मुंबई : विशेष प्रतिनिधी : बदलापूरमधील बालिकांवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या बनावट एन्काउंटरबाबतच्या खटल्याचे काम उच्च न्यायालयात सुरूच राहणार आहे. सुनावणीला अक्षय शिंदेच्या आईवडिलांनी हजर रहाण्याची आवश्यकता नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट केले. तसेच अक्षयच्या आई-वडिलांची खटला मागे घेण्याची विनंती फेटाळून लावली. न्या. रेवती मोहिते-ढेरे व न्या.नीला गोखले यांच्या खंडपीठाने त्याबाबतचा निर्णय दिला. याप्रकरणाची पुढील सुनावणी २४ फेब्रुवारीला घेण्याचे जाहीर केले. (Akshay shinde case)
गेल्या वर्षी बदलापुरातील आदर्श विद्यालयात दोन बालिकांच्या लैंगिक शोषणप्रकरणी नागरिकांचा उद्रेक झाला होता. त्यानंतर कंत्राटी शिपाई अक्षय शिंदे याला अटक करून त्याचा सप्टेंबर महिन्यात मुंब्रा येथे पोलीस व्हॅनमध्ये एन्काउंटर करण्यात आला. एन्काउंटर बनावट असल्याचे सांगत याप्रकरणी चौकशी करण्यासाठी अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याबाबत महानगर दंडाधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत एन्काउंटर बनावट असल्याचे स्पष्ट झाले होते. (Akshay shinde case)
त्यानुसार उच्च न्यायालयाने मागील महिन्यात संबंधित पाच पोलीसांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची सूचना सरकारला केली होती. असे असतानाच अक्षय शिंदेच्या आईवडिलांनी आम्हाला ही केस लढवायची नाही, आम्हावर कोणाचा दबाव नाही. मात्र त्यासाठी इकडे धावपळ करणे शक्य नाही. त्यामुळे याचिका रद्द करावी, अशी विनंती केल्याने प्रकरणाला वेगळेच वळण लागले होते. त्याबाबत न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने शुक्रवारी निर्णय दिला. हा खटल्याची सुनावणी सुरूच राहणार आहे. तो मागे घेता येणार नाही. शिंदेच्या आईवडिलांना तारखेसाठी कोर्टात हजर राहण्याची गरज नाही. तुम्हाला यायचे असेल तर या अथवा येऊ नका, असे समजावून सांगितले. त्यामुळे या खटल्याचे काम सुरूच राहणार असून पुढील तारीख सुनावणी २४ फेब्रुवारीला होणार आहे. (Akshay shinde case)
आम्ही लढा सुरूच ठेवणार
राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची स्थापना केली होती. मात्र त्याची काही कागदपत्रे अद्याप प्राप्त झालेली नाहीत. म्हणून आजची सुनावणी तहकूब करण्यात आली आहे. अक्षयच्या आईवडिलांनी याचिका मागे घतली असली तरी आम्ही लढा सुरूच ठेवणार आहोत, अशी प्रतिक्रिया त्यांचे वकील ॲड. अमित कटारनवरे यांनी दिली.
हेही वाचा :