कोल्हापूर : भारतीय स्वातंत्र्य लढ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्र निर्माणामध्ये स्वातंत्र्याबरोबरच व्यक्तीसमूहाचे स्वातंत्र्यही महत्त्वाचे मानले. या दोन्हीमध्ये समतोल साधण्याचे कार्य केले. गुलामगिरीमध्ये जीवन जगणाऱ्या व्यक्ती समूहांना त्यांच्या हक्क व अधिकारांपासून वंचित ठेवून होणारे राजकीय सत्तांतर म्हणजे पूर्ण स्वातंत्र्य नव्हे; तर या दोन्हीमध्ये समतोल राखून देशाला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे अशी डॉ. आंबेडकरांची भूमिका होती, असे प्रतिपादन डॉ. गिरीश मोरे यांनी केले. त्यांचे कार्य स्वातंत्र्य चळवळीसाठीच नव्हे तर भारतीय राष्ट्र बांधणीसाठी महत्त्वाची ठरणारे आहे, असे ते म्हणाले.(Ambedkar Chair speech)
ते शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘फुले-शाहू-आंबेडकर साप्ताह-२०२५’ च्या उद्घाटनावेळी बोलत होते. यावेळी प्रा. दत्ता भगत लिखित ‘भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान’ या पुस्तकाचे करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. श्रीकृष्ण महाजन होते. (Ambedkar Chair speech)
डॉ. मोरे म्हणाले, डॉ. आंबेडकरांनी त्यांच्या संशोधन कार्यातून ब्रिटीश सत्तेकडून होणारी भारतीयांची लूट व शोषण याबाबत केलेली मांडणी, देशाचे कामगार, उर्जा व पाटबंधारे मंत्री म्हणून केलेले कार्य, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना व वित्त आयोगाच्या निर्मितीमधील त्यांची भूमिका आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून केलेले अपूर्व कार्य स्वातंत्र्य चळवळीसाठीच नव्हे तर भारतीय राष्ट्र बांधणीसाठी महत्त्वाची ठरणारे आहे. (Ambedkar Chair speech)
बाबासाहेबांचे कार्य स्वातंत्र्य लढ्याचाच भाग : प्रा. प्रकाश कांबळे
यावेळी प्रा. डॉ. पी. एस. कांबळे यांनीही प्रस्तुत पुस्तकाच्या अनुषंगाने विवेचन केले. ते म्हणाले, भारतीय स्वातंत्र्यलढ्यात डॉ. आंबेडकरांचे योगदान काय? असे प्रश्न विचारणाऱ्या लोकांना उत्तर देण्याचे काम प्रा. दत्ता भगत यांच्या पुस्तकाने केले आहे. स्वातंत्र्यचळवळीत डॉ. आंबेडकरांचा लढा हा देशांतर्गत सामाजिक सुधारणा करणे व ब्रिटीशांविरुद्ध स्वातंत्र्यासाठी लढणे असा दुहेरी स्वरूपाचा होता. सामाजिक चळवळीच्या माध्यमातून सुधारणा घडवून आणणे हासुद्धा स्वातंत्र्य चळवळीचाच भाग असू शकतो. त्याकडे केवळ राजकीय परिप्रेक्ष्यातून पाहणे चुकीचे आहे. भारतीय चलन व्यवस्था, बँकिंग व्यवस्था, शेतीसुधारणा इत्यादींबाबत बाबासाहेबांनी केलेले कार्य भारतीय स्वातंत्र्य लढ्याचाच एक भाग आहे. (Ambedkar Chair speech)
अध्यक्षीय समारोप करताना डॉ. श्रीकृष्ण महाजन म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा लढा व्यापक होता. सर्व मानवी हक्कांची प्रस्थापना झाल्याशिवाय स्वातंत्र्य अस्तिवात येत नाही. डॉ. आंबेडकरांचा लढा हा भारतीयांच्या मानवी हक्कांसह संपूर्ण स्वातंत्र्याचा होता. देशातील अस्पृश्य समाज, सर्व वर्गातील स्त्रिया, शेतकरी, कामगार आणि इतर मागास वर्गीय समाज यांच्या हक्कांसाठी डॉ. आंबेडकरांनी आयुष्यभर लढा दिला. त्यांनी संविधान निर्मितीत महत्त्वाचे योगदान दिले. हे त्यांचे कार्य देशाला संपूर्ण स्वातंत्र्य मिळवून देण्याचे व राष्ट्र निर्मितीचे कार्य आहे.
स्वागत व प्रास्ताविक श्री. अविनाश भाले यांनी केले. डॉ. किशोर खिलारे यांनी आभार मानले. यावेळी डॉ. चंद्रकांत कुरणे, कुमार कांबळे, युवराज कदम, डॉ. शोभा शेट्ये, डॉ. अनमोल कोठडिया, टी. एस. कांबळे, प्रा. साठे, रणवीर कांबळे आदी उपस्थित होते.
हेही वाचा :
भवाळकरांकडून लोकसाहित्य संशोधनाला व्यापक आयाम
जाधव गुरूजींच्या निरूपणाने गाथेच्या अभ्यासाची परंपरा समृध्द