Home » Blog » Gavankar : ज्येष्ठ नाटककार, लेखक गंगाराम गवाणकर यांचे निधन

Gavankar : ज्येष्ठ नाटककार, लेखक गंगाराम गवाणकर यांचे निधन

by प्रतिनिधी
0 comments
Gavankar

मुंबई : प्रतिनिधी : ज्येष्ठ नाटककार आणि लेखक गंगाराम गवाणकर (वय ८६ )यांचे सोमवारी रात्री  निधन झाले. काही दिवसांपासून ते आजारी होते आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात मुले आणि नातवंडे असा परिवार आहे. वस्त्रहरण हे त्यांचे गाजलेले नाटक होते. त्याचे पाच हजारहून अधिक प्रयोग झाले होते. (Gavankar)

वस्त्रहरण नाटकाने इतिहास घडवला

गंगाराम गवाणकर यांचा जन्म एक जून १९३९ रोजी झाला. १९७१ मध्ये त्यांनी रंगभूमीवरची वाटचाल सुरू केली. एमटीएनएलमध्ये नोकरी करत गंगाराम गवाणकर यांनी नाट्यलेखनाची आवड जोपासली. मालवणी बोलीभाषेतील ‘वस्त्रहरण’ या नाटकांचे पाच हजारांहून अधिक प्रयोग करणाऱ्या नाटकाचे लेखक अशी गंगाराम गवाणकर यांची ओळख होती. मालवणी बोलीभाषेत लिहिलेल्या ‘वस्त्रहरण’ नाटकाने मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला. त्यानंतर ‘वस्त्रहरण’, गंगाराम गवाणकर आणि मच्छिंद्र कांबळी हे समानअर्थी शब्द बनले होते. या नाटकामुळे मालवणी बोली घराघरात पोहचवण्याचे श्रेय गंगाराम गवाणकर यांना जाते. मच्छिंद्र कांबळी यांनी हे नाटक रंगभूमीवर आणले होते. गवाणकर यांच्या ‘वात्रट मेले’ नाटकाचेही दोन हजारांहून अधिक प्रयोग झाले होते. (Gavankar)

व्हाया वस्त्रहरण, ऐसपैस, चित्रागंधा पुस्तकाचे लेखन

गवाणकर यांनी ‘वस्त्रहरण’ नाटकाच्या निमित्ताने आलेले अनुभव आणि आठवणी ‘व्हाया वस्त्रहरण’ या पुस्तकातून शब्दबद्ध केल्या आहेत. शिवाय त्यांची ‘ऐसपैस’ ही कादंबरी लिहिली होती. तसेच, रवींद्रनाथ टागोर यांच्या कथासंग्रहाचा त्यांनी ‘चित्रांगदा’ नावाने अनुवाद प्रकाशित केला आहे. (Gavankar)

जागर चित्रपटाचे कथालेखक

गंगाराम गवाणकर यांची ‘वस्त्रहरण’ आणि ‘वात्रट मेले’ ही नाटके प्रचंड गाजली. त्यांचे ‘वेडी माणसं’ हे पहिले नाटक होते.  पुढे ‘दोघी’, ‘वन रूम किचन’, ‘वर भेटू नका’, ‘वरपरीक्षा’ अशी ही त्यांची नाटके गाजली. विनोद, व्यंग आणि वास्तवाचा सुंदर मिलाफ हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ठ्य होते. गंगाराम गवाणकर यांनी १९९८ मध्ये ‘जागर’ या मराठी चित्रपटाची पटकथा लिहिली होती. (Gavankar)

मंत्री अशिष शेलारांकडून श्रद्धाजंली

राज्याचे सांस्कृतिक मंत्री अशिष शेलार यांनी एक्स पोस्टवर गवाणकर यांना श्रद्धाजंली वाहिली. एक्स पोस्टवर असे म्हटले आहे की,  “आमच्या मालवणी मुलूखातील एक प्रतिभावंत गमावला ! मालवणी बोलीभाषेतून लेखन करुन ज्यांनी कोकणातील माणसाचे भावविश्व, बोलीभाषेचा ठसकेबाज लहेजा जगाला परिचित करुन दिला असे ‘वस्त्रहरण’कार लेखक, नाटककार गंगाराम गवाणकर यांचे दुर्धर आजाराने निधन झाल्याचे वृत्त कळले आणि खूप दु:ख झाले. माझा त्यांचा खूप जुना स्नेह होता. दोनच दिवसापूर्वी त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती, त्यावेळी वाटले होते ते आजाराला पराभूत करुन पुन्हा नव्या दमाने उभे राहतील… पण दुर्दैव.. आम्ही आमच्या मुलूखातील एक अस्सल मालवणी, ठसकेबाज आणि प्रतिभावान लेखक गमावला !” (Gavankar)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00