अहमदाबाद : जोस बटलरच्या नाबाद ९७ धावा आणि प्रसिध कृष्णाच्या ४ विकेटमुळे गुजरात टायटन्सने आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सला ७ विकेटनी हरवले. दिल्लीने विजयासाठी ठेवलेले २०४ धावांचे लक्ष्य गुजरातने १९.२ षटकांत ३ विकेट गमावून पूर्ण केले. या विजयासह गुजरातने दिल्लीला अग्रस्थानावरून खाली खेचून १० गुणांसह गुणतक्त्यात अव्वलस्थान पटकावले. (Gujarat on top)
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातने दुसऱ्याच षटकात पहिली विकेट गमावली. कर्णधार शुभमन गिल केवळ ७ धावांवर धावबाद झाला. त्यानंतर, साई सुदर्शन आणि जोस बटलर यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी रचली. कुलदीप यादवने आठव्या षटकात सुदर्शनला बाद करून ही जोडी फोडली. सुदर्शनने ५ चौकार व एका षटकारासह २१ चेंडूंमध्ये ३६ धावा फटकावल्या. याबरोबरच, त्याने ऑरेंज कॅपच्या शर्यतीत ३६५ धावांसह आघाडी घेतली. सुदर्शन बाद झाल्यावर बटलरने शर्फेन रुदरफोर्डच्या साथीने तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. (Gujarat on top)
सुरुवातीला सावध फलंदाजी करणाऱ्या बटलरने जम बसल्यानंतर दिल्लीच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. मिचेल स्टार्कच्या पंधराव्या षटकामध्ये त्याने सलग पाच चौकार लगावले. एकोणिसाव्या षटकात मुकेश कुमारने रुदरफोर्डला बाद केले. रुदरफोर्डने ३४ चेंडूंमध्ये ४३ धावांचे योगदान दिले. अखेरच्या षटकामध्ये गुजरातला विजयासाठी १० धावांची आवश्यकता होती व नॉन-स्ट्रायकरला असणारा बटलर ९७ धावांवर नाबाद होता. तो शतक पूर्ण करेल अशी अपेक्षा असतानाच राहुल तेवातियाने स्टार्कच्या षटकातील पहिल्या दोन चेंडूंवर षटकार व चौकार दिल्लीचा विजय साकारला. त्यामुळे, बटलरचे शतक अवघ्या ३ धावांनी हुकले. तो ५४ चेंडूंमध्ये ११ चौकार व ४ षटकारांसह ९७ धावांवर नाबाद राहिला. दोन दिवसांपूर्वी, राजस्थान रॉयल्सविरुद्ध सुपर ओव्हरध्ये दिल्लीच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या स्टार्कच्या ३.२ षटकांत तब्बल ४९ धावा वसूल करण्यात आल्या. (Gujarat on top)
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने २० षटकांत ८ बाद २०३ धावा केल्या. दिल्लीच्या कोणत्याही फलंदाजास मोठी खेळी करता आली नसली, तरी कर्णधार अक्षर पटेल, करुण नायर, आशुतोष शर्मा यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. अक्षरने ३२ चेंडूंमध्ये १ चौकार व २ षटकारांसह ३९, तर आशुतोषने १९ चेंडूंमध्ये २ चौकार व ३ षटकारांसह ३७ धावा फटकावल्या. करुणने १८ चेंडूंमध्ये प्रत्येकी २ चौकार व षटकारांसह ३१ धावांची खेळी केली. गुजराततर्फे प्रसिधने ४ विकेट घेतल्या. (Gujarat on top)
संक्षिप्त धावफलक : दिल्ली कॅपिटल्स – २० षटकांत ८ बाद २०३ (अक्षर पटेल ३९, आशुतोष शर्मा, ३७, करुण नायर ३१, प्रसिध कृष्णा ४-४१, साई किशोर १-९) पराभूत विरुद्ध गुजरात टायटन्स – १९.२ षटकांत ३ बाद २०४ (जोस बटलर नाबाद ९७, शर्फेन रुदरफोर्ड ४३, साई सुदर्शन ३६, मुकेश कुमार १-४०, कुलदीप यादव १-३०).
हेही वाचा :
अभिषेक नायर पुन्हा ‘केकेआर’मध्ये दाखल
अनाहत, वीर अंतिम फेरीत