राजकोट : बंगालच्या महिला क्रिकेट संघाने सोमवारी हरियाणाविरुद्धच्या वन-डे क्रिकेट सामन्यात धावांच्या यशस्वी पाठलागाचा विक्रम नोंदवला. देशांतर्गत महिला वन-डे स्पर्धेमध्ये बंगालने तनुश्री सरकारच्या शतकाच्या जोरावर हरियाणाचे ५ बाद ३८९ धावांचे आव्हान यशस्वीरीत्या पार केले. महिलांच्या ‘ए लिस्ट’ सामन्यामध्ये हा जगातील सर्वांत यशस्वी धावांचा पाठलाग ठरला. (Bengal Record)
सध्या भारतीय संघाबाहेर असलेली सलामी फलंदाज शफाली वर्माने हरियाणाकडून ११५ चेंडूंमध्ये २२ चौकार व ११ षटकारांसह १९७ धावा फटकावल्या. तिचे द्विशतक अवघ्या ३ धावांनी हुकले. तिच्या या खेळीमुळेच हरियाणाला ५० षटकांत ५ बाद ३८९ धावांपर्यंत मजल मारता आली. तथापि, बंगालने ५ चेंडू राखून पाच विकेटच्या मोबदल्यात हे आव्हान पार केल्याने शफालीचे शतक व्यर्थ ठरले. बंगालकडून तनुश्री सरकारने ८३ चेंडूंमध्ये ११३ धावांची खेळी केली. त्याचबरोबर, धारा गुज्जर, सस्थी मोंडल आणि प्रियांका बाला यांनी अर्धशतके झळकावली. धाराने ४९ चेंडूंमध्ये ६९, मोंडलने २९ चेंडूंमध्ये ५२, तर प्रियांकाने ८१ चेंडूंमध्ये नाबाद ८८ धावा केल्या. तनुश्रीने या सामन्यात ३ विकेट घेतल्या. (Bengal Record)
या विजयासह बंगालने नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट संघाचा विक्रम मोडला. लिस्ट ए सामन्यात नॉर्दर्न डिस्ट्रिक्टने कँटरबेरीविरुद्ध २०१९ मध्ये ३०९ धावांचा यशस्वीपणे पाठलाग केला होता. शफालीचे हे या स्पर्धेतील दुसरे शतक ठरले. यापूर्वी, तिने उत्तरप्रदेशविरुद्ध १३९ धावा फटकावल्या होत्या. (Bengal Record)