कोल्हापूर : प्रतिनिधी : बेकायदेशीर गर्भलिंग चाचणी आणि गर्भपात करणाऱ्या टोळीला कोल्हापूर पोलिसांनी मोक्का लावला आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महिनिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी मोक्का च्या कारवाईस मंजुरी दिली आहे. १२ आरोपींना मोक्का लावला असून त्यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. (MCOCA invoked against gang conducting prenatal sex determination tests)
कोल्हापूर जिल्ह्यात गेली अनेकवर्षे गर्भलिंग चाचणी करणाऱ्या टोळीचा धुमाकुळ सुरू आहे. पोलिसांची नजर चुकवण्यासाठी ही टोळी हॉस्पिटल, जंगल, शेत, दुर्गम भागात गर्भलिंग चाचणी केली जात होती. वैद्यकीय पथके आणि पोलिसांनी अनेक ठिकाणी कारवाई केली असून आरोपींना अटक केली असली तरी जामिनावर सुटल्यानंतर त्यांच्याकडून गर्भलिंग चाचण्या सुरुच होत्या. दीड महिन्यापूर्वी करवीर पोलिसांनी या टोळीवर कारवाई करुन त्यांना बेड्या ठोकल्या.
दहा वर्षात टोळीवर ११ गुन्हे दाखल
पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी करवीर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांना आरोपींवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते. सदर टोळीने गेल्या दहा वर्षात करवीर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ७, जुना राजवाडा पोलिस ठाण्यात १, राधानगरी पोलिस ठाण्याच्या हददीत २, भुदरगड पोलिस ठाण्यात एक असे ११ गुन्हे दाखल झाले आहेत. गर्भलिंग चाचणीवर वचक बसवण्यासाठी आणि कठोर कारवाईसाठी पोलिस अधीक्षक निलोत्पल मोक्का कारवाईचा प्रस्ताव करण्याचा आदेश दिला. अतिरिक्त पोलिस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि डीवायएसपी अप्पासो जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या टोळीविरुद्ध मोक्का कारवाईचा प्रस्ताव पाठवण्याचा आदेश पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना दिला होता. कळमकर यांनी मोक्काचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक निलोत्पल यांच्याकडे पाठवला. त्यांनी विशेष पोलिस महिनिरीक्षक शर्मा यांच्याकडे सादर केल्यानंतर त्यांनी टोळीची गुन्हेगारी पार्श्वभूमी, कायदेशीर निकष यांची छाननी करुन या टोळीवर मोक्का कारवाईचे आदेश दिले. (MCOCA invoked against gang conducting prenatal sex determination tests)
मोक्का कारवाईतील आरोपींची नावे
टोळीप्रमुख स्वप्निल केरबा पाटील (वय ३५, रा. बालिंगा, ता.करवीर, कोल्हापूर), महेश सुबराव पाटील (३५, रा.शिरसे, ता.राधानगरी), श्रीमंत तानाजी पाटील (३७, रा. परिते, ता.करवीर), विजय लक्ष्मण कोळसकर (३९, रा. मडिलगे खुर्द, ता.भुदरगड), प्रशांत वसंत जाधव (रा.वैभवनगर, बेळगाव, कर्नाटक), दत्तात्रय कृष्णात पाटील (रा.सिरसे, ता. राधानगरी), ओंकार गोरखनाथ कराळे (३०,रा.सडोली खालसा,ता.करवीर), सुनील प्रकाश पाटील (३८, रा.सिरसे,ता. राधानगरी), अनिल प्रकाश टिपुगडे (४०, रा. भोगावती कारखाना, ता.करवीर), शिवप्रसाद सत्याप्पा महादेव पाटील (४०, रा. इचलकरंजी), अश्विनी गजानन शिंदे (३८, रा. कसबा वाळवे, ता. राधानगरी). (MCOCA invoked against gang conducting prenatal sex determination tests)