कोल्हापूर : प्रतिनिधी : रमाई आवास घरकुल योजनेची मंजूर रक्कम बँक खात्यावर जमा करण्यासाठी दहा हजाराची लाच स्वीकारणाऱ्या अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. अविनाश अशोक सुतार (वय ३३, रा. हासूर दुमाला, ता. करवीर, जि. कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. तो हातकणंगले पंचायत समितीतील ग्रामीण गृहनिर्माण अभियंता आहे. (ACB action)
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी या कारवाईची माहिती दिली. रमाई आवास घुरकुल योजनेची लाभार्थी म्हणून तक्रारदाराच्या आईला दीड लाख रुपये मंजूर झाले. ही रक्कम पाच टप्प्यात मिळते. पहिल्या तीन टप्प्यातील एक लाख रुपये लाभीर्थीच्या बँक खात्यावर जमा झाले आहेत. उरलेल्या दोन टप्प्यातील हप्त्याची रक्कम कधी जमा होणार, याची विचारणा करण्यासाठी तक्रारदार पंचायत समितीच्या कार्यालयात १० जानेवारी रोजी गेले होते. त्यांनी योजनेचे काम पाहणाऱ्या अविनाश सुतार यांची भेट घेतली. सुतार यांनी शिल्लक दोन हप्ते जमा करण्यासाठी १३ हजार रुपये लाचेची मागणी केली. लाच न दिल्यास हप्ते जमा होणार नाही, असे सांगितले. (ACB action)
त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारदाराच्या अर्जाची पडताळणी केली असता अभियंता सुतारने लाचेच्या तडजोड करत १३ हजार ऐवजी दहा हजाराची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. पंच आणि साक्षीदारासमक्ष दहा हजाराची लाच स्वीकारताना अभियंता अविनाश सुतार याला रंगेहात पकडले. (ACB action)
पोलीस उप अधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक आसमा मुल्ला, हेड कॉन्स्टेबल सुधीर पाटील, पोलीस नाईक संगीता गावडे, कॉन्स्टेबल उदय पाटील, प्रशांत दावणे यांचा या कारवाईत सहभाग होता.
हेही वाचा :
रेल्वे अपघातात आठ प्रवासी ठार