ठाणे : समृद्धी महामार्गावरील अपघाताची मालिका कायम आहे. मंगळवारी (९ सप्टेबर) रात्री दोन ट्रकमध्ये भीषण अपघात घडला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. (Two killed on ‘Samruddhi’)
शहापूर तालुक्यातील कासगाव परिसरात ही दुर्घटना घडली. ट्रक चालक आणि क्लिनर यांचा या अपघातात मृत्यू झाला. घटनास्थळी जीवरक्षक पथक दाखल झाले. त्यांनी मदतकार्य सुरू केले. मृतदेह बाहेर काढण्यात आले. ते विच्छेदनासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. दोन मृतांपैकी एकाची ओळख पटली आहे. विजय शामलाल उकाई असे त्यांचे नाव आहे. (Two killed on ‘Samruddhi’)
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गावर रस्त्याकडेला बंद पडल्याने एक ट्रक उभा होता. मागून येणाऱ्या दुसऱ्या ट्रकचालकाला अचानक डुलकी लागल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्याच्या ट्रकने उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की, धडक देणाऱ्या ट्रकमधील लोखंडी अँगल ट्रकच्या पुढील भागात शिरले. त्यामुळे ट्रकचालक आणि क्लिनर दोघांचाही मृत्यू झाला. घटनेनंतर महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. मात्र पोलिसांनी तातडीने घटनास्थ्ळी दाखल होत वाहतूक सुरळीत केली.

