम गवाणकर (वय ८६ )यांचे सोमवारी रात्री निधन झाले. काही दिवसांपासून ते आजारी होते आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात मुले आणि नातवंडे असा परिवार आहे. वस्त्रहरण हे त्यांचे गाजलेले नाटक होते. त्याचे पाच हजारहून अधिक प्रयोग झाले होते. (Gavankar)
वस्त्रहरण नाटकाने इतिहास घडवला
गंगाराम गवाणकर यांचा जन्म एक जून १९३९ रोजी झाला. १९७१ मध्ये त्यांनी रंगभूमीवरची वाटचाल सुरू केली. एमटीएनएलमध्ये नोकरी करत गंगाराम गवाणकर यांनी नाट्यलेखनाची आवड जोपासली. मालवणी बोलीभाषेतील ‘वस्त्रहरण’ या नाटकांचे पाच हजारांहून अधिक प्रयोग करणाऱ्या नाटकाचे लेखक अशी गंगाराम गवाणकर यांची ओळख होती. मालवणी बोलीभाषेत लिहिलेल्या ‘वस्त्रहरण’ नाटकाने मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला. त्यानंतर ‘वस्त्रहरण’, गंगाराम गवाणकर आणि मच्छिंद्र कांबळी हे समानअर्थी शब्द बनले होते. या नाटकामुळे मालवणी बोली घराघरात पोहचवण्याचे श्रेय गंगाराम गवाणकर यांना जाते. मच्छिंद्र कांबळी यांनी हे नाटक रंगभूमीवर आणले होते. गवाणकर यांच्या ‘वात्रट मेले’ नाटकाचेही दोन हजारांहून अधिक प्रयोग झाले होते. (Gavankar)
व्हाया वस्त्रहरण, ऐसपैस, चित्रागंधा पुस्तकाचे लेखन
गवाणकर यांनी ‘वस्त्रहरण’ नाटकाच्या निमित्ताने आलेले अनुभव आणि आठवणी ‘व्हाया वस्त्रहरण’ या पुस्तकातून शब्दबद्ध केल्या आहेत. शिवाय त्यांची ‘ऐसपैस’ ही कादंबरी लिहिली होती. तसेच, रवींद्रनाथ टागोर यांच्या कथासंग्रहाचा त्यांनी ‘चित्रांगदा’ नावाने अनुवाद प्रकाशित केला आहे. (Gavankar)
जागर चित्रपटाचे कथालेखक
गंगाराम गवाणकर यांची ‘वस्त्रहरण’ आणि ‘वात्रट मेले’ ही नाटके प्रचंड गाजली. त्यांचे ‘वेडी माणसं’ हे पहिले नाटक होते. पुढे ‘दोघी’, ‘वन रूम किचन’, ‘वर भेटू नका’, ‘वरपरीक्षा’ अशी ही त्यांची नाटके गाजली. विनोद, व्यंग आणि वास्तवाचा सुंदर मिलाफ हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ठ्य होते. गंगाराम गवाणकर यांनी १९९८ मध्ये ‘जागर’ या मराठी चित्रपटाची पटकथा लिहिली होती. (Gavankar)
मंत्री अशिष शेलारांकडून श्रद्धाजंली
राज्याचे सांस्कृतिक मंत्री अशिष शेलार यांनी एक्स पोस्टवर गवाणकर यांना श्रद्धाजंली वाहिली. एक्स पोस्टवर असे म्हटले आहे की, “आमच्या मालवणी मुलूखातील एक प्रतिभावंत गमावला ! मालवणी बोलीभाषेतून लेखन करुन ज्यांनी कोकणातील माणसाचे भावविश्व, बोलीभाषेचा ठसकेबाज लहेजा जगाला परिचित करुन दिला असे ‘वस्त्रहरण’कार लेखक, नाटककार गंगाराम गवाणकर यांचे दुर्धर आजाराने निधन झाल्याचे वृत्त कळले आणि खूप दु:ख झाले. माझा त्यांचा खूप जुना स्नेह होता. दोनच दिवसापूर्वी त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती, त्यावेळी वाटले होते ते आजाराला पराभूत करुन पुन्हा नव्या दमाने उभे राहतील… पण दुर्दैव.. आम्ही आमच्या मुलूखातील एक अस्सल मालवणी, ठसकेबाज आणि प्रतिभावान लेखक गमावला !” (Gavankar)
‘मॅड सखाराम’ माझ्या आयुष्यातला मोठा टर्निंग पॉइंट ठरेल, याची मला पुसटशीही कल्पना नव्हती. माझ्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे प्रामाणिकपणे नाटक करायला घेतलं आणि बघता बघता आज ‘मॅड’ने ६० प्रयोगांचा टप्पा गाठलाय… हा लेख छापून येईल तेव्हा कदाचित ६५-७० प्रयोग झालेले असतील. आजच्या काळात एखाद्या प्रायोगिक नाटकाचे एवढे प्रयोग होणं, हा एक चमत्कारच म्हणावा लागेल. हा चमत्कार मी अनुभवला आहे. वर्तमानाला थेट भिडणारं हे नाटक उपहास, उपरोधाचा अचूक वापर करत अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य घेऊ पाहणाऱ्यांना दिलासा तर देतच; परंत, कधी टपल्या, कधी कोपरखळ्या तर कधी निखळ विनोदाचा आधार घेत प्रस्थापित व्यवस्थेलाही फटकारे देतं. या नाटकाला हात घालणं म्हणजे माझ्यासाठी हवाहवासा मॅडनेस अनुभवणं होतं… (Mad Sakharam)
- मंगेश सातपुते
दोन हजार अठरा हे पु. ल. देशपांडेंचं जन्मशताब्दी वर्ष होतं. त्या वर्षी मला असं वाटलं की पुलंच्या एखाद्या अस्पर्शित साहित्यकृतीवर आधारित नाटक बसवावं. म्हणून सुनील कर्णिक सरांना फोन केला. (सुनील कर्णिक सर हे पत्रकारितेतलं खूप मोठं नाव. माझ्यासाठी प्रचंड वाचन असलेलं आणि व्यासंगी व्यक्तिमत्त्व.) त्यांनी लगेच ‘म राठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास’ हे पुस्तक सुचवलं. मी ताबडतोब ते वाचून काढलं. पुढे त्याचं नाट्यरूपांतर माझे पत्रकार मित्र ‘मार्मिक’चे कार्यकारी संपादक मुकेश माचकर यांनी करून दिलं आणि पुलंच्या जन्मशताब्दी वर्षात ‘मराठी वाङ्मयाचा घोळीव इतिहास’ या नावाने ते रंगमंचावर दाखल झालं. त्याचे प्रयोग अजूनही सुरू आहेत. कारण एकच. ते पुलंच्या पुस्तकावर आधारित आहे ! (Mad Sakharam)
२०१९ साली ‘जे जे होईल ते ते पहावे’ हे नाटक केलं. त्यानंतर २०२०-२१ ही कोविडची दोन वर्षं अशीच भाकड गेली. २०२२ साली पुन्हा एकदा नवीन नाटकासाठी शोधाशोध सुरू केली. पण कुणीच नाटक लिहून देईना. अगदी माझ्याकडचे विषय देऊनसुद्धा! मग पुन्हा एकदा पुस्तकांकडे, पर्यायाने साहित्याकडे वळलो. पुलंचं’आम्ही लटिके ना बोलू’ हे नाटक शोधत असताना हाती लागलं. पुलंनीच लिहिलेलं, ‘भगवान श्री सखाराम बाइंडर !’
सखाराम नव्याने गावला
‘भगवान श्री सखाराम बाइंडर’ हे पुस्तक विकत घेऊन घरी आलो. नाटक वाचलं आणि वाचत असताना एकटाच खदाखदा हसत होतो. अक्षरशः लोळत होतो ! कारण त्यातली भाषा आणि त्यातले विनोद हे वेगळ्याच दर्जाचे होते. त्याचं कारण असं की तेंडुलकरांचं ‘सखाराम बाइंडर’ मी यूट्यूबवर बघितलं होतं आणि वाचलंही होतं. तेंडुलकरांची दोन नाटकं मला कॉलेजला असताना अभ्यासाला होती. एक होतं ‘कन्यादान’ आणि दुसरं होतं, ‘घाशीराम कोतवाल’. या दोन्ही नाटकांवर प्रोजेक्ट केले होते कॉलेजमध्ये असताना. कारण मी साहित्याचा विद्यार्थी, बी.ए. आणि एम.ए. दोन्ही मराठी साहित्यात केलं.(Mad Sakharam)
तर सांगायचं असं, की तेंडुलकरांच्या नाटकांचा तर मी फॅन होतोच, पण ‘सखाराम बाइंडर’वर जो गदारोळ उठला, १९७२ साली, त्या वादंगावर प्रतिक्रिया म्हणून पुलंनी हे नाटक लिहिलं, हे लगेच लक्षात आलं. त्यातली दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी लक्षात आली, ही नाटिका (दीर्घाक) पुलंनी विजय तेंडुलकरांच्या समर्थनार्थ लिहिलेली आहे. म्हणजे त्यांच्या बाजूने उभं राहण्यासाठी लिहिलेली आहे ! तुम्ही नाटककाराचं अभिव्यक्तिस्वातंत्र्य हिरावून घेऊ शकत नाही. त्याला जे म्हणायचं आहे, ते त्याला म्हणू द्या, हे पुलंना त्यातून अधोरेखित करायचं आहे. कारण पुलंनी इतर जी विडंबनं लिहिली, ती टिंगलटवाळी करण्याच्या हेतूने किंवा थट्टामस्करी करण्याच्या हेतूने लिहिली. त्यांनी तसं नमूद केलेलं आहे सुरुवातीलाच. हा एक वेगळा मुद्दा लक्षात आल्यानंतर प्रचंड भारावून गेलो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ‘भगवान श्री सखाराम बाइंडर’च्या पहिल्या पानावर श्रेयनामावलीच नव्हती.
नव्याचा शोध
म्हणजे ते नाटक कधी झालं? कुठल्या साली त्याचा पहिला प्रयोग झाला? कोणी दिग्दर्शित केलं ? कुठल्या संस्थेने केलं? कुठल्या नाट्यगृहात त्याचा पहिला प्रयोग झाला? हेही त्या पुस्तकात नव्हतं लिहिलेलं. मनात म्हटलं, ‘हे भारी आहे. हे भन्नाट आहे. आपण असंच तर काहीतरी शोधत होतो, जे अत्यंत नावीन्यपूर्ण असेल आणि आजच्या काळाशी सुसंगत असेल. आजच्या काळातही लागू होणारे असेल, अगदी चपखल. (Mad Sakharam)
खरं सांगायचं तर आपण अशा प्रकारची साहित्यकृती शोधत होतो, त्याच्या मागची प्रेरणा कुठेतरी मागे कॉलेजमध्ये आहे! हेही नंतर जाणवलं. कारण जेव्हा कॉलेजला होतो आणि एकांकिका स्पर्धांमध्ये आम्ही भाग घेत होतो कॉलेजतर्फे, तेव्हा आम्हाला अकरावी, बारावीला प्राध्यापक विजय तापस सर होते आणि ते आमच्या ‘नाट्यवलय’चे इन्चार्ज होते. त्या वेळी त्यांनी ‘संगीत मूकनायक’ नावाची छोटीशी नाटिका जी राम गणेश गडकरी यांनी लिहिली होती, ती शोधून काढली होती. ‘संपूर्ण गडकरी’ या पुस्तकातून.
पात्रांची घडण
‘सखारामा’च्या भूमिकेत माझा मित्र सुनील जाधवच दिसत होता. त्याला कारण त्याची देहयष्टी. त्याचं उंच, धिप्पाड व्यक्तिमत्त्व. कारण पुलंच्या नाटकातला जो सखाराम आहे, तो पूर्णपणे वेगळा आणि संतपदाला पोहोचलेला किंवा तसा आव आणणारा असा सखाराम पुलंनी रेखाटला होता. म्हणून मला त्याचं व्यक्तिमत्त्व अगदी उलट हवं होतं, जे मला सुनीलमध्ये सापडलं. त्याला नाटक वाचून दाखवल्यानंतर त्यालाही ते आवडलं आणि तो लगेच ते करायला तयार झाला. कारण त्याच्यासाठी अशा पद्धतीची भूमिका ही त्याने आजवर केलेल्या भूमिकांपेक्षा वेगळी आणि खूप आव्हानात्मक होती, म्हणून ही त्याने लगेच होकार दिला. त्यानंतर लक्ष्मी (किरण प्रधान), चंपा (अलका परब), लेखक (श्रेयस वैद्य) आणि दाऊद (विशाल मोरे) या भूमिकांसाठी योग्य अभिनेते-अभिनेत्री शोधणं, ते तसे मला सापडणं हेही सगळंच खूप नाट्यमय होतं. कारण हे सगळे माझ्या आसपासच होते. माझ्यासोबत डबिंगच्या क्षेत्रात काम करत होते.

विनोदाची जाण
सुनील काय किंवा किरण श्रेयस, विशाल, अलका काय हे सगळे माझ्यासोबत डबिंग करतात म्हणून ते नाटकात नाहीत, तर ते उत्तम नट आहेत. त्या प्रत्येकाकडे त्यांचा असा एक सेन्स ऑफ ह्युमर आहे; ज्याला आपण पिंड म्हणतो, विनोदाचा. विनोदाची जाण आहे, अभिनयाची जाण आहे, म्हणून ते नाटकात काम करतायत आज. माझा दिग्दर्शक म्हणून विनोदाकडे बघण्याचा एक दृष्टिकोण आहे. कारण विनोदामध्येसुद्धा खूप प्रकार असतात. असो.
तर, अशी सगळी टीम जमा केल्यानंतर साधारण ऑक्टोबरमध्ये आम्ही तालमीला सुरुवात केली. जवळ जवळ दोन महिने तालमी केल्यानंतर १८ डिसेंबर २०२३ या दिवशी या नाटकाचा पहिला प्रयोग प्रबोधनकार ठाकरे, बोरीवली मिनी थिएटरमध्ये झाला. तालमीत खूप मजा आली. कारण मला प्रयोगापेक्षा नाटक बसतानाच्या प्रक्रियेची मजा घ्यायला जास्त आवडतं. अर्थातच, माझ्यासाठी हे नाटक खूप आव्हानात्मक होतं. कारण लेखक पु. ल. देशपांडे. ज्यांचं बरंच लिखाण अवघ्या महाराष्ट्राने वाचलेलं आहे. त्यातून पुन्हा त्यांच्या दोन-तीन पुस्तकांवर व्यावसायिक रंगभूमीवर नामांकित दिग्दर्शकांनी नाटकं दिग्दर्शित केली आहेत आणि ती धो धो चाललीसुद्धा आहेत. प्रचंड पैसा कमावलाय त्या नाटकांनी. त्यात खेळिया पुलंचं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व.
जयंत पवार आणि अनिल बांदिवडेकर
हे सगळं डोक्यात सुरू असताना मी मात्र माझ्या दिग्दर्शनाच्या बाबतीत ठाम होतो. त्यात माझा आत्मविश्वास वाढवला डॉ. अनिल बांदिवडेकर सरांनी. त्यांना स्क्रिप्ट वाचून दाखवलं तेव्हा ते प्रचंड खूश झाले. खरं सांगायचं, तर जयंत पवार सर हे माझे आधीचे मेंटॉर होते. ज्यांना मी माझं कुठलंही (माझ्या लेखकाने लिहिलेलं) नाटक दिग्दर्शित करण्यापूर्वी स्क्रिप्ट वाचायला द्यायचो. त्यांचं मत घ्यायचो आणि त्याप्रमाणे माझ्या नाटकांमध्ये बदल करायचो आणि मगच तालमीला सुरुवात करायचो. पण जयंत सर गेल्यानंतर अनिल सरांनी ती जागा भरून काढली. त्यांच्यासमोर झालेल्या वाचनानंतर ते ठामपणे पाठीशी उभे राहिले. म्हणाले, “मंगेश तू जा पुढे. मी आहे सोबत तुझ्या ! तू करशील ते चांगलंच करशील. स्क्रिप्टही मुळात तगडं आहे; भन्नाट आहे.” डॉक्टरांच्या या शब्दांनी माझा आत्मविश्वास द्विगुणित झाला. आजही ते पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. (Mad Sakharam)
रंगल्या तालिमी ऐशा…
आम्ही संध्याकाळी तालीम करायचो. आपापली पोटापाण्याची कामं आटपून संध्याकाळी ६ ते रात्री १० अशी तालमीची वेळ असायची आमची. दोन महिने तालमीमध्ये खूप मजा आली. प्रत्येकाला तसं त्याचं त्याचं कॅरेक्टर सापडणं, हे थोडसं सुरुवातीला जड गेलं. कारण पुलंनी पन्नास वर्षांपूर्वी लिहिलेला विनोद आजच्या वनलाइनर्सच्या जमान्यात नटांना पचनी पडणं तसं अवघड होतं. प्रेक्षकांसमोर तर ते आल्यानंतर कळणार होतं, की ते कसं पोहोचतंय. पोहोचतंय किंवा पोहोचत नाही. पण तालमीत असं लक्षात आलं की पुलंनी त्यातला जो विनोद आहे; त्या विनोदाचं उपरोध, उपहास, अतिशयोक्ती, वक्रोक्ती असे विविधालंकार वापरून एक अजब रसायन तयार करून ठेवलं आहे, तो अजबगजब विनोद आपल्याला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा आहे.
वाचिक अभिनयावर भर
पंधरा दिवसानंतर कंबर कसली आणि दिग्दर्शकाच्या भूमिकेत शिरून नटांना (सहकाऱ्यांना) ते वेगवेगळ्या पद्धतींनी समजावून सांगण्याचा प्रयत्न सुरू केला. तत्पूर्वी न कळलेले विनोद आणि संदर्भ माझे सर चंद्रशेखर पाटील यांच्याकडून समजून घेतले. साधारण महिनाभर वाचन केल्यानंतर प्रत्येकाला आपापल्या वाक्यांवर कमांड आल्यानंतर खरी गंमत, खरी रंगत यायला लागली. त्यांच्यात ते कुठेतरी झिरपायला लागलं होतं, मी सांगितलेलं. पुलंची विनोदाची शैली, कुठल्या वाक्यात नेमका कुठला विनोद आहे, हे सगळं हळूहळू त्यांना कळायला लागलं होतं आणि त्यानंतर ते आपसूकच पात्रांच्या दिशेने यशस्वी प्रवास करू लागले होते. साधारण दीड महिना आम्ही फक्त वाचन करत होतो. माझ्या कामाची पद्धतच अशी आहे, की मी वाचिक अभिनयावर जास्त भर देतो. कारण मला वाक्यांमध्ये दडलेल्या गमतीजमती बाहेर काढायला खूप आवडतं. स्क्रिप्टवर काम करायला खूप आवडतं. अर्थातच त्यामुळे तुमचा नाटकाचा पाया भक्कम होतो आणि जर पाया भक्कम असेल तर मग पुढे इमारत बांधायला, इंटिरियर करायलाही खूप मजा येते.
संकटांची नाटकं
नाटकाची निर्मिती मी आणि सुनीलने मिळून करायची असं ठरलं असल्यामुळे पैशाचा प्रश्न सुटला होता; जो सगळ्यात महत्त्वाचा असतो. पण माझा अनुभव असा होता, नाटक किंवा इतर कामं करायला घेतली की संकटं माझ्यावर अक्षरशः चालून येतात. सगळं सुरळीत चाललेलं असताना. तशात मला एक कल्पना सुचली. पुलंनी ‘भगवान श्री सखाराम बाइंडर’ लिहिताना अगदी सुरुवातीपासून निवेदन म्हणून जे लिहिलं होतं आणि मधे मधे असंख्य रंगसूचना लिहून ठेवल्या होत्या ज्या खरंतर त्यांच्या एक्सपर्ट कॉमेंट्स आहेत, वेगवेगळ्या विषयांवरच्या. म्हणजे सेन्सॉर बोर्डावर कॉमेंट होती किंवा लेखकावर कॉमेंट होती; तथाकथित संस्कृतिरक्षकांवर कॉमेंट होती. आणि अचानक कल्पना सुचली की ह्या रंगसूचना आपण कोणाच्यातरी आवाजात रेकॉर्ड करण्याऐवजी, आपल्याकडे एक चांगला नट आहे श्रेयस वैद्य, जो दाऊदचा रोल करतोय, त्याला जर आपण लेखक म्हणून किंवा लेखकाचं पात्र म्हणून स्टेजवर आणलं तर? आणि संकटाला सुरुवात झाली.
कंसातील वाक्ये नटाच्या तोंडी
खरंतर त्याला तर संकट नाही म्हणता येणार. ही एक अतिशय उत्तम कल्पना होती, की पुलंनी लिहिलेल्या रंगसूचना (कंसातील वाक्ये) प्रत्यक्ष नटाच्या तोंडी द्यायच्या. पण गंमत अशी झाली की आता श्रेयस जर लेखकाचा रोल करणार किंवा निवेदकाचा रोल करणार किंवा सूत्रधाराचा रोल करणार, तर मग दाऊदचा रोल कोण करणार? आणि माझ्या डोक्यात पुन्हा एकदा लक्ख प्रकाश पडला. विशाल मोरे. तो माझाच सहकारी. रुईया कॉलेजचा आणि तो परफेक्ट जाणार होता दाऊदच्या कास्टिंगला. त्यामुळे मी विशालला अक्षरशः शेवटचे पंधरा दिवस असताना तालमीला बोलावून घेतलं. तोही पंधरा दिवसांत टेचात उभा राहिला. आज श्रेयस आणि विशाल या दोघांनाही सुनील, किरण, अलकाच्या तोडीनेच चांगल्या प्रतिक्रिया मिळतात. शाबासकी मिळते.(Mad Sakharam)
मॅडनेसचा शुभ प्रारंभ
शुभारंभाच्या प्रयोगाला चिन्मय सुमित, डॉ. अनिल बांदिवडेकर, प्रदीप कबरे, गोट्या सावंत ही सगळी मंडळी माझ्या विनंतीला मान देऊन आली होती. प्रयोग अतिशय सुंदर झाला. त्याला कारण आमची दोन महिन्यांची मेहनत. उपस्थित सर्व प्रेक्षकांनी प्रयोग प्रचंड एन्जॉय केला. नाटक संपल्यानंतर जेव्हा डॉक्टर भेटायला आले बॅकस्टेजला, तेव्हा त्यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली. “एक श्रीमंत प्रायोगिक नाटक केलंस तू मंग्या.” आणि मला कळून चुकलं की आपण जे धाडस केलंय, ते यशस्वी झालंय. (Mad Sakharam)
सगळ्यांनीच कौतुक केल्यामुळे आम्हा सगळ्यांचाच जीव एकदाचा भांड्यात पडला आणि पुढील वाटचाल सुरू झाली. पण एक साधारण जानेवारी-फेब्रुवारी या दोन महिन्यांमध्येच
माझी आर्थिक परिस्थिती थोडी डळमळीत झाली. (Mad Sakharam)
त्यामुळे मी सुनीलला म्हटलं की, “अरे, मला यापुढे आर्थिक हातभार नाही लावता येणार, तर तू तुझा एखादा मित्र बघ. जो नाटकवेडा असेल आणि तो आपल्याला आर्थिक मदत करायला तयार होईल.” तर त्याने क्षणभरही विचार न करता नाव घेतलं. सुरेश जाधव. “सुरेश आपल्याला नक्की मदत करेल. सुरेश आपल्यासारखाच नाटकवेडा आहे. तो आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील.” मी मनात हुश्श म्हटलं आणि सुरेशच्या होकाराची वाट पाहत असतानाच सुरेशने कसलाही विचार न करता होकार दिला. त्या क्षणापासून तो पाठीशी उभा राहिला. आजतागायत तो आमच्या पाठीशी उभा आहे.
बॅकस्टेजचा डोलारा
नाटक उभं करताना सगळ्यात जास्त मदत झाली, ती तंत्रज्ञ मंडळींची. नेपथ्य केलं आमचाच मित्र, आजचा आघाडीचा नेपथ्यकार संदेश बेंद्रे याने. त्याने खरंतर खूप मोलाची मदत केली. कारण सखारामच्या एवढा मोठा सेट (रिअलिस्टिक घर) तयार करणं, त्यासाठी लागणारा आर्थिक खर्च हा काही आम्हाला झेपण्यासारखा नव्हता. नेपथ्याची जबाबदारी संदेशने घेतली. त्याने ती पार पाडली. त्यानंतर या नाटकाचं संगीत मंदार कमलापूरकर या माझ्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या साऊंड डिझायनर मित्राने केलं. जेव्हा मी त्याला स्क्रिप्ट ऐकवलं, तेव्हा त्याला ते इतकं आवडलं की तो लगेच तयार झाला. त्याने अप्रतिम बॅकग्राऊंड म्युझिक केलं नाटकाचं. त्यानंतर आजचा आघाडीचा प्रकाश योजनाकार आमचा अमोघ फडके त्यानेसुद्धा खूप छान प्रकाशयोजना केली नाटकाची. त्यानंतर राष्ट्रीय पुरस्कार विजेता वेषभूषाकार महेश शेरला हा आणखी एक मित्र. त्यानेही अप्रतिम वेषभूषा केली.
या सगळ्यांचीच खूप मदत झाली. त्यांच्याशिवाय मॅड सखाराम अपूर्ण आहे; अपूर्ण होता आणि आणि अपूर्ण राहील. मी सतत मदत हा शब्द वापरतोय त्याला कारण प्रायोगिक नाटकात मानधन नसतं, हे माहीत असूनसुद्धा केवळ नाटकाच्या प्रेमापोटी आपलं काम चोख करायचं हे सोपं नाही. (Mad Sakharam)
‘सो कुल’ पाठिंबा
मला आजही तो दिवस लख्ख आठवतो. १२ एप्रिल २०२४ या दिवशी आमचा प्रयोग होता शिवाजी मंदिरला आणि त्या दिवशी सोनाली कुलकर्णी प्रयोग बघायला आवर्जून आली होती. प्रयोग संपल्यानंतर ती खूप खूश दिसत होती आणि अस्वस्थही. ती सगळ्यांना भेटली. प्रत्येकाचं कौतुक केलं. दुसऱ्या दिवशी ती फोनवर माझ्याशी पंधरा मिनिटं बोलली. अर्थातच ती माझं आणि माझ्या टीमचं कौतुक करत होती आणि पुलंविषयी, पुलंच्या ग्रेटनेसविषयी बोलत होती. एका समकालीन लेखकाच्या पाठीशी दुसऱ्या लेखकाने उभं राहणं ही किती मोठी गोष्ट आहे आणि हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे; हाच खरा महाराष्ट्र आहे, असं तिच्या बोलण्याचं सार होतं.

फोन ठेवल्यानंतर तिने एक रक्कम मला ट्रान्सफर केली. म्हणाली, “मी काल जे नाटक पाहिलं, त्याची किंमत २०० रुपये नसून ही रक्कम आहे; जी मी तुला आत्ता पाठवली.” तत्काळ तिला फोन लावला. तिचे आभार मानले. तिला म्हटलं की, “खरंतर आम्हाला पैसे नकोत, पण तुझं नाव दिलंस किंवा तू आमचं नाटक प्रेझेंट केलंस, प्रस्तुतकर्ता म्हणून तुझं नाव दिलं, तर आम्हाला खूप आवडेल. त्याने आमच्या नाटकाची प्रेक्षकसंख्या वाढायला मदत होईल.” तर ती म्हणाली, “मी नुसतं नाव देणार नाही मंगेश, मी त्यातला खर्चाचा जो वाटा आहे, तोही उचलणार.”
मी तिला खूप विनवून पाहिलं, “पैशांची काही गरज नाही. पैशाने नाती बिघडतात. व्यवहार आला की मैत्री तुटते. त्यापेक्षा तू फक्त तुझं नाव दे.” पण ती तिच्या मतावर ठाम होती. तिने तिच्या नकळत पुलंच्या पावलावर पाऊल ठेवलं होतं. एका दर्जेदार कलाकृतीच्या पाठीशी ती खंबीरपणे उभी राहिली होती, जसे पुलं विजय तेंडुलकरांच्या पाठीशी उभे राहिले होते. ही बातमी ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये छापून आली आणि त्यानंतर आमच्या नाटकाचं नशीबच पालटलं.
अपनी तो चल पडी मामू !
‘मॅड सखाराम’ने त्यानंतर आजतागायत मागे वळून पाहिलं नाही. प्रेक्षकसंख्या तर वाढलीच, पण प्रसारमाध्यमांनी आमची चांगली दखल घेतली. नाटक पुलंचं आहे, त्याचबरोबर ते पन्नास वर्षांत कोणी केलं नाही आणि सोनाली कुलकर्णी या नाटकाच्या पाठीशी उभी आहे, असा अपूर्व योग जुळून आला. नाटकाची घोडदौड सुरू झाली. त्यानंतर आम्ही महाराष्ट्रभर प्रयोग केले. माणगाव (डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती दिन), जळगाव (मैत्र महोत्सव, आयोजक शंभू पाटील) भुसावळ (खानदेश महोत्सव, अनिल कोष्टी), कुडाळ (बाबा वर्दम नारायण महोत्सव) कणकवली (वामन पंडित) इथल्या नाट्य महोत्सवांमध्ये आग्रहाने बोलावणं आलं. त्याचबरोबर नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) तसेच एनसीपीए या नामांकित संस्थांनीसुद्धा आम्हाला प्रयोग करण्याची संधी दिली, ती केवळ सोनालीमुळेच !
१८ डिसेंबर २०२३ रोजी सुरू झालेला प्रवास आधी रौप्य महोत्सवी, सुवर्ण महोत्सवी प्रयोगाचा टप्पा गाठू शकला. हे केवळ पुलंची पुण्याई आणि सोनालीचा खंबीर पाठिंबा या दोन गोष्टींमुळेच शक्य झालं. मला खात्री आहे की शतक महोत्सवी प्रयोगाचा टप्पादेखील आम्ही सारे नक्कीच गाठू ! कारण आम्ही सारे मॅडच आहोत की !
थैंक्यू सखाराम !
आज ‘मॅड सखाराम’ या नाटकाने मला काय दिलं असा माझ्या मनात प्रश्न येतो तेव्हा जाणवतं, की या नाटकाने मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जगण्याचं बळ दिलं. कारण माझ्या आयुष्यातून नाटक वजा केलं, तर काहीच उरत नाही हे माझ्या तेव्हाच लक्षात आलं होतं, जेव्हा मी व्यावसायिक नाटकांमध्ये थोडंसं अपयश पचवूनसुद्धा पुन्हा प्रायोगिक रंगभूमीकडे वळलो. मला असं जाणवलं की आपल्याला जे करायचं असतं, ते इथेच खऱ्या अर्थाने करायला मिळतं किंवा प्रयोग करायला मिळतोय. आपल्या कल्पना प्रत्यक्षात मांडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य प्रायोगिक रंगभूमीवरच मिळतंय. याच जाणिवेतूनच मी ‘मराठी वाङ्मयाचा घोळीव इतिहास’, त्यानंतर ‘जे जे होईल ते ते पहावे’ आणि त्यानंतर ‘मॅड सखाराम’ ही सलग तीन प्रायोगिक नाटकं रंगभूमीवर सादर करू शकलो. (Mad Sakharam)
पुस्तकांनी जगण्याची उमेद
दरम्यानच्या काळात वैयक्तिक आयुष्यात खूप पडझड झाली होती. त्यामुळे मानसिक खच्चीकरण तर झालंच होतं, पण जगण्याची उमेद कुठेतरी हरवून बसलो होतो. अशा काळात मला पुस्तकांनी जगण्याची उमेद दिली. लॉकडाऊननंतर अक्षरशः मला वाचनाचं वेड लागलं. त्यामुळे पुलंनी लिहिलेलं ‘भगवान श्री सखाराम बाइंडर’ या वाचनवेडापायी माझ्या हाती लागलं. या नाटकाने माझं पूर्ण आयुष्यच बदलून टाकलं. एक दिग्दर्शक म्हणून मला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं. नाटक, सिनेसृष्टीतल्या दिग्गजांपर्यंत पोहोचवलं.
‘हे नाटक तुला कुठे सापडलं ? आम्ही कसं वाचलं नाही आजपर्यंत ? तू हे नेमकं कसं शोधलंस? व्हॉट्सअॅपवर फोटो पाठव त्या पुस्तकाचा, पहिल्या पानाचा. प्रकाशन कुणाचं आहे, त्या पानाचा फोटो पाठव’, असे असंख्य फोन आले. हे सगळं फार रंजक होतं माझ्यासाठी आणि माझ्या टीमसाठी. पण मी शांत होतो. कारण सेन्सॉर सर्टिफिकेट माझ्या नावावर होतं. (Mad Sakharam)
बुवाबाजीवर भाष्य
तेंडुलकरांनी (Vijay Tendulkar) ‘सखाराम बाइंडर’ या नाटकातून लग्नसंस्थेला प्रश्न विचारला होता आणि पुलंनी त्यांच्या ‘सखाराम’ मधून त्यांच्या मॅड शैलीत बुवाबाजीवर भाष्य केलं होतं. मला आणि माझ्या टीमला ते उमगल्यामुळेच आम्ही यशस्वी झालो होतो. तालमीच्या दरम्यान म्हणजे, रोज रात्री तालीम संपवून मी घरी आल्यानंतर कमलाकर सारंग यांचं ‘बाइंडरचे दिवस’ हे पुस्तकदेखील वाचत होतो. त्यांना कधी भेटलो नाही, पण आज त्यांची प्रकर्षाने आठवण येते. तेव्हाच्या तथाकथित संस्कृतिरक्षकांनी त्यांच्या बाइंडरवर आक्षेप घेतल्यानंतर प्रयोग व्हावेत म्हणून त्यांनी दिलेला लढा आणि केलेला संघर्ष यापुढे मला माझ्या जगण्याचा संघर्षसुद्धा थिटा वाटतो. खरंच, विजय तेंडुलकर, पु. ल. देशपांडे, कमलाकर सारंग ही खूप मोठी माणसं होती. आपल्या समकालीन लेखकाच्या पाठीशी उभं राहणं ही साधी गोष्ट नाही. पण ती पुलंनी करून दाखवली. अगदी त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत सोनाली कुलकर्णी ‘मॅड’च्या पाठीशी उभी राहिली, हीसुद्धा ऐतिहासिक गोष्टच म्हणावी लागेल. हीच महाराष्ट्राची ‘खरी’ संस्कृती!
***
(सामाजिक जाणिवा जपत रंगभूमीवर कारकीर्द घडवणाऱ्या दिग्गजांचा वारसा पुढे नेणारे अशी मंगेश सातपुते यांची ओळख आहे. संपर्कः ९९३०५ ५३३१८)
(समतावादी मुक्त संवाद पत्रिका – दिवाळी विशेषांक २०२५ मधून साभार)