दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे (आयसीसी) सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूसाठी देण्यात येणाऱ्या सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफीकरिता सोमवारी नामांकने जाहीर करण्यात आली. यामध्ये, भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला नामांकन मिळाले आहे. त्याच्यासह इंग्लंडचे जो रूट व हॅरी ब्रुक आणि ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड या पुरस्काराच्या शर्यतीत आहे. याबरोबरच, बुमराहला सर्वोत्कृष्ट कसोटीपटूसाठीही नामांकन मिळाले आहे. (Bumrah Nomination)
या वर्षी बुमराहने १३ कसोटी सामन्यांत १३.९२ च्या सरासरीने ७१ विकेट्स घेतल्या आहेत. २०२४ साली आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये तो सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. सध्या सुरू असलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेत त्याने आतापर्यंत ४ कसोटींत ३० विकेट घेतल्या आहेत. सध्या आयसीसी कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीतही तो ९०४ गुणांसह अग्रस्थानी आहे. याबरोबरच त्याने टी-२० क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये ८ सामन्यांत १५ विकेट घेऊन भारताला जगज्जेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. (Bumrah Nomination)
बुमराहसह नामांकन लाभलेल्या इंग्लंडचा जो रूट हा २०२४ मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने १७ कसोटींमध्ये ५५.५७ च्या सरासरीने सहा शतकांसह १,५५६ धावा केल्या आहेत. तोसुद्धा सध्या आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वलस्थानी आहे. इंग्लंडच्या हॅरी ब्रुकने यावर्षी १२ कसोटींमध्ये ५५ च्या सरासरीने १,१०० धावा केल्या असून त्यांमध्ये चार शतके व तीन अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने या वर्षी पाकिस्तानविरुद्ध मुलतानमध्ये केलेली ३१७ धावांची खेळी ही इंग्लंडच्या विजयासाठी महत्त्वपूर्ण ठरली होती. ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडने या वर्षी ९ कसोटींमध्ये ४०.५३ च्या सरासरीने ६०८ धावा केल्या आहेत. याबरोबरच त्याने १५ टी-२० सामन्यांत १७८.४७ च्या स्ट्राइक रेटने ५३९ धावाही केल्या आहेत. त्याने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेमध्ये ॲडलेड व ब्रिस्बेन कसोटीत लागोपाठ शतके झळकावली आहेत. (Bumrah Nomination)
सर्वोत्कृष्ट कसोटीपटूच्या पुरस्कारासाठी बुमराह, ब्रुक व रूट यांच्यासह श्रीलंकेच्या कमिंदू मेंडिसलाही नामांकन मिळाले आहे. मेंडिसने यावर्षी कसोटीत ७४.९२ च्या सरासरीने १०४९ धावा केल्या आहेत. आतापर्यंत राहुल द्रविड (२००४), सचिन तेंडुलकर (२०१०), रवीचंद्रन अश्विन (२०१६) आणि विराट कोहली (२०१७ व २०१८) हे भारतीय क्रिकेटपटू सर गारफिल्ड ट्रॉफीचे मानकरी ठरले आहेत. (Bumrah Nomination)
हेही वाचा :
वर्ल्ड चॅम्पियनशीपमधील भारताची वाटचाल खडतर
ऑस्ट्रेलियाने भारताला १८४ धावांनी हरवले