जमीर काझी : मुंबई : गेल्या काही वर्षापासून राज्यातील सामाजिक सोहार्द बिघडविण्याचे पद्धतशीर प्रयत्न विशिष्ट घटकांकडून घडविले जात आहेत. त्याला राज्यकर्त्यांची साथ असल्याचे लपून राहिलेले नाही. या कटाचे परिणाम आता उघडपणे दिसू लागले आहेत. (Beed mosque)
राज्यकर्त्यांकडून कारवाईस टाळाटाळ
धार्मिक द्वेषाने पछाडलेला राज्य सरकार मधील एक मंत्री संविधानाने घालून दिलेली नियमांचे उल्लंघन करीत एका धर्माच्या नागरिकांविरुद्ध उघडपणे आव्हानाची भाषा करतो, नागपुरात औरंगजेबाच्या कबरीच्या निमित्ताने धार्मिक वचने लिहिलेली चादर तुडवून पोलिसांच्या समक्ष जाळली जाते, त्यांची अटकेनंतर अवघ्या काही तासात सुटका होते. चिथावणीखोरांवर राज्यकर्त्यांकडून कारवाई होणे अपेक्षित असताना त्याबाबत काहीही होत नाही. तर त्याच्याउलट ‘ॲक्शनला रिएक्शन’ देणाऱ्या लोकांवर देशद्रोहाचा गुन्हे दाखल करून त्यांच्या घरावर बुलडोझर चालवला जातो. (Beed mosque)
अर्धमसला गावात मशिदीत स्फोट
हे सर्व कमी की काय म्हणून आता तर त्याच्यापुढे जाऊन बीड जिल्ह्यातील येथील अर्धमसला गावातील मस्जिदमध्ये बॉम्बस्फोट घडविला गेला. विजय रामा गव्हाणे व श्रीराम अशोक सागडे या दोघांनी शुक्रवारी रात्री गावाच्या उरुसावेळी सर्व गावकऱ्यांच्या समक्ष ही मशीद पाडण्याची धमकी दिली त्यानंतर शनिवारी मध्यरात्री जिलेटिनच्या साह्याने त्यांनी स्फोट घडविला. त्या दोघांना अटक करण्यात आली असली तरीही त्यांच्या विरोधात राष्ट्रद्रोहाची कलमे अद्यापर्यंत लावण्यात आलेली नाहीत. ह्या कृत्यामागील मुख्य सूत्रधार व त्यांचे गॉडफादर कोण आहेत?, त्यांनी हा कट कोठे रचला?, त्यासाठी कोठे प्रशिक्षण घेतले?, यंत्रसामुग्री कोणाकडून मिळविली? या सर्व बाबींचा शोध कायद्याच्या चौकटीत तातडीने व्हायला हवा. त्यासाठी कार्यक्षम व प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्याची आवश्यकता आहे. (Beed mosque)
आकाना धडा शिकवणार का?
धार्मिक द्वेषाचा हा विखार राज्यातील ग्रामीण भागापर्यंत किती खोलवर रुजत चालला आहे , हे या घटनांतून उघड झाले आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था कमालीची बिघडल्याचेही यातून स्पष्ट होते. एरवी दंगेखोर, आरोपींविरोधात कठोर कारवाई झालेल्या नुकसानाची भरपाई त्यांची मालमत्ता विकून करण्याची जाहीर करणारे गृह खात्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता या अर्धमस मशीदीत स्फोट घडविणारे अतिरेक्यांना आणि त्यांच्या ‘आकां’ना धडा शिकवणार का ?, हाच प्रश्न आहे. (Beed mosque)
कारवाईकडे महाराष्ट्रासह देशाचे लक्ष
मुख्यमंत्री पदाची तिसऱ्यांदा शपथ घेताना त्यांनी कोणाविरुद्धही आकस न ठेवता भारतीय संविधानाने घालून दिलेल्या चौकटीत राहून राज्यातील सर्व नागरिकांचे हक्क, अधिकार व त्यांच्या मालमत्तेची जपवणूक करण्याची हमी दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे, हे दाखवण्यासाठी ते राजधर्माचे पालन करणार का? याकडे राज्यातील १३ कोटी जनतेबरोबरच पूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेले आहे. (Beed mosque)
हेही वाचा :
देशातील थोर संतांनी राष्ट्रीय विचार जिवंत ठेवले
कोरटकरची कळंबा कारागृहात रवानगी