कोल्हापूर : प्रतिनिधी : नवीन अपार्टमेंटमधील १८ फ्लॅटची वीजजोडणी करण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच घेताना महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. प्रशांत ताराचंद राठी (वय ४९ रा. उपकार रेसिडन्सी, सांगली रोड इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर, मुळ गाव धामनगाव, जि. अमरावती) असे लाच घेणाऱ्या अभियंत्याचे नाव आहे. (Bribe)
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाईची माहिती दिली. या गुन्ह्यातील तक्रारदार हे इलेक्ट्रिक कॉन्ट्रक्टर असून ते इलेक्ट्रिक फिटिंगची काम घेत असतात. त्यांनी इचलकरंजीतील एका अपार्टमेंटमधील १८ फ्लॅटचे वीज जोडणीचा ठेका घेतला होता. वीज जोडणी मंजुरीकरिता आवश्यक कागदपत्रे जोडून तक्रारदाराने इचलकरंजी येथील महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीकडे अर्ज केला होता. अर्ज मंजुरीसाठी त्यांनी कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांची भेट घेतली. राठी यांनी तक्रारदाराकडे अर्ज मंजूर करण्यासाठी १८ फ्लॅटचे प्रत्येकी पाच हजार रुपयाप्रेमाणे ९० हजार रुपये लाचेची मागणी केली. (Bribe)
लाच मागितल्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची खातरजमा करताना कार्यकारी अभियंता यांनी तडजोड करताना ९० हजार रुपयांऐवजी ३० हजार रुपयांची लाचेची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून प्रशांत राठी यांना ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. इचलकरंजी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात राठी याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उप अधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस फौजदार प्रकाश भंडारे, हेड कॉन्स्टेबल विकास माने, संदीप काशिद, सचिन पाटील, उदय पाटील, गजानन कुराडे, प्रशांत दावणे यांनी कारवाई केली. (Bribe)