चंदीगढ : महिलेचा पाठलाग करून तिचा छळ केल्याप्रकरणात आरोपी असलेला आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्याच्या मुलाची हरियाणा सरकारने सहायक महाधिवक्ता म्हणून नियुक्ती केली आहे. (Accused appointed as AAG)
भाजप नेते सुभाष बराला यांचा मुलगा विकास बरालाविरुद्ध वर्णिका कुंडू यांनी आपला पाठलाग केल्याचा तसेच जबरदस्तीने त्याच्या गाडीत घुसण्याचा प्रयत्न केल्याबद्दल फिर्याद दाखल केली होती. हा खटला अजूनही सुरू आहे. २०१७ मध्ये ही घटना घडली होती. हा खटला अद्याप सुरू आहे. तरीही विकास बरालाची हरियाणा सरकारने सहाय्यक महाधिवक्ता म्हणून नियुक्ती केली आहे. ‘द क्विंट’ने हे वृत्त दिले आहे. (Accused appointed as AAG)
न्याय विभागाने १८ जुलै रोजी जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, हरियाणा राज्यासाठी अतिरिक्त महाधिवक्ता, वरिष्ठ उपमहाधिवक्ता, उपमहाधिवक्ता आणि सहाय्यक महाधिवक्ता या पदांवर ९७ नवीन नियुक्त्या केल्या. त्यात विकासचा समावेश आहे.
प्रकरणाची थोडक्यात पार्श्वभूमी
विकास आणि त्याचा मित्र आशिष कुमार यांच्यावर ५ ऑगस्ट २०१७ रोजी कलम ३५४D (पाठलाग), ३४१ (चुकीने रोखणे), ३६५ (अपहरण करण्याचा प्रयत्न) आणि आयपीसी ५११ अंतर्गत मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला. हरियाणाचे माजी आयएएस अधिकारी व्हीएस कुंडू यांची मुलगी वर्णिका कुंडू यांनी ही तक्रार दाखल केली होती. या दोघांनी रात्री उशिरा चंदीगडमध्ये त्यांचा पाठलाग केला आणि जबरदस्तीने त्यांच्या गाडीत घुसण्याचा प्रयत्न केला, असा आरोप कुंडू यांनी केला होता. (Accused appointed as AAG)
कुंडू यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सेक्टर २६ पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवण्यात आला होता. या प्रकरणात त्यावेळी मोठ्या प्रमाणात जनक्षोभ उसळला होता. १३ ऑक्टोबर २०१७ रोजी आरोप निश्चित करण्यात आले होते परंतु खटला आजही प्रलंबित आहे, बचाव पक्षाच्या पुराव्यांच्या नोंदीसाठी पुढील सुनावणी २ ऑगस्ट २०२५ रोजी होणार आहे.
न्यायपालिकेवरील विश्वास डळमळतोय : वर्णिका कुंडू
अशा घडामोडींमुळे (विकासच्या सहायक महाधिवक्तापदी नियुक्ती) भारतीय न्यायपालिकेवरील विश्वास डळमळीत होत आहे, असे वर्णिका कुंडू यांनी ‘द क्विंट’ला सांगितले. “न्यायाची माझी आशा अजूनही जिवंत असताना, तरीही मला हे सांगायलाच हवे की न्यायपालिकेवरील माझा विश्वास डळमळीत होत आहे. असे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे हरियाणा सरकारने दिली पाहिजेत,” असे त्या म्हणाल्या.