मुंबई : प्रतिनिधी : युती, आघाड्यांच्या चर्चेच्या गुऱ्हाळानंतर सर्वच राजकीय पक्षांनी एबी फॉर्मचे वाटप केल्यानंतर उमेदवारांनी आज शेवटच्या दिवशी वाजत गाजत मिरवणुका काढल्या. उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांनी पक्षांविरोधात दंड थोपटले. पक्षांचे पोस्टर फाडणे, नेत्यांचे निषेध, आत्मदहनाचा इशारा, उपोषणाचा इशारा देण्यात आला. ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश करत निवडणूक लढण्यासाठी शड्डू ठोकला. काही नेत्यांच्या नातेवाईकांनी उमेदवारी मिळाली गेली तर काहींना डावलले गेल्याने पक्षसदस्यांचा राजीनामा देण्याचा तडकाफडकी निर्णय घेण्यात आला.
कोल्हापुरात शिवसेना जिल्हाप्रमुखाच्या मुलाची बंडखोरी
मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, नागपूर, अमरावती, जालना, जळगाव, चंद्रपूर, अकोला, सांगली, इचलकरंजी, नांदेड, कंडोमपा, पनवेल, नवी मुंबई या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याचे चित्र पहायला मिळाले. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी महायुतीने इच्छुकांना उमेदवारी अर्ज दिले. कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांचे चिरंजीव ऋतुराज क्षीरसागर यांनी जंगी मिरवणूक काढून अर्ज दाखल केला. त्यांच्या मिरवणुकीत पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि क्षीरसागरांनी हलगीच्या तालावर फेर धरला. दुसरीकडे उमेदवारी न मिळालेल्या नाराजांनी पक्षाध्येश डावलून अर्ज भरला. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष सुजीत चव्हाण यांचे चिरंजीव प्रसाद यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी करत अर्ज दाखल केला. त्यांनी जनसुराज्य पक्षाची उमेदवारी घेण्याची तयारी दाखवली आहे. माजी नगरसेवक राहूल चव्हाण, रमेश पुरेकर यांच्यासह अनेक शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी अपक्ष अर्ज भरले आहेत. (The rebels filed their nominations)
पक्षबदलून उमेदवारी
नाशिकमध्ये तिकीट वाटपावरुन आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये बाचाबाची झाली. काहींनी तर पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या वाहनाचा पाठलागही केला. पोलिस संरक्षणात भाजपने एबी फॉर्मचे वाटप केले. मुंबईत शिवसेना उद्धव ठाकरे आणि मनसेमध्ये उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केले. शिवसेनेच्या अनिल कोकीळ यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत उमेदवारी पटकावली. कोकीळ यांना डावलून तावडेंना उमेदवारी दिली गेली आहे. उमेदवारी न मिळालेल्या पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर जाऊन आपल्या पदाचे राजीनामे दिले. मनसेचे माजी नगरसेवक स्नेहल जाधव, सुधीर जाधव यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. (The rebels filed their nominations)
आमदार खोपडेंच्या मुलाचा पक्षसदस्यपदाचा राजीनामा
छत्रपती संभाजीनगरमध्ये दिव्या मराठेंना उमेदवारी न मिळाल्याने पक्षनेतृवाविरोधात संताप व्यक्त केला. एका कार्यकर्त्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला. नागपूरमध्ये भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने आमदार कृष्णा खोपडे यांच्या मुलगा रोहित खोपडे याने पक्षसदस्यांचा राजीनामा दिला. पुण्यात गुंड गजा मारणे यांची पत्नी जयश्री मारणे यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाने उमेदवारी दिल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. (The rebels filed their nominations)