Home » Blog » Ajit pawar’s action: अजित पवारांची ‘त्या’ पदाधिकाऱ्याविरोधात कडक ‘ॲक्शन’

Ajit pawar’s action: अजित पवारांची ‘त्या’ पदाधिकाऱ्याविरोधात कडक ‘ॲक्शन’

by प्रतिनिधी
0 comments
Ajit pawar’s action

मुंबई : लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्यासमोर रविवारी (२० जुलै) छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला झालेल्या बेदम मारहाणीवरून संताप व्यक्त होत आहे. या घटनेचा व्हीडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांतूनही संतप्त भावना व्यक्त होत आहेत. राजकीय वर्तुळातही त्या संदर्भात मोठी चर्चा होत आहे. (Ajit pawar’s action)

या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनीही आपल्या पक्षाच्या युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्षाला राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत. असे असले तरी छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून, या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही आक्रमक झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि पक्षाध्यक्ष अजित पवार संतप्त झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना थेट राजीनामा देण्याचे आदेश दिले. त्यानुसार चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे. (Ajit pawar’s action)

अजित पवार यांनी या घटनेसंदर्भात आणि केलेल्या कारवाईसंदर्भातील पोस्ट त्यांच्या ‘एक्स’वरील अधिकृत हॅण्डलवर केली आहे. त्यात ते म्हणतात, “काल लातूरमध्ये घडलेल्या अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह घटनेच्या पार्श्वभूमीवर, मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा द्यायच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.”

दरम्यान, “पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन केले जाणारे वर्तन कोणत्याही स्थितीत स्वीकारले जाणार नाही, यासाठी हा कठोर निर्णय घेतला आहे”, अशा शब्दांत अजित पवारांनी गैरवर्तन करणाऱ्यांना चांगलाच दम भरला आहे.

युवक राष्ट्रवादी प्रदेध्यक्षाचा राजीनामा

दरम्यान, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी सूरज चव्हाण यांनी राजीनामा दिल्याची माहिती दिली आहे. सोमवारी तटकरेंनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत चव्हाण यांनी राजीनामा दिल्याची माहिती त्यांनी दिली. “सूरज चव्हाण यांच्याबाबत पक्षाने निर्णय घेतला आहे. रविवारी झालेल्या प्रकारानंतर पक्षाध्यक्षांनी त्यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले. सूरज चव्हाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे”, असे तटकरे यांनी सांगितले. (Ajit pawar’s action)

मूळ घटना काय?
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे रविवारी लातूर दौऱ्यावर होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाकडून ते स्थानिक परिस्थितीचा आढावा घेत आहेत. यावेळी छावा संघटनेचे कार्यकर्ते त्यांना भेटायला आले. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे विधानसभेत मोबाईलवर पत्ते खेळत असल्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. याचा निषेध करत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तटकरेंना निवेदन दिले, तसेच त्यांनी पत्तेही उधळले. या संतापातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना तटकरेंच्या समोरच बेदम मारहाण करायला सुरूवात केली.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00