नवी दिल्ली : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने बुधवारी आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे (आयसीसी) नव्याने जाहीर झालेल्या कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराह ९०७ गुणांसह अग्रस्थानी आहे. भारतीय गोलंदाजाने आयसीसी क्रमवारीत आजवर मिळवलेले हे सर्वोच्च गुण असून बुमराहने ९०४ गुण मिळवणाऱ्या अश्विनला मागे टाकले आहे. (Bumrah Ranking)
मागील काही आठवडे बुमराह कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत अग्रस्थान कायम राखून आहे. सध्या सुरू असणाऱ्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेत बुमराहने आतापर्यंत ४ सामन्यांत ३० विकेट घेतल्या आहेत. मागील आठवड्यात बुमराहच्या खात्यात ९०४ गुण होते. मेलबर्न कसोटीत बुमराहने पहिल्या डावात ४ व दुसऱ्या डावात ५ अशा एकूण ९ विकेट घेतल्या. त्यामुळे, त्याचे तीन गुण वाढून ९०७ झाले आहेत. आयसीसी क्रमवारीत आजवर अश्विन हा सर्वोच्च गुण मिळवणारा भारतीय गोलंदाज होता. त्याने २०१६ साली इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान ९०४ गुणांसह अग्रस्थान पटकावले होते. बुधवारी जाहीर झालेल्या क्रमवारीत बुमराहने त्याला मागे टाकले. दरम्यान, मेलबर्न कसोटीत सामनावीर ठरलेला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने या क्रमवारीत तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. त्याच्या खात्यात ८३७ गुण आहेत. ऑस्ट्रेलियाचाच जोश हेझलवूड ८४३ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. (Bumrah Ranking)
कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीमध्ये भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वालचे स्थान एकने वधारले असून तो चौथ्या स्थानी पोहोचला आहे. मेलबर्न कसोटीच्या पहिल्या व दुसऱ्या डावामध्ये जैस्वालने अनुक्रमे ८२ व ८४ धावा केल्या होत्या. जैस्वालचे ८५४ गुण झाले आहेत. त्याचवेळी, या कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये अपयशी ठरलेला ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ट्रॅव्हिस हेडचे स्थान एकने घसरले असून तो पाचव्या स्थानावर आहे. या क्रमवारीत इंग्लंडचे जो रूट (८९५) आणि हॅरी ब्रुक (८७६) हे अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानावर आहेत. न्यूझीलंडचा केन विल्यमसन (८६७) तिसऱ्या स्थानी आहे. (Bumrah Ranking)
हेही वाचा :
- रोहित शर्माची निवृत्ती आठवड्यावर?
- बुमराह, नितीश झळकले ‘एमसीजी’च्या सन्मानफलकावर
- आयुषने मोडला यशस्वी जैस्वालचा विश्वविक्रम